मोनिका घुर्डेंच्या खुन्याला बंगळुरूत अटक

0
72

>> आरोपी माजी सुरक्षा रक्षक : मोनिकाच्या एटीएम कार्ड वापरामुळे अडकला

 

मोनिका घुर्डे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी पंजाब-भटिंडा येथील राजकुमार सिंग नामक युवकाला बेंगळूर येथे काल अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिली. मोनिका राहत असलेल्या सपना राज व्हॅली संकुलातच आरोपी पूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. मात्र, संकुलातील काही लोकांनी त्याच्या विरुध्द तक्रार केल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
आरोपीला अद्याप गोव्यात आणण्यात आले नसून त्याची सविस्तर जबानी घेतल्यानंतरच खूनाचे कारण सांगणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. आरोपीने मयताचा मोबाईल व एटीएम कार्ड नेले होते. ते एटीएम कार्ड वापरून आरोपीने बेंगळूर, मेंगळूर आदी ठिकाणी चार-पाच वेळा सुमारे लाखभर रु. त्याने काढले. आरोपी मयताचे एटीएम कार्ड वापरत असल्याने पोलिसांना त्याचा माग घेता आला.
पारंपरिक पध्दतीला फाटा
देऊन तपास काम
हा खून झाल्यानंतर पोलिसांनी पारंपरिक पध्दतीने तपासकाम न करता आरोपीला पकडण्यासाठी पाच-सहा पथके तयार केली व ती विविध ठिकाणी पाठवली. मोनिका ही एक प्रसिध्द व्यक्ती असल्याने या प्रकरणाचा वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्यासाठीच ही पथके तयार करण्यात आली.
एटीएममधील कॅमेर्‍यात
मिळाली आरोपीची छायाचित्रे
तपासकामाच्या दरम्यान सपना राज व्हॅलीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या एका सुरक्षा रक्षकाला कामावरून कमी करण्यात आले होते अशी माहिती मिळाली. पोलिसांनी त्याचे छायाचित्र मिळवले. एटीएममधून मयताचे कार्ड वापरून पैसे काढणार्‍या सुरक्षा रक्षकाची छायाचित्रे एटीएममधील कॅमेर्‍यामुळे मिळू शकली. ती छायाचित्रे व सुरक्षा रक्षकाचे छायाचित्र मिळते-जुळते असल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी बेंगळूर व मेंगळूर येथील हॉटेलात आरोपीचा शोध घेण्याचे काम हाती घेतले असता एका हॉटेलात तो सापडला. बेंगळूर पोलीस व गोवा पोलीस यांच्या संयुक्त पोलीस पथकाने आरोपीला पकडले.
आरोपीला पकडण्यासाठी बेंगळूरस्थित पोलीस निरीक्षक शशीधर व कॉन्स्टेबल बसवनगुडी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे गुप्ता यांनी सांगितले. खुनाच्यावेळी आरोपी हा एकटाच होता, असे सांगतानाच खुनामागील नक्की कारण व अन्य तपशील आरोपीला गोव्यात आणून त्याची जबानी घेतल्यानंतरच सांगण्यात येईल, असे गुप्ता यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उमेश गांवकर व म्हापशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी महेश गांवकर हेही हजर होते.
काकोडा खून प्रकरणी
तपासात प्रगती नाही
दरम्यान, काकोडा येथील खून प्रकरणी काही धागेदोरे सापडले आहेत काय, असे पत्रकारांनी विचारले असता पोलीस तपास चालू असल्याचे गुप्ता म्हणाले.