हासरा नाचरा… सुंदर साजिरा…!

0
243
– गिरिजा मुरगोडी
निसर्गातल्या, समाजातल्या, साहित्यातल्या अशा कितीतरी श्रावणवेळा आपल्याला लोभावतात, मोहवतात, भुरळ घालतात. तशाच, प्रत्येकानं आपापल्या आयुष्यातही काही श्रावणवेळा अनुभवलेल्या असतात नाही का? त्याही मनात जपलेल्या असतात. कुपीतल्या अत्तरासारख्या त्या दरवळत असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचं त्याचं रूप वेगळं… भेटणं वेगळं… भावणं वेगळं!
हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला
लपत, छपत, हिरव्या रानात
केशर शिंपीत श्रावण आला…
कुसुमाग्रजांच्या या शब्दांसारखाच मनावर, रानावर रिमझिमत रुमझुमत तांबुस कोमल पाऊल टाकीत तो मनभावन श्रावण आलाय…
वेल्हाळ, लडिवाळ, खुळावणारा, नादावणारा श्रावण; थेंबांचे वाळे नाचवत, जाई-जुई-केवड्याचा गंध अन् सोनसानुलं स्मित लेऊन हिरवं हिरवं गोंदण होऊन आल्हादाचा दूत होऊन घरी आलाय… सृष्टीच्या सृजनोत्सवाचा, हर्षाच्या गगनोत्सवाचा, सणांच्या आनंदोत्सवाचा तो मनोरम श्रावण रांगोळी रेखल्या अंगणात स्वस्तिकपावलांनी हलके हलके उतरतोय… हिरवंगार भवताल बाहू पसरून त्याला कवेत घेतंय… सारी सृष्टी मंगलगान गात गात हा सोहळा अनुभवतेय!
श्रावण आणि प्रसन्नपण हातात हात घालूनच भेटीला येतं. मग त्या प्रसन्नतेत न्हाऊन निसर्ग खुलतो, घरदार आनंदतं, मन न् मन फुलतं… वातावरणच तसं असतं ना! अगदी मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे-
ओल्या पानातल्या रेषा
वाचतात ओले पक्षी
आणि पोपटी रंगाची
रान दाखविते नक्षी…
सगळीकडे हिरवेगार मखमालीचे गालिचे अंथरलेले… रंगीबेरंगी रानफुलांची पखरण, मागे निळेशार डोंगर, वर असीम निळाईवर ढगांची ये-जा, हळदुल्या उन्हाचं मध्येच खुद्कन हसणं… कधी सरींचं शिंपण… इंद्रधनूची कमान… जिकडेतिकडे झुळझुळणारं पाणी… नदी, ओढे, झरे, नाले… सुखाने जडावलेली, भारावलेली सृष्टी…. मग काय-
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ
येता आषाढ श्रावण
निवतात दिशा पंथ…
असा सगळा आनंदसोहळा चाललेला असताना उत्सवप्रिय माणसाने तो वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून साजरा करणं हे ओघानं आलंच! त्याही दृष्टीनं श्रावण म्हणजे आनंदाचे घडे भरून आणणारा महिना.
श्रावणातला प्रत्येक दिवस काही पूजन, काही सण घेऊनच येणारा. हा सात्त्विकतेचा महिना, श्रवणाचा महिना. मात्र आनंदासाठी आनंदाने साजर्‍या होणार्‍या प्रत्येक सणामागे, रूढी-परंपरेमागे आपल्या पूर्वजांचा काही निश्‍चित विचार आणि शास्त्राचा आधारही होता. शरीरशास्त्र, आहारशास्त्र, वनस्पतीशास्त्र एवढंच नव्हे तर मानसशास्त्र, अध्यात्मज्ञान या सर्वांचा विचार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या परंपरांमागे असल्याचं दिसून येतं. त्याही दृष्टीनं श्रावण समृद्ध करणारा.
नागपंचमीला कृषिमित्र नागाचं पूजन, उकडलेल्या पदार्थांचं सेवन, झाडांना झोपाळे बांधून खेळणं, पूर्ण खुललेल्या निसर्गाच्या जवळ जाणं; मंगळागौरीचा हर्षोल्हास, पत्री गोळा करणं, पूजा, मैत्रिणींनी एकत्र येणं, मुक्तपणे खेळणं, शुक्रवारी जिवतीची पूजा, पुरणा-वरणाचा नैैवेद्य, नारळी पौर्णिमेला समुद्रपूजन, रक्षाबंधन, रविवारी रविवार पूजणं म्हणजे सूर्यपूजन… श्रावणातले वेगवेगळे उपवास, प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य याद्वारे निसर्गनियमांचं पालन करत ऋतुचक्रानुसार दिनचर्या ठेवणं, आहार सांभाळणं आपोआपच घडत असतं.
या सर्वांमध्ये आयुर्वेदाची परंपरा, वनस्पतींचा विचार हेही केल्याचं दिसून येतं. अशोक, आवळा, दूर्वा, कदंब, ब्राह्मी, कण्हेर, धोत्रा, आघाडा, बेल अशी पत्री असोत वा चाफा, केवडा, कण्हेर, बकुळ, गुलाब, जास्वंद अशी फुलं असोत; देवदेवतांना वाहण्याच्या निमित्ताने या सर्वाची ओळख व्हावी, घराच्या आजूबाजूला जी झाडं-वेली आहेत त्यांच्या संपर्कात राहावं, या सर्व वनस्पतींचं संवर्धन व्हावं हेही साध्य होत असतं.
या सर्वाबरोबरच मानवी नात्यांची जपणूक, चराचराबद्दल कृतज्ञताभाव, चेतन-अचेतनास व्यापून असलेल्या पंचतत्त्वाचं पूजन, एकमेकांना आनंद देणं आणि घेणं… हे सर्व साधलेलं असतं; जेणेकरून वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन निकोप, सुभग आणि सुंदर होऊ शकेल.
श्रावण हा ‘श्रवणा’चा महिना म्हटलं जातं. पोथ्या- कहाण्यांचं वाचन, पारायण इ. या महिन्यात नित्यनेमानं केलं जातं. हे खूप महत्त्वाचं. कारण कोणत्याही ज्ञानार्जनाची पहिली पायरी श्रवण. आधी श्रवण, मन एकाग्र करणं, मग मनन, चिंतन होऊ शकतं. भौतिकदृष्ट्या जीवन सुखमय झालं तरी ते आनंदमय होण्यासाठी संतमहात्म्यांनी सांगितलेलं मर्म ऐकणं, जाणून घेणं, आचरणात आणणं आवश्यक असतं. हे साध्य करायला प्रेरित करतो तो श्रावण.
या श्रावणानं कविमनांना तर कायमच भुरळ घातलेली…
चांदण्यात झिळमिळणार्‍या
घन निवांत रिमझिमणारा
पाऊस म्हणावे याला
का चंद्रच पाझरणारा?
चांदणे मदिरसे होते
हिमतुषार वाटे पाणी
आत्मतृप्त नभ हरखून जेव्हा
गाते श्रावणगाणी…
राधा भावे यांनी आत्मतृप्त नभाच्या हरखल्या श्रावणगाण्यात श्रावणाचे सुंदर विभ्रम अलगदपणे उलगडले आहेत, तर कवी माधव सटवाणी यांना श्रावणातला पाऊस पूर्वजन्मीचा सोबती वाटतो.
आला आभाळ घेऊन
मनी पाऊस अभंग
पूर्वजन्मीचा सोबती
भेटे होऊन निःसंग…
श्रावणात सृजनाची बरसात न झालेला कवी शोधूनही सापडणे कठीण. प्रत्येकाला भेटणारा श्रावण वेगवेगळ्या प्रकारचा… शब्दघनांमधून तो अनुभवताना आपल्याला मिळणारा आनंदही वेगळाच. बाकीबाब, बालकवी, कुसुमाग्रज, शांताबाई, इंदिरा संत… अशा अनेक कवींनी आपल्या बहारदार आविष्कारांनी या श्रावणाची शब्दशिल्पे अजरामर करून ठेवली आहेत. नित नित आनंद देत राहणारी… मनात श्रावण खुलवणारी!
श्रावणाची ही सगळी रूपं आठवता आठवता आता मन एका वेगळ्या विचाराशी येऊन थबकू पाहतंय. निसर्गातल्या, समाजातल्या, साहित्यातल्या अशा कितीतरी श्रावणवेळा आपल्याला लोभावतात, मोहवतात, भुरळ घालतात. तशाच, प्रत्येकानं आपापल्या आयुष्यातही काही श्रावणवेळा अनुभवलेल्या असतात नाही का? त्याही मनात जपलेल्या असतात. कुपीतल्या अत्तरासारख्या त्या दरवळत असतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचं त्याचं रूप वेगळं… भेटणं वेगळं… भावणं वेगळं!
अगदी बालपणी,
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे…
अशा श्रावणसरींचा हर्षभारित अवखळ आनंद घेताना, पाण्यात होड्या सोडताना, टाळ्या पिटून नाचताना, ‘कोल्ह्याचं लग्न’, ‘म्हातारीचं दळण’ अशा गमती अनुभवताना या श्रावणवेळांमध्ये इंद्रधनूचे सारेच रंग जणू मिसळून नाचत असतात.
तारुण्याच्या उंबरठ्यावर याच रेशीमधारांनी जागवलेली असते अनामिक हुरहुर, उत्कंठा, प्रियाची/प्रियेची प्रतीक्षा, आराधना, भेटीतली उत्कटता, तर कधी ‘रिमझिम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात| प्रियेबिण उदास वाटे रात… ’ अशी विरहातील कातरता… भेटीचे क्षण… विरहाचे क्षण असा ऊन-सावलीचा खेळ, समजणे-उमजणे असा मनामनाचा मेळ आणि त्यातूनच उलगडत जाणारे सहजीवनाचे इंद्रधनू… कधीतरी येणारा अल्पसा झाकोळ अन् पुन्हा हसणारे आल्हादक ऊन… श्रावण खुलत जातो आयुष्यात!
नंतर तोच श्रावण भेटतो कुरळ कुरळ जावळात, रुमझुमत्या वाळ्यात, दूधमाखल्या ओठात, सायीच्या गालात, गोड गोड बोलात…. सगळीकडेच! त्या काळातलं अवखळ रिमझिमणं वेगळंच त्याचं!
खरं तर आयुष्यातला तो सगळा काळ म्हणजे श्रावणाचा आनंदऋतूच असतो. माणसं भेटतात, नाती जडतात, आवडत्या कलांचा आस्वाद मिळतो, खूप आवडणारं काही करण्याची संधी मिळते, भरारी घेता येते, कधीकधी तर रोजचंच काही काही वेगळंच भासतं आणि आगळा आनंद देऊन जातं. अशा प्रत्येक वेळी हा मखमली श्रावण हसत असतो.
पण कधीतरी मनाचा उदास उद्वेगऋतूही असतो. काहीच साद घालत नाही. मग विझू विझू होतं. सारीकडून ओढलं जाण्याचा शीण आलेला असतो. उमेद विरते. उमंग हरवते… ही वेळ असते श्रावणातल्या एखाद्या झाकोळाची. पण श्रावणाला आषाढासारखा गर्द झाकोळ मानवतच नाही फार वेळ… विचार करून पाहिलं तर हा श्रांतऋतू फार काळ टिकत नसतो… श्रावणातल्या उन्हासारखी काही किरणं कोणत्या ना कोणत्या रूपात हलकेच प्रवेशतात…अलगदपणे झाकोळ दूर करतात आणि श्रावणाचा आल्हाद मनावर शिंपून जातात. आपल्याच नादात थिरकणारा श्रावण आपल्याला सांगत राहतो, ‘आपलं वेडं आभाळ, आपलं हिरवं झाड जपत राहावं स्वतःसाठी… आणि खूप बहरूही द्यावं…’
आयुष्य पुढे जात राहतं तसं अधिक प्रगल्भ रूपात श्रावण भेटू लागतो आपल्याला! जेव्हा जेव्हा सार्‍या दृष्ट-अदृष्टाबद्दल प्रेम दाटून येतं, आत्मीयता वाटते तेव्हा तिथे समाधानाचा घन होऊन श्रावण बरसतो. अनेकानेक अनुभवांची कमळबेटं आयुष्याचं सरोवर रमणीय करून जातात, अर्थपूर्ण करत राहतात… ही असते श्रावणाची आगळी धून… आपल्या पावलांसाठी स्वस्तिकखूण…
खरंच, श्रावणाच्या चाहुलीपाठोपाठ आज
आठवणींचे किती दरवळ
जाई जुई बनून आले
रिझझिमणारे गाणे असे
श्रावणसर होऊन आले
सारी उलघात विसरून मन
श्रावणातले ऊन झाले
हिरवा उत्सव झेलताना
राउळातली धून झाले…
अंगणात उतरलेल्या श्रावणाचं स्वागत करत असताना ही स्वस्तिकखूण आणि ती श्रावणधून यासाठी मनाचं अंगण खुलं ठेवूया… श्रावण होऊनच जगूया…