मोन्सेरात यांची कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी गच्छंती

0
108

सोनिया गांधींकडून कारवाईचा बडगा
पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेले सांताक्रुझ मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार आतानासियो उर्फ बाबुश मोन्सेर्रात यांची कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्याचे कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेतून सांगितले.कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री बाबुश मोन्सेर्रात हे पक्ष विरोधी कारवाया करीत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी असा ठराव प्रदेश कॉंग्रेस समितीच्या कार्यकारिणीने अलीकडेच घेतला होता. त्यावेळी पक्षविरोधी कारवाया करणार्‍या अन्य काही नेत्यांवरही कारवाई केली जावी असाही ठराव घेण्यात आला होता. हे ठराव नंतर कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सांताक्रुझ मतदारसंघाचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी गेल्या दोन-एक वर्षांत ज्या पक्षविरोधी कारवाया केल्या त्या लक्षात घेऊन सोनिया गांधी यांनी त्यांची सहा वर्षांसाठी कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांच्या कार्यालयातून त्यासंबंधीचे पत्र गेल्या ३ मार्च रोजी पाठवण्यात आले व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीला ते ११ मार्च रोजी मिळाले, असे कवठणकर यांनी सांगितले. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या अन्य काही नेत्यांचे काय, असे पत्रकारांनी विचारले असता सध्या तरी कॉंग्रेस अध्यक्षानी बाबुश मोन्सेर्रात यांच्यावरच कारवाई केली आहे, असे सांगून तसा आरोप असलेल्या अन्य नेत्यांविषयी काहीही सांगण्यास कवठणकर यांनी नकार दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बाबुश मोन्सेर्रात यांच्यासह चर्चिल आलेमांव, मॉविन गुदिन्हो, फ्रान्सिस सार्दिन, रवी नाईक, वालंका आलेमांव आदींवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशी करण्यासाठी जॉन फर्नांडिस हे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष असताना एक शिस्तभंग चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. बाबुश मोन्सेर्रात यांच्यावर हल्लीच झालेल्या पणजी पोटनिवडणुकीच्या वेळीही कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांच्याविरोधात काम केल्याचा ठपका होता. या पार्श्‍वभूमीवर बाबुश यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
बाबुश असंलग्न आमदार ठरणार
बाबुश मोन्सेर्रात यांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यामुळे ते आता कोणत्याही पक्षाचे आमदार राहणार नसून विधानसभेत ते असंलग्न आमदार ठरणार आहेत. यापूर्वी २००७ साली ते युगोडेपाचे आमदार असतानाही त्या पक्षाने त्यांना ते पक्षविरोधी कारवाई करीत असल्याच्या कारणावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे तेव्हाही ते गोवा विधानसभेत असंलग्न आमदार बनले होते. आता २०१५ साली पुन्हा एकदा ते असंलग्न आमदार बनले असून अशा प्रकारे दोनदा असंलग्न आमदार बनण्याचा त्यांनी विक्रम केला आहे, अशी प्रतिक्रिया एका राजकीय नेत्याने दिली. मागच्या वेळी बाबुश यांची युगोडेपातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर दिगंबर कामत सरकारात त्यांना कॉंग्रेसने मंत्रीपद दिले होते. त्यासाठी दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळातून डिच्चू देण्यात आला होता.