मोदींची हाक

0
18

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसंकल्प सभेच्या निमित्ताने गोमंतकीय मतदारांना पुन्हा एकवार साद घातली. यापूर्वी विकसित भारत सभेच्या निमित्ताने ते मडगावात आले होते, तेव्हा निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू झालेली नव्हती. तरीही दक्षिण गोव्याच्या मतदाराला समोर ठेवून त्याला आकृष्ट करणाऱ्या मुद्द्यांची उजळणी पंतप्रधानांनी तेव्हा अचूकपणे केली होती. परवाच्या साकवाळच्या सभेतही आपण कोणाला आवाहन करीत आहोत ह्याची पूर्ण जाण पंतप्रधानांच्या भाषणात दिसून आली. मच्छीमारी आणि पर्यटन व्यवसाय ह्या दक्षिण गोव्याच्या विशेषतः ख्रिस्ती मतदारांच्या जिव्हाळ्याच्या दोन विषयांवर पंतप्रधानांच्या ह्या भाषणाचा भर होता. विशेषतः मच्छीमारांसाठी आपल्या सरकारने वेळोवेळी केलेल्या कामाची जंत्री वाचून दाखवत आपले सरकार त्यांच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे हा संदेश पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून आवर्जून दिला. गरीब, शेतकरी आणि माताभगिनींचा उल्लेख करताना त्यामध्ये मच्छीमारांचा उल्लेख तर हटकून होताच, परंतु आपल्या सरकारने मच्छीमारी हे स्वतंत्र मंत्रालय कसे स्थापन केले, त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद कशी ठेवली, किसान क्रेडिट कार्डाचा लाभ मच्छीमारांनाही कसा मिळवून दिला, होडी खरेदीसाठी आपले सरकार आर्थिक सहाय्य कसे करते, मच्छीमारांचे विमासंरक्षण वाढवण्याचा आपल्या सरकारचा कसा प्रयास आहे वगैरेंवर पंतप्रधानांच्या ह्या भाषणात भर होता. मच्छीमारी उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात आणि जैविक सागरी वनस्पतींच्या शेतीमध्ये असलेल्या संधींकडेही त्यांनी आपल्या भाषणात अंगुलीनिर्देश केलेला पाहायला मिळाला.
गोव्याच्या, त्यातही दक्षिण गोव्याच्या जिव्हाळ्याचा दुसरा विषय म्हणजे पर्यटन. गोव्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण केलेल्या प्रयत्नांवरही पंतप्रधानांच्या भाषणाचा भर दिसून आला. कोरोनाने सगळे काम ठप्प झालेले असताना गोव्यामध्ये शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे काम सगळ्यांत आधी करण्यात आले, त्यामागे गोव्यातील पर्यटन उद्योग ठप्प होऊ नये हाच उद्देश होता असे पंतप्रधान ह्या सभेत म्हणाले. आपले सरकार हे दिल्लीत बसूनही गोव्याची बारकाईने चिंता करणारे सरकार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. जी 20 परिषदेपासून ब्रिक्सपर्यंत आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांसाठी गोव्याची निवड करून ह्या छोट्या राज्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्याचा आपण प्रयत्न केल्याचे स्मरणही त्यांनी यावेळी करून दिलेले पाहायला मिळाले. आपल्या कार्यकाळात आपण पर्यटनाला कसे महत्त्व देत आलो आहोत आणि त्यामुळे आपल्या काळात ई टुरिस्ट व्हिसासारखी पावले टाकली गेल्यामुळे, देशात येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे प्रमाण कसे दुप्पट झाले आहे व त्यामुळे विदेशी चलनही कसे दुप्पट मिळाले तेही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. आंतरराष्ट्रीय परिषद पर्यटनापासून विवाह पर्यटनापर्यंतच्या नव्या संधींचे सूतोवाचही त्यांनी आपल्या भाषणातून केले आहे. गेल्या दहा वर्षांत केलेले काम हा केवळ ट्रेलर असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. आपण अहोरात्र देशाचा विचार कसा करत असतो व आपली स्वप्ने ही स्वतःचा संकल्प मानून कसे अखंड कार्यरत असतो तेही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. गोव्यात झालेल्या विकासकामांचे दाखले दिले आणि आपल्याला अजून खूप काम करायचे आहे व गोव्याला आणि देशाला खूप पुढे न्यायचे आहे असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. वास्तविक, गोव्याच्या सभेआधी त्यांची कोल्हापुरात सभा झाली होती. त्या सभेमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी ठासून मांडला होता. परंतु तो मुद्दा गोव्याच्या सभेत पूर्ण टाळला गेल्याचे पाहायला मिळाले. येथे भर विकासाच्या संकल्पावर होता. गरीबांना तीन कोटी घरे देण्यावर होता, ज्या ज्येष्ठ नागरिकांना अद्याप आयुर्विमा संरक्षण मिळालेले नाही, त्यांना तेे मिळवून देण्यावर होता. त्यासाठी सभेला उपस्थित असलेल्यांनी आपला संदेश घरोघरी पोहोचवावा अशी हाकही पंतप्रधानांनी दिली. तुष्टीकरणाऐवजी संतुष्टीकरण ही आपली भूमिका राहिली असल्याचे ते म्हणाले. दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांच्या वादग्रस्त विधानाकडे निर्देश करायलाही ते विसरले नाहीत. गोव्याशी असलेल्या आपल्या भावनिक नात्यालाही पंतप्रधानांनी उजाळा दिला. आपल्या आयुष्यात गोवा हा टर्निंग पॉईंट ठरत आला आहे, पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आपल्या नावाची घोषणा गोव्यातूनच झाली होती, ह्याचाही मोदींनी उल्लेख केला. मोदी मौज करने के लिए पैदा नही हुआ है । मोदी दिनरात आपके सपनोंको जीता है । ह्या त्यांच्या वाक्यातून त्यांनी आपल्या आयुष्याचा क्षण न्‌‍ क्षण देशाच्या नावे कसा आहे हेच मतदारांवर ठसवले आहे. येत्या 7 मे रोजी मतदारराजा त्याला कसा प्रतिसाद देतो हे आता पाहावे लागेल.