नव्या आकांक्षांचे उड्डाण

0
38

सुखद आणि दुःखद घटनांच्या संमिश्र कल्लोळाने व्यापलेले गतवर्ष सरून नवे वर्ष उदेले आहे. नव्या आशा आकांक्षांना पुन्हा पंख फुटले आहेत. सरल्या वर्षाकडे मागे वळून पाहिले, तर अनेक कडूगोड गोष्टींचे छाप आणि ओरखडे दिसतात. सन २०२२ ची सुरुवातच झाली होती ती कोरोनाच्या नव्या संकटाच्या पडछायेने आणि रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या दिशेने पडणार्‍या पावलांच्या चाहुलीने. सुदैवाने कोरोनाची ती उफाळती लाट फारशी हानी न करता लवकरच संपुष्टात आली, गतवर्षी अचानक प्रकाशात आलेल्या मंकीपॉक्सची भीतीही विरली, परंतु रशिया – युक्रेन संघर्ष मात्र अजूनही अत्यंत भयप्रद स्थितीमध्ये अजूनही आहे. त्याने जागतिक अर्थव्यवस्थेला अकारण मोठे हादरे दिले आहेत. कच्च्या तेलापासून सेमीकंडक्टरपर्यंतच्या व्यापारी उलाढालीला त्यामुळे मोठा फटका बसला आहे. हा रक्तरंजित संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता अजूनही दृष्टिपथात नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांच्या निर्धाराचे आणि शौर्याचे कौतुक करायलाच हवे, परंतु त्याच बरोबर, युक्रेनच्या नथीतून अमेरिका या युद्धात खरे तीर चालवते आहे हेही लक्षात घ्यायला हवे. महासत्ता म्हणून उभरू पाहणार्‍या चीनमध्ये गतवर्षात अनेक घडामोडी घडल्या. शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा लागलेली वर्णी, तेथील कोरोना प्रतिबंधक पावलांच्या अतिरेकाविरुद्ध जनतेत उसळलेला असंतोष, तैवानच्या स्वातंत्र्याकांक्षेला अमेरिकेने दिलेले पाठबळ अशा अनेक घटनांनी चीन प्रकाशझोतात राहिला. शेजारच्या पाकिस्तानातील महापूर आणि इम्रान खान सरकारची पदच्युती हेही गतवर्षीचे एक ठळक वैशिष्ट्य राहिले. सरत्या वर्षात अनेक दिग्गज व्यक्तींना आपण गमावले. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने जगातील एक राजेशाही पर्व संपले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, नृत्यमहर्षी बिरजू महाराज यांचे आपल्यातून जाणे ही भारतासाठी फार मोठी हानी होती. वर्षअखेरीस पेलेसारख्या जगज्जेत्या फुटबॉलपटूचे आपल्यातून जाणे हेही क्रीडाविश्‍वात पोकळी निर्माण करणारे आहे. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची हत्याही जगाला धक्का देणारी ठरली. सरत्या वर्षात जगातील अनेक देशांत जनआंदोलनांचा कोलाहल पाहायला मिळाला. श्रीलंकेचे दिवाळखोरीत जाणे व त्याविरुद्ध तेथील जनतेचे आंदोलन असो किंवा इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरुद्ध तेथील महिलांनी उभारलेले आंदोलन असो, या आंदोलनांनी जगभराचे लक्ष वेधून घेतले. सकारात्मक गोष्टीही अनेक घडल्या. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांच्यासारख्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची झालेली नियुक्ती अभिमानास्पद ठरावी. खुद्द भारतासाठीही गतवर्ष संमिश्र स्वरुपाचे होते. गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका, नंतर गुजरात व हिमाचल प्रदेशातील निवडणुका यातून भारतीय जनता पक्ष भक्कम स्थितीत उभा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. महाराष्ट्रात एकनाश शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेत भाजपने पाडलेली उभी फूट ही गतवर्षीची एक चिरस्मरणीय घटना आहे. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रथमच गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीची मल्लिकार्जुन खर्गेंच्या रूपाने झालेली निवड व राहुल गांधींची साडे तीन हजार किलोमीटरची भारत जोडो यात्राही लक्षणीय होती. ‘द काश्मीर फाईल्स’चित्रपटावरून उठलेले वादळ, त्याचे गोव्यातील इफ्फीत उमटलेले पडसाद, एकीकडे काश्मीरमधील दहशतवाद थंडावताना पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीने खाल्लेली उचल, या सगळ्या घडामोडींनी गतवर्ष गजबजलेले राहिले. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने एक आदिवासी महिला देशाच्या राष्ट्रपतिपदावर आरूढ झाल्या ही भारतीय लोकशाहीसाठी एक गौरवास्पद घटना ठरली. जी २० राष्ट्रसमुहाच्या अध्यक्षपदी भारताची झालेली निवड व आगामी परिषदेचे लाभलेले यजमानपद ही देखील २०२२ ची मोठी उपलब्धी मानावी लागेल. गोव्यासह देशाच्या विविध भागांत येत्या वर्षभर ह्या बैठकांचा सिलसिला जारी राहणार आहे. गोव्यातही अनेक लक्षणीय घटना गतवर्षात घडल्या. उजेडात आलेला कोट्यवधींचा जमीन घोटाळा, बंद पडलेल्या खाणी सुरू होण्याच्या दिशेने पडलेली पावले आणि अनेक वर्षे रखडलेल्या मोपा विमानतळाचे आणि जुवारीवरील नव्या पुलाचे कार्यान्वयन या गोव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घटना होत्या.पर्यटनाला बट्टा लावणार्‍या सोनाली फोगट हत्याप्रकरणातून समोर आलेला अमली पदार्थांचा सुळसुळाट रोखणे, खाणी लवकरात लवकर सुरू करणे आणि म्हादईवर आलेले संकट दूर करणे हे राज्य सरकारसाठी तीन प्रमुख संकल्प असतील. मोपा विमानतळावरून लवकरच पहिले प्रवासी विमान उड्डाण करणार आहे. गोव्यासाठीही हे नव्या विकासाचे, प्रगतीचे उड्डाण ठरो अशी अपेक्षा करूया!