पुरणपोळी

0
125
  • मीना समुद्र

पुरण म्हणजे कणकेच्या गोळ्यात भरण्याचं सारण. कुणी कुणी गूळ-खोबरे, शेंगदाणाकूट आणि गूळ यांचं सारण भरूनही पोळ्या करतात. रव्याचा सांजा, शिरा भरूनही पोळ्या केल्या जात असल्या तरी पुरणपोळीची लज्जत औरच!

चाहूल येता मनी श्रावणाची
होळी तथा आणखी वा सणाची (इंद्रवज्रा)
पोळीस लाटा पुरणा भरोनी
वाढा समस्ता अति आग्रहानी
अभिनव फडके या वाङ्‌मयरसिकाने आणि खाद्यरसिकाने व्हॉट्‌सऍपवर पाठवलेली इंद्रवज्रा, भुजंगप्रयात, वसंततिलका, मालिनी, मंदाक्रान्ता, पृथ्वी आणि शार्दूलविक्रीडित अशा वृत्तांतली पुरणपोळीसंबंधीची ही कविता! म्हणजे ती कशी बनवावी हे अथपासून इतिपर्यंत वर्णन केलं आहे की एखाद्या सुगरणीनेही चाट पडावे. कारण आपल्याकडे पुरणपोळी हे फार कसबाचे आणि कष्टाचेही काम समजले जाते आणि ती जिला जमते ती खरी सुगरण असे मानले जाते.

पुरणपोळी हे आहेच असं अवीट गोडीचं पक्वान्न. आमरस, मोदक यांसारखंच महाराष्ट्र-कर्नाटक-गोवा अशा अनेक प्रांतातलं हे लाडकं पक्वान्न. बारसं, लग्न, मुंज, डोहाळजेवण, सत्यनारायण, गणेशपूजा असं घरातलं कोणतंही छोटंमोठं कार्य असो, घरात पुरण शिजवले जातेच. मूठभर डाळीचे का होईना पण ते नैवेद्यावरच्या पानावर वाढले जाते. होळी हा तर पुरणपोळीचाच सण जणू. त्यामुळे ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’ म्हणून मुलेबाळे नाचत असतात. रंग खेळून आल्यानंतर स्नान करून पुरणानं जेवण केलं की छान ‘लोळी’ येते (लोळत पडावंसं वाटतं). ‘पुरणपोळी म्हणजे झोपेची गोळी’ म्हटल्यास वावगं होणार नाही. कारण पुरणपोळीनं पोट भरलेलं आणि मनही…

दोनतीन वर्षांपूर्वीच्या श्रावणात ह्यांचे मामा-मामी आले होते. तीनचार जण ‘दंताजीचे ठाणे उठले’ अशा स्थितीत असल्यामुळे मऊ खाद्यपदार्थ बनवताना गोडाधोडाचं म्हणून पुरणपोळीला अग्रक्रम दिला. बासुंदी आटवण्यात वेळ आणि गॅस दोन्ही खर्च होतात. पुण्याचे पाहुणे, त्यामुळे चितळे श्रीखंड मुलाबाळांसाठी सतत फ्रीजमध्ये असतं असंही बोलता बोलता कळलं. मग जिलेबी- लाडू- गुलाबजाम हे नेहमीच मिळतं आणि होतंही काही वाढदिवसासारख्या निमित्तानं. म्हणून म्हटलं पुरणच घालावं. इतकं छान जमलं की मामा म्हणाले, ‘वा! ब्राह्मण तृप्त झाला!’- (अगदी ‘मोगॅम्बो खूश हुआ’च्या चालीवर. पण हे आठवायलाच हवं होतं का?) काही म्हणा; पण तो श्रावण सार्थकी झाला असं वाटलं. कारण या सुगरणीची पाठ मामींनीही थोपटली. ‘आता हा घाट घालणं होत नाही. विकत मिळतात त्याच आणतो कधी…’ असं ऐकल्यावर तर खूपच बरं वाटलं मनाला. आता दर श्रावणात या आठवणी येतातच.

श्रावण आणि पुरणपोळी यांचेही घनिष्ट नाते आहे. नागपंचमीला पुरणाची दिंडं उकडून नागाला नैवेद्य दाखविला जातो. श्रावणशुक्रवारी (चारी किंवा निदान एकातरी श्रावणशुक्रवारी) लेकुरवाळ्या सवाष्णीला बोलवून पुरणपोळीचे जेवण दिले जाते. तेव्हा जीवतीला पुरणाचा नैवेद्य आणि घरातील मुलाबाळांना पुरणाच्या आरतीने (पुरणाचे निरांजनासारखे तूप घालून, दिवे लावून ओवाळले जाते.)- वात जळल्यावर ते पुरण प्रसाद म्हणून वाढले जाते. तसा वास आवडत नाही म्हणून निरांजनाशेजारी थोडे पुरण ठेवण्याचा फरक तेवढा आम्ही केला. पुरण असतेच नावासारखे पूर्ण तृप्ती करणारे. भोजनाचे पूर्ण समाधान देणारे… त्याचा स्वाद वाढवून नेहमीपेक्षा दोन जास्तीच्या घासांसाठी पोटात आपोआप जागा निर्माण करणारे. केवळ माणसांसाठीच नाही तर बैलपोळ्याला, वसुबारसेला, विशेष पूजेदिवशी गायीला पान देतानाही त्या तृप्तीचा अनुभव येतो. पशुपक्ष्यांनाही गोडधोड घास घालताना त्यांची तृप्ती व्हावी हाच हेतू असतो.

गुढीपाडवा, दसरा, अक्षयतृतीया अशा महत्त्वाच्या सणांना बहुसंख्य घरांतून पुरणपोळीच केली जाते. श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, गुलाबजाम, फ्रूटसॅलड असे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही असं का? हा प्रश्‍न लहानपणी पडला तेव्हा आईनं सांगितलं, एकत्र कुटुंबात, शेतकरी कुटुंबात घरात बरीच माणसं, त्यामुळे पुरवठा येण्यासाठीही आणि ज्यांची शेतीभाती आहे त्यांच्या घरचं धान्यधुन्य त्यामुळे ते साहजिकही असतं. आजकालच्या चमचाभर खाण्याचा तो काळ नव्हता. ‘स्वीट डिश’ म्हणून खाण्याची फॅशनही नव्हती. दोन वेळचं व्यवस्थित जेवणच सर्वजण करायचे. त्यामुळे जेवणाची संतुष्टता देणारी पुरणपोळी हेच मुख्य पक्वान्न असायचं. ते स्वस्त आणि मस्त, शिवाय ३-४ दिवस आगेमागे राहील असं टिकाऊही!

पूजा-नैवेद्यासाठी पुरणा-वरणाचा स्वयंपाक लागतोच. त्यामुळे गृहिणींनी सकाळपासून कंबर कसलेली असते. पुरणपोळी म्हटलं की आईची आठवण हमखास येतेच. तिची पोळी मोठा पोळपाट भरून. गोल, मऊसूत. खपली गव्हाची कणिक सैलसर भिजवून, भरपूर तिंबून तेल घालून ठेवे. चणाडाळ शिजवून पाणी गाळून त्यात तेवढाच गूळ घालून शिजवायची आणि पुरण शिजताना, हलवताना चुट्‌चुट् वाजत उडतं, चटके बसतात म्हणून काळजी घ्यायची. ते आळत आलं, मधोमध उलथनं उभं राहिलं की झालं पुरण तयार. मग ते पाट्यावर ‘गंध’ वाटायचं. आता पुरणयंत्रातून वाटता येतं. गरम असतानाही त्यात वेलची, जायफळपूड घालून अगदी छोट्या कणकेच्या गोळ्यात भलामोठा सोनेरी पुरणाचा गोळा भरून तांदळाच्या पिठात बुडवून सरासर लाटे. कुणी कागदावर घेऊन ती नाजूक नान तव्यावर टाकतात, तर कुणी लाटण्याला गुंडाळून. तशाही करून दाखवे. मग मध्यम आचेवर लोणकढ तूप सोडून खरपूस भाजून ती पानात वाढे. भरपूर तूप-दूध घ्या. पूर्वी तर ताटात तुपाची वाटी ठेवत, असं सांगे. ती पेढ्यासारखी छान स्वादाची पोळी खाताना परमसुख मिळे. कणकेत चिमूटभर हळद टाकली की पोळीला सोनेरी रंग येतो. पुरण शिजताना काकडीचा वास आला तर ते सैल पडते असं सांगत ती आम्हाला ‘टीप्स’ देई. आमचे चेहरे खुलले की तिला परमानंद होई.
पुरण हे सर्रास चणाडाळ आणि गूळ यांचंच. पण गुळाऐवजी फार क्वचित साखरही वापरली जाते. पण गुळाची गोडी ती गुळाचीच. कुणाच्या पोटाची तक्रार असेल तर तिथे मूगडाळीचे अन् गुळाचे पुरणही बनवतात. कणकेऐवजी कोणी रवामैदा तर कोणी नुसताच मैदाही वापरतात. पोळी फुटू नये म्हणून कणकेत मैदाही मिसळून कोणी पोळी करतात. एरव्ही रोजच्या साध्या पोळ्यांना ‘चपात्या’ आणि पुरण भरलेल्या त्या पुरणपोळ्या न म्हणता ‘पोळ्या’ असं म्हणण्याची पद्धत आहे. पुरण म्हणजे कणकेच्या गोळ्यात भरण्याचं सारण. कुणी कुणी गूळ-खोबरे, शेंगदाणाकूट आणि गूळ यांचं सारण भरूनही पोळ्या करतात. रव्याचा सांजा, शिरा भरूनही पोळ्या केल्या जात असल्या तरी पुरणपोळीची लज्जत औरच! पुरणाचेही कडबू, मोदक असे प्रकार करतात. पुरणपोळी साध्या दुधाबरोबर किंवा नारळाच्या दुधाबरोबर खाल्ली जाते. कुठे कुठे ती कमी गोड करून गुळवणीबरोबर खाल्ली जाते. गोव्यात ‘मणगणं’ नावाचा पदार्थ चणाडाळ, नारळाचं दूध आणि गुळाबरोबर बनवला जातो. पुरणाचा खिरीसारखाच तो प्रकार.

पुरणपोळीबरोबर हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे कटाची आमटी. पुरण शिजवून उरलेले (गाळलेले पाणी) वाटून यंत्रात- पाट्यावर उरलेले पुरण या पाण्यात मिसळून, चिंच कोळून ते पाणी मीठ, तिखट मसाला, कोथिंबीर आणि त्याला लाल मिर्ची, मोहरी, हिंग, मेथी, हळद आणि कढिलिंबाची फोडणी घालून उकळलेली ही आमटी किंवा सार भाताबरोबरही छान लागतो. चुलीवर व गॅसवर चांगला भाजून घेतलेला सुक्या खोबर्‍याचा तुकडा ठेचून घातला की याची चव वाढते. पुरणपोळी केली की भजी, कुरड्या पापड असा तळलेला पदार्थ हवाच.

पुरणपोळी हा खरं तर तसा अस्सल मराठी पदार्थ. याच नावाची एक शॉर्टफिल्म मध्ये पाहिली. गरीब घरातल्या एका मुलाला पुरणपोळी खूप आवडते. आपला मोठा भाऊ ज्या घरी काम करतो तिथे सत्यनारायणाची पूजा असल्याने पुरणपोळीचे जेवण असणार म्हणून भावाचं काम स्वतः करतो. पण कुणीच त्याला जेवायला थांब म्हणत नाही. मी जेवलो असे तो मित्रांना सांगतो. घरी उपाशीपोटीच झोपी जातो. पुरणपोळीसाठी ‘बोलावल्याशिवाय जायचं नाही जेवायला’ हे आईचे म्हणणे तो मोडत नाही.

आमच्या परिचितांच्या नातवाला पुरणपोळी एवढी आवडते की ‘केव्हाही फ्रीज उघडा, पुरण मिळेलच’ असं त्याची आईआजी कौतुकाने सांगतात.
‘सेंद्रीय पुरण-शेती’ हा शब्द ऐकला. शेतकरी बांधवांसाठी वरदान अशी आरोग्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण शेती सत्तरी तालुक्यात म्हादई नदीकाठी जमिनीची नियोजनबद्ध रचना करून, चारी बाजूंनी मातीचा लेप आणि मध्ये भातशेती- अशा पद्धतीने केली जाते असे वाचले. पावसाळ्यानंतरचे नदीपात्रातले अडविलेले हे पाणी आणि नदीपात्रातली ती सुपीकगाळ माती म्हणजेच पुरण- त्यात पूर्णान्न तयार करणारे, अन्नाची गरज पूर्ण करणारे, शेतकरी बांधवांच्या कष्टांना न्याय देणारे.
पुरणपोळीशी याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तरी दोन्ही पुरणांचा आरोग्यपूर्णतेशी नक्कीच संबंध आहे. दोन्हीकडे कष्टही आहेत आणि संतुष्टताही! साफल्य आणि आनंद हेच तर आपले लक्ष्य असते ना!