मोबाईलचं भूत मानगुटीवर!

0
97
  • प्रा. दिलीप वसंत बेतकेकर

मोबाईल आणि मुलं यांची गट्टी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका खटक्यात आणि एका फटक्यात मुलांना मोबाईलपासून दूर करता येणार नाही ही वस्तुस्थिती आता स्वीकारायला हवी. अतिरेकी उपायांनी अपाय होण्याचीच शक्यता अधिक आहे. म्हणून मोबाईल मुलांचा आणि मोठ्या मंडळींचाही मालक न होता सेवक कसा होईल हे पाहायला हवं. ते एक दुधारी शस्त्र असल्यामुळे त्याचा वापर कौशल्याने कसा करायचा हे दाखवावं आणि शिकवावं लागेल.

एक मार्मिक हास्यचित्र बघितलं होतं.
शेतामध्ये एक बुजगावणं उभं आहे. एक पक्षीण आणि तिचं पिल्लू दाणे टिपताहेत. पक्षीण पिल्लाला इशारा देते.
ती म्हणते, ‘‘बेटा, तो माणूस उभा आहे, त्याच्या फार जवळ जाऊ नकोस हं!’’
त्यावर ते स्मार्ट पिल्लू आईला सांगत आहे, ‘‘अगं आई, काळजी करू नकोस. तो काही माणूस नाही. माणूस असता तर त्याच्या हातात मोबाईल दिसला असता ना!’’
मोबाईल माणसाच्या जीवनाचा, शरीराचा एक अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलच्या अतिरेकासंबंधी अनेक चुटके वाचायला मिळतात आणि कितीतरी किस्से प्रत्यक्ष पाहायलाही मिळतात. मोबाईलशिवाय माणूस दिसणं आता जवळजवळ अशक्यच.
एका घरात इतके मोबाईल असतात की एका व्यक्तीकडेही एकापेक्षा अधिक असतात. दोनतीन वर्षांच्या मुलाच्या हातातही मोबाईल दिसतो. सुरुवातीला आईबाबांना गंमत आणि कौतुक वाटतं. आपलं छोटं बाळ कसं मोबाईल हाताळतं हे इतरांना अभिमानाने पालक सांगतात. त्याचं व्यसन कधी बनतं कळतच नाही. दारूच्या व्यसनापासून दारुड्याला दूर करण्यासाठी दारू व्यसन मुक्ती केंद्रं सुरू झाली होती, तशीच मोठ्या शहरांमध्ये मोबाईलपासून मुक्त करण्यासाठी मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रेही सुरू व्हायला लागतील. अजून अशा केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ झाली नसली तरी आजचं चित्र पाहता काही दिवसांनी अशा अनेक केंद्रांची आवश्यकता भासणार आहे.

एक बातमी वाचली होती. महाराष्ट्रातल्या ९१,००० मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला. या दोषाचं वैशिष्ट्य म्हणजे मोबाईलच्या अतिवापरामुळे हा दोष निर्माण होत आहे. आम्ब्लोपिया असं या डोळ्यांच्या आजाराचं नाव. सातत्याने डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळे डोळ्यातील बाहुली लहान होते. नैसर्गिकरीत्या डोळ्यांतून येणारं पाणी बंद होऊन एक डोळा आळशी होतो. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन अपघात झाल्याच्याही अनेक बातम्या कानावर पडत असतात.

हे सगळं ऐकल्यावर, वाचल्यावर पालक अस्वस्थ होतात. काळजी वाटू लागते. काय करावं असा प्रश्‍न पडतो. अनेक पालक सभांमध्ये वैयक्तिकरीत्या भेटून यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी सल्ला विचारतात. पालकांना फास्ट फूडसारखी फास्ट उत्तरं आणि उपाय हवे असतात. खरं तर आता यातून बाहेर पडणं वाटतं तितकं सोपं नाही. काही निग्रही पालक कठोर निर्णय स्वतःसाठी व मुलांसाठी घेऊ शकतील; पण आजचे सर्वसामान्य आईबाप असं काही सातत्याने, चिकाटीने, निग्रहाने करतील असं वाटत नाही. मोबाईल व मुलं असा विषय आला की तात्पुरती चर्चा, आपल्या मुलांच्या अनुभवांचं कथन, क्षणिक काळजी झाली की दुसर्‍या क्षणी सगळ्याचा विसर पडतो. खरोखरच आपल्या मुलांची या व्यसनापासून मुक्तता व्हावी किंवा हे व्यसन लागूच नये म्हणून खबरदारी घेणारे पालक विरळाच!

मोबाईल आणि मुलं यांची गट्टी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एका खटक्यात आणि एका फटक्यात मुलांना मोबाईलपासून दूर करता येणार नाही ही वस्तुस्थिती आता स्वीकारायला हवी. अतिरेकी उपायांनी अपाय होण्याचीच शक्यता अधिक आहे. म्हणून मोबाईल मुलांचा आणि मोठ्या मंडळींचाही मालक न होता सेवक कसा होईल हे पाहायला हवं. ते एक दुधारी शस्त्र असल्यामुळे त्याचा वापर कौशल्याने कसा करायचा हे दाखवावं आणि शिकवावं लागेल. स्मार्ट फोनपेक्षा मुलं अधिक स्मार्ट व्हायला हवीत. मोबाईलसमोर आपण फार न वाकता आपल्या आवश्यकतेनुसार मोबाईल कसा वाकवायचा हे जमलं पाहिजे; अन्यथा फोन स्मार्ट आणि माणूस बावळट अशी स्थिती होईल!
हे कसं करता येईल ते बघू. खात्री… गॅरंटी कशाचीच देता येत नाही. फक्त प्रयत्न व प्रयोग करणंच आपल्या हातात आहे. केव्हा आणि किती यश मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. एकाने केलेला प्रयोग आणि प्रयत्न दुसर्‍याच्या बाबतीतही तितकाच यशस्वी किंवा अयशस्वी होईल असंही नाही. फक्त आणि फक्त प्रयत्न आणि प्रयोग करणंच आपल्या हाती आहे.

प्रयत्न आणि प्रयोग
१. घरात प्रत्येकाकडे स्मार्ट फोन हवा का?
हे दुसरा कोणी आपल्याला सांगू शकत नाही. हे आपणच ठरवायचं. घरात चार माणसं असतील तर सहा फोनची खरंच गरज आहे का? चारजणांच्या मध्ये एक स्मार्ट फोन काम भागवू शकतो का? स्मार्ट फोनची संख्या कमी केली की आपोआप फोनवर रात्रंदिवस पडून राहण्याची सवयही कदाचित संपेल.
२. मुलांना कधी फोन द्यायचा?
कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यामुळे हा प्रश्‍नच मोडीत निघाला आहे. आता फक्त कसा आणि किती वापरायचा एवढचं शिल्लक आहे. महामारी संपल्यावर, शाळा पूर्ववत सुरू झाल्यावरही मुलं मोबाईलपासून फारकत घेण्याची शक्यता कमीच आहे.
३. सतत फोनच्या वापराचे धोके समजावून सांगा.
शाळा-कॉलेजमध्ये या विषयावर चर्चा, व्याख्याने आयोजित करण्याचा आग्रह पालकांनी धरायला हवा. फक्त आग्रह नाही तर अशा कार्यक्रमात सक्रिय सहभागही हवा; अन्यथा हे शाळेने, शिक्षकांनी करावं अशा सूचना दिल्या की पालकांना वाटतं त्यांचं काम संपलं. एखादी गोष्ट तज्ज्ञांनी सांगितली तर ती पटण्याची अधिक शक्यता आहे.
४. घरात नोंदवही ठेवा.
घरात एक वही ठेवून जेव्हा मुलं बेशिस्तीने वागतात, आज्ञाभंग करतात, अभ्यास करत नाहीत अशा वेळी त्यांच्या हातानेच वहीवर तारीखवार लिहायला सांगा. उदा. १) मी अभ्यास न करता तासभर फोनवर खेळत राहिलो. २) आईनं सांगितलेलं अमुक काम आज केलं नाही, इ. हे करताना पालकांनी एक पथ्य मात्र पाळलं पाहिजे. आपण चिडायचं नाही, रागवायचं नाही, मारहाण करायची नाही. अत्यंत शांतपणे, संयमाने मुलाला त्याच्या हाताने आपली चूक लिहून ठेवायला लावायची. अर्थात या पद्धतीतही ‘गॅरण्टी’ कोणतीच देता येत नाही हे विसरू नका.
५. फोन कसा व कशासाठी वापरता येतो ते दाखवा.
फोनचा विधायक उपयोग करता येतो. कितीतरी सुंदर, उपयुक्त ऍप्स् आहेत. इंग्रजी सुधारणे, विविध भाषा शिकणे, गणिताची आवड उत्पन्न करणे, कलाकौशल्य शिकणे, वैज्ञानिक प्रयोग आणि खेळणी बनवणे. स्तोत्रं पाठ करणे, विविध विषयांवरची माहिती गोळा करणे, पुस्तक वाचणे, विविध पदार्थ तयार करणे, घरगुती उपचार, जगाची माहिती समजून घेणे, इ.
‘मोबाईलला हात लावू नकोस’ असं म्हणण्याऐवजी ‘बेटा, मला अमुक अमुक विषयावरची थोडी माहिती हवी. जरा शोधून देशील?’ असं म्हटलं तर…?
‘चला आजपासून रोज संध्याकाळी आपण सर्वजण देवासमोर बसून रामरक्षा म्हणू.’
‘चतुर्थी जवळ येतेय तर अथर्वशीर्ष पाठ करू.’
‘महिषासुरमर्दिनीचं स्तोत्र किती मधुर आहे, ते सगळेजण पाठ करूया.’
इथं ‘ऑर्डर’ नाही; सूचना, विनंती आहे!
हे सगळं स्मार्ट फोनवर उपलब्ध आहे. हे करता येतं. हे सगळं मुलांनाच शोधायला लावलं तर… त्यांनाही आपल्या हातात मोबाईल धरण्याचा आणि शोधण्याचा आनंद आणि कौशल्य मिळते ना. आणखी एक गोष्ट नकळतपणे होते. यात पाहणं कमी, ऐकणं जास्त. ही ग्यानबाची मेख आली का ध्यानात? सततचं बघणं कसं कमी करता येईल याचा विचार व त्यासाठी युक्त्या, क्लृप्त्या शोधायला हव्यात.
६. फोन व दूरदर्शनपासून दूर कसं ठेवायचं (आपल्याला व मुलांना)
घरात आणि मैदानात खेळण्यासारखे खूप खेळ आहेत. बुद्धिबळ तर असा खेळ ज्याचा चौफेर उपयोग आहे. फोनपासून दुसर्‍या दिशेला वळवण्यासाठी अगणित सोप्या, छोट्या आणि बिनखर्चाच्या गोष्टी आहेत. सणासुदीला पोस्टकार्ड आणून सुंदर भेटकार्डं बनवून पाठवता येतील. वर्तमानपत्रातील कविता, कोडी, गोष्टी, चित्रं कापून संग्रहवहीत चिकटवता येतील.
७. विविध स्थळांना भेटी देणे.
स्थळांना भेट देणं म्हणजे नुसतं वरवर बघणं नाही, सेल्फी घेणं तर नाहीच नाही. बघायला शिकवायला हवं. डोळे सर्वांनाच असतात. दृष्टी विकसित करावी लागते. आपणच ज्या गावात राहतो तेथेच निरक्षण, अवलोकन करण्यासारखी (नुसती बघणं नव्हे) इतकी स्थानं आहेत. मुलांना ‘मॅनेज’ करण्यासाठी ‘एंगेज’ करावं लागतं. त्यांच्यापाशी प्रचंड ऊर्जा आहे. भरपूर वेळ आहे. त्याचा विधायक उपयोग करण्यासाठी पालकांकडे कल्पकता हवी.
८. साहित्य व सामग्रही संग्रह (संकलन)
दर सेकंदाला मोबाईलवर माहितीचा खच पडतो. त्यातलं उपयोगी काय हे ठरवायचं तारतम्य हवं. नीरक्षीरविवेकबुद्धी खूप महत्त्वाची. जे चांगलं आहे, वापरता येईल अशाचा स्वतंत्र संग्रह करण्याची व्यवस्था मोबाईलवर आहे. त्या व्यवस्थेचा उपयोग करून आवश्यकतेनुसार वापर करता येतो.
९. थोडक्यात सांगायचं झालं तर हे सहा शब्द लक्षात ठेवले तर फायदा होण्याची अधिक शक्यता आहे (परत स्मरण करावंसं वाटतं- ‘गॅरण्टी’ नाही). हे शब्द आहेत- वर्ळींशीीं, वशलीशरीश, वळर्श्रीींश, वर्शींळरींश, वशश्ररू, वळषर्षीीश.
मोबाईल प्रचंड खादाड आहे. त्यानं इतकं खाल्लं आहे… पुढच्या काळात आणखीही खाणार आहे.
मोबाईलने आमचं घड्याळ खाल्लं, विजेरी खाल्ली,
पत्र खाल्लं, रेडिओ आणि रेकॉर्डर खाल्लाय.
कॅमेरा आणि कॅल्कुलेटर गिळंकृत केलंय.
मैत्री, नाती, भेटीगाठी खाऊन टाकल्यात.
वेळ, पैसा, आरोग्य खाल्लंय.
आणि ‘आ’वासून उभा आहे,
आम्हालाच खाण्यासाठी!
पूर्वी फोन एका जागी तारेने (वायर) बांधलेला असायचा आणि माणूस स्वतंत्र होता. आता फोन स्मार्ट आणि मोकळा, पण माणूस फोनला बांधला गेला आहे.

भरत सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजायचा ही कथा आपण वाचली. ते चित्रही आपण पाहिलं. ‘आ’ वासून सगळं गिळण्याच्या तयारीत असलेल्या मोबाईलच्या जबड्यात हात घालून त्याला माणसाळण्याचं काम आमचे भरत करतील काय?