कोळसा घोटाळाप्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स

0
98

८ एप्रिलला न्यायालयात उपस्थितीचे आदेश
केंद्रातील युपीए सरकारच्या काळातील कोळसा घोटाळाप्रकरणी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना काल या खटल्याप्रकरणीच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार डॉ. सिंग यांना येत्या ८ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.डॉ. सिंग यांच्याप्रमाणेच या प्रकरणी उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, कोळसा खात्याचे तत्कालीन सचिव पी. सी. पारेख व अन्य तिघांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
या प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट वरील न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये फेटाळला होता. डॉ. मनमोहन सिंग यांचा जबाब नोंद करण्याचा आदेशही दिला होता. तसेच कुमारमंगलम बिर्ला व पारेख यांचीही चौकशी करून परिस्थितीजन्य अहवाल २७ जानेवारी रोजी सादर करण्यास सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणाशी निगडीत असलेल्यांसह डॉ. मनमोहन सिंग यांनाही न्यायालयाने समन्स बजावल्याने खळबळ उडाली आहे.
मनमोहन व्यथित
दरम्यान, कोळसा घोटाळाप्रकरणी विशेष न्यायालयाने समन्स बजावल्याने आपण व्यथित झाल्याची प्रतिक्रिया डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. मात्र कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चौकशीअंती वस्तुस्थिती उघड होईल असेही ते म्हणाले. न्यायालयाने या प्रकरणात हिंदाल्को कंपनीच्या शुभेंदू अमिताभ व डी. भट्टाचार्य यांनाही आरोपी म्हणून न्यायालयाने समन्स पाठविले आहेत. सीबीआयचे विशेष वकील भारत पराशर यांनी या प्रकरणीच्या ७३ पानी आदेशात या घोटाळ्याला शुभेंदू अमिताभ, भट्टाचार्य, उद्योगपती कुमार मंगलम, कोळसा सचिव पारेख तसेच तत्कालीन कोळसा मंत्री तथा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर ठपका ठेवला आहे.