टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी ‘सोनियाचा दिनू’

0
58

>> अवनी लेखरा हिला नेमबाजीत, तर सुमित अंतिल याला भालाफेकीत सुवर्ण; भारताची पदकसंख्या पोहोचली ७ वर

जपानमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताने काल अक्षरश: पदकांचा पाऊस पाडला. सोमवारी सकाळी भारताची महिला नेमबाज अवनी लेखरा हिला नेमबाजीत सुवर्ण मिळाल्यानंतर सायंकाळी सुमित अंतिल याने भालाफेकीत देशाला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. कालच्या एकाच दिवसात भारताने २ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य पटकावत पाच पदके प्राप्त केली. टोकियो पॅरालिम्पिकमधील भारताची एकूण पदक संख्या ७ झाली असून, भारताने आतापर्यंत २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदक पटकावले आहे. दरम्यान, काल थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्यपदक काढून घेण्यात आले आहे.

भारताच्या १९ वर्षीय अवनी लेखराने नेमबाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करत काल सुवर्णपदक मिळवले. अवनी लेखरा हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४९.६ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. तसेच पॅरालिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. अवनीला अंतिम फेरीमध्ये चीनची नेमबाज झांग हिने कडवी लढत दिली होती; पण नंतर अवनीने अचूक लक्ष साधत तिचा पराभव केला. झांगने २४८.९ गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक पटकावले.
सुमित अंतिलने भालाफेकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. सुमितने पहिल्याच प्रयत्नात ६६.९५ मीटर अंतरावरून भाला फेकत नवा विश्‍वविक्रम रचला. त्याने दुसर्‍या प्रयत्नात ६८.०८ मीटर भाला फेकत आपलाच विक्रम मोडला. त्यानंतर तिसर्‍या प्रयत्नात ६५.२७ मीटर, चौथ्या प्रयत्नात ६६.७१ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात ६८.५५ मीटर भाला फेकत नव्या विश्‍वविक्रमाची नोंद केली.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बरियनने रौप्य पदक जिंकले, तर श्रीलंकेच्या दुलन कोडिथुवक्कूने कांस्य पदक जिंकले.

पंतप्रधानांकडून अवनी, सुमितचे कौतुक
विलक्षण कामगिरी अवनी लेखरा! तुझा मेहनती स्वभाव आणि नेमबाजीची आवड यामुळे हे शक्य झाले. सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन. भारतीय खेळांसाठी हा खरोखरच एक खास क्षण आहे. तुझ्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमधून तिचे कौतुक केले आहे. आमचे खेळाडू पॅरालिम्पिकमध्ये चमकत आहेत. पॅरालिम्पिकमधील सुमित अंतिलच्या विक्रमी कामगिरीचा राष्ट्राला अभिमान आहे. प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुमितचे अभिनंदन. तुला भविष्यासाठी शुभेच्छा, असे ट्विट मोदींनी केले आहे.