मोरूची मावशी गेली!

0
146

मृत्यू हा कोणत्याही मनुष्याच्या जीवनाचा अपरिहार्य शेवट असतो. कधी ना कधी तो येतोच, परंतु मनुष्यजीवनातील एक शाश्‍वत सत्य असलेला हा मृत्यू जेव्हा एखाद्याला आपल्यातून तडकाफडकी घेऊन जातो, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनभराच्या वाटचालीची संस्मरणे तेवढी आपल्या हाती उरतात. ही संस्मरणे जेवढी चांगली असतील, तेवढी त्या मृत्यूविषयीची हळहळ अधिक असते. ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांच्या काल भल्या सकाळीच आलेल्या निधनाच्या कटू वार्तेने आम रसिकांमध्ये एक कलाकार म्हणून आणि परिचितांमध्ये एक भला माणूस म्हणून त्यांच्याप्रती अशीच तीव हळहळ व्यक्त होताना दिसली. आपल्या अगणित भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांना चार दशके खदखदून हसवले. मोठे डोळे, आनुनासिक आवाज, काहीसे अस्प ष्ट शब्दोच्चार ही खरे तर नाट्याभिनयामध्ये व्यंगे मानली जातात, परंतु त्यांचाच असा काही खुबीदार वापर विजय चव्हाण करायचे की, तीच त्यांची बलस्थाने होऊन बसली. विनोदाची आणि त्यासाठी अत्यावश्यक मानल्या गेलेल्या ‘टायमिंग’ ची जबरदस्त जाण असल्यामुळे विजय चव्हाण हे नाव मराठी रसिकांच्या घरोघरी पोहोचले. आचार्य अत्र्यांनी ‘मोरूची मावशी’ लिहिले, तेव्हा विजय चव्हाण नावाचा कोणी एक अभिनेता भविष्यात येईल आणि रंगमंचावर ‘टांग टिंग टिंगा’ चा धुमाकूळ घालत आपली ‘कांदा संस्थानची राणी’ मराठी रंगभूमीवर अजरामर करून जाईल हे त्यांच्या स्वप्नातही नसेल. जणू काही ती भूमिका त्यांच्याचसाठी, त्यांच्या रंगभूमीवरच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी लिहिली गेली होती! या गाण्यातले विजय चव्हाणांचे ‘टुंग’ कधीही विसरले जाणार नाही. ‘मोरूची मावशी’ मुळे जणू आपला लिंगबदल झाला असे ते गमतीने सांगायचे. एकदा नाटकाच्या प्रयोगावेळी स्त्रीवेशातच ते पुरुषांच्या प्रसाधनगृहात गेल्याने तेथील पुरुष प्रेक्षक आपलीच चूक झाल्याचे समजून स्त्रियांच्या प्रसाधनगृहात शिरले होते!! स्त्रीवेश धारण केला की आजकाल अनेक नटांचे ताळतंत्र सुटते, परंतु विजय चव्हाण यांच्या विनोदाचे वैशिष्ट्य हे की, स्त्रीवेशातील ही भूमिका करीत असतानाही विलक्षण संयमाने आणि त्या ‘स्त्रीत्वा’चा आब राखून ते ही भूमिका करायचे. त्यात स्त्रीसुलभ हावभाव, उड्या मारणे वगैरे जरूर असायचे, पण कुठेही सवंगपणा नसायचा. ‘श्रीमंत दामोदरपंत’ च्या यशामध्ये त्यांचाही मोठा वाटा होता. ‘तू तू मी मी’ नाटकात तर ते चौदा भूमिका करायचे. त्यासाठी त्यांना सेकंदा-सेकंदाला वेश पालटावा लागे, परंतु त्यांनी ते लीलया साधले होते. खरे तर त्यांची रंगमंचावरील सुरूवात ही एकांकिका आणि प्रायोगिक नाटकांद्वारे झाली होती. महाविद्यालयीन मित्र आणि तितकेच ताकदीचे दर्जेदार विनोदी अभिनेते विजय कदम यांच्यामुळे एका एकांकिकेत कलाकार न आल्याने त्यांना संधी मिळाली. छबीलदासची चळवळ, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, जयदेव हट्टंगडी, विजया मेहता यांच्या तालमीत त्यांच्या अभिनयगुणांना आकार आला. मग एकांकिका – प्रायोगिक नाटक – व्यावसायिक नाटक – चित्रपट – मालिका असा त्यांचा प्रवास झाला. महेश कोठारेंच्या चित्रपटांमध्ये त्यांच्या सहकलाकाराच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. ते उत्तम विनोदी अभिनेते होते, परंतु तितक्याच ताकदीने गंभीर भूमिकाही त्यांनी केल्या. त्यांना मिळालेल्या चार पुरस्कारांपैकी तीन अशा गंभीर भूमिकांसाठीच मिळालेले होते. शेवटी शेवटी त्यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार लाभला तेव्हा व्हीलचेअरवरून ते त्या कार्यक्रमाला आले होते आणि तरीही त्यांनी खुमासदार भाषणाने प्रेक्षकांना हास्यकल्लोळात बुडवले होते. विजय चव्हाणांचे वडील गायक नट होते. व्ही. शांताराम यांनी एका भूमिकेसाठी त्यांचे वडील आणि दुसरा नट यातून दुसरा नट निवडला होता, तो होता अशोककुमार. त्यामुळे तेव्हा वडिलांची निवड न करणार्‍या व्ही. शांताराम यांच्या नावाने आपल्याला मिळालेला पुरस्कार चव्हाण यांनी वडिलांना अर्पण केला होता. आपल्याला यश मिळाले, पण सहज मिळाले नाही याची त्यांना खंत होती. शेवटपर्यंत ते विद्यार्थ्याच्या भूमिकेत असायचे. जुन्यांपासून नव्या सहकलावंतांपर्यंत सर्वांच्या अभिनयाचे बारकाईने आणि आवर्जून निरीक्षण करायचे. त्यांचा हा गुण शेवटपर्यंत त्यांनी जोपासला होता, परंतु त्यांचा विनोद हा त्यांचा स्वतःचा होता. स्वतःची विनोदनिर्मितीची अस्सल शैली त्यांनी निर्माण केली होती, जिचे इतरांनी अनुकरण केले. विजय चव्हाणांचे नुसते दर्शन झाले की प्रेक्षकांना हसू कोसळे ही त्या अभिनयसम्राटाला प्रेक्षकांकडून मिळणारी पोचपावती होती. मध्यंतरीच्या गंभीर आजारपणानंतर पुन्हा एकदा ते रंगभूमीवर येण्यास उत्सुक होते, परंतु दुर्दैवाने ते सत्यात उतरू शकले नाही. काळ निष्ठूर असतो. एकेका कर्तृत्ववान व्यक्तीला तो आपल्या पडद्याआड नेत असतो. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, प्रशांत दामले इथपासून ते भरत जाधव, मकरंद अनासपुरेपर्यंतचा काळ पाहिलेल्या विजय चव्हाण यांच्या मृत्यूने या स्थित्यंतरातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे.