मोदकप्रियः

0
138

मीना समुद्र

श्रीगणेश आध्यदेव. त्याच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून हे आद्य पक्वान्न जणू आलं असावं. तांदूळ हे आपलं आद्यान्न आणि ज्या नैसर्गिक माती-पाण्यापासून श्रीगणेशमूर्ती तयार झाल्या त्यातलंच श्रीफळ हे जणू आद्यफळ. यापासून तयार केलेलं हे पक्वान्न.

‘मोदकप्रियः’ हे गणपतीबाप्पाचं विशेषण मनाला खूप म्हणजे खूपच भावतं. गणपतीच्या चार हातांत पाश, अंकुश, वरदहस्त आणि अभयहस्त असे सर्वसामान्यपणे दाखवतात. पण बर्‍याच गणेशमूर्तीत त्याच्या एका हातात वा सोंडेत मोदक दाखविला जातो.
अभयवरदहस्तः पाशदन्ताक्षमाला
शृणिपरशुधधानो मुद्गरं मोदकं च
फलमधिमत सिंहः पंचमातंत्रवक्तो
गणपतिरातिगौरः पातु हेरम्बनामा
असं हेरंबगणपतीचं वर्णन आढळतं.
तर शंकराचार्यांनी-
मुदा करात्तमोदकं सदा विमुक्तिसाधकं
कलाधरावसंतकं विलासिलोकरक्षणम्
असं मोदकधारी गणेशाचं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्‍वरांनी शब्दब्रह्मगणेशाचं रूपवर्णन करताना त्याच्या हातात शोभणार्‍या मोदकाला अद्वैत वेदान्ताचं रूपक बहाल करीत म्हटलं आहे-
वेदान्तु तो महारसु| मोदकु मिरवे॥
दासबोधात समर्थ रामदासांनी-
शोभे परश आणि कमल| अंकुश तीक्ष्ण तेजाळ|
येके करी मोदक गोल| तयावरी अतिप्रीती|
असं म्हटलेलं आहे. असा हा मोदक म्हणजे मोद करणारा अर्थातच आनंद देणारा. त्याचा तो मनमोहक आकार, शुभ्र रंग, स्वाद, चव सारंच न्यारं. पंचपक्वान्नांत मोदकांचा समावेश असतोच. अवीट गोडीचं हे पक्वान्न. श्रीगणेश आध्यदेव. त्याच्या पूजेसाठी नैवेद्य म्हणून हे आद्य पक्वान्न जणू आलं असावं. तांदूळ हे आपलं आद्यान्न आणि ज्या नैसर्गिक माती-पाण्यापासून श्रीगणेशमूर्ती तयार झाल्या त्यातलंच श्रीफळ हे जणू आद्यफळ. यापासून तयार केलेलं हे पक्वान्न. लग्नमुंजीचा शुभारंभ करताना किंवा करंज्या करताना प्रथम मोदक करतात.

आमच्या लहानपणी तर हरितालिका आणि चतुर्थी (भाद्रपद शुद्ध तृतीया आणि चतुर्थी) या तिथी एकाच दिवशी आल्या की मन खट्टू होई. आई, मामी, काकू आणि घरातल्या ज्या कुणी मुली असतील त्या हरताळकेचा उपवास करत. त्यामुळे बायकांचा फलाहार आणि घरातल्या पुरुषांसाठी मात्र गोडाधोडाचं साग्रसंगीत जेवण. त्यातून बाप्पाला नैवेद्य म्हणजे पहिल्या दिवशी तरी उकडीचे मोदकच. सगळ्यांबरोबर ते खाण्यातली मजा औरच! नंतर दुसर्‍या, पाचव्या, सहाव्या दिवशी किंवा अनंतचतुर्दशीला केले तरी चतुर्थीची मजा ती चतुर्थीचीच असे वाटे.

दर महिन्याच्या विनायकीला (अमावस्येनंतरच्या शुक्ल चतुर्थीला) किंवा संकष्ट चतुर्थीला म्हणजेच पौर्णिमेनंतर येणार्‍या वद्य चतुर्थीला दिवसभर उपवास करून चंद्रोदयानंतर आरती-नैवेद्य दाखवून उपास सोडायचा असतो. तेव्हाही बरेच जण मोदकांचा नैवेद्य करतात. त्यात तळणीच्या मोदकांचाही (ओल्या किंवा सुक्या नारळात गूळ वा साखर घालून) समावेश असतो. पण उकडीचे मोदक ते उकडीचेच! भाद्रपदात तशा सरत्या पावसाळ्यातला अंतर्बाह्य ओल्या नारळाचा खवलेला किस (खोबरे) आणि त्यात केशरी, पिवळ्या गुळाचा कीस, भाजलेल्या खसखसाची पूड, जायफळ, वेलचीची पूड, केशर घालून केलेले सुवासिक तांदळाची उकड काढून- त्याला चुण्या पाडून- सारण भरून ते मोदकपात्रीत ठेवून- चाळणीवर वाफवून केलेले मोदक म्हणजे खरोखरच आनंद देणारा पदार्थ. त्याचा सुंदर आकार पाहूनच मन निवते आणि ते वाफवताना सुगंध दरवळू लागला की पोटात भुकेचा खोल खोल खड्डा पडतो. केळीच्या हिरव्यागार पानावर डाव्या हाताला लिंबू, चटणी, कोशिंबीर, पापड, कुरड्या भाजीसारखे पदार्थ, उजवीकडे भाजी, खतखते, आमटीचा द्रोण किंवा वाटी, उसळ (मूग किंवा पांढर्‍या वाटाण्याची), वर पुरणपोळी, वरणभात-दही, मसालेभाताची मूद, खीर आणि मध्ये ठेवलेले पांढरेशुभ्र वाफाळणारे मोदक असे साग्रसंगीत नैवेद्याचे भोजन आधी आपली दृष्टी खेचून घेते आणि मग भोजनाला सुरुवात करताच जीभ हळवी हळवी होत जाते ती मोदक सेवन करताना. जीभेचं ‘रसना’ हे नाव सार्थ होतं अशावेळी. नैवेद्य जरी ११ वा २१ मोदकांचा असला तरी गृहिणी त्याच्या पटीत मोदक करते. मोदकाचे तोंड उघडून रवाळ तुपाचा चमचा त्यात उपडा करून मग आस्वाद घेतल्यावर जणू परमसुख प्राप्त होते. कुणी तुपाऐवजी नारळाचे दाट दूध (अपरस) मोदकावर घेतात. मग मोदकांना अमृतोपम का म्हणतात ती पद्मपुराणात उल्लेखित गोष्ट आठवते. देवदेवतांनी अतिशय श्रद्धेने अमृतापासून निर्माण झालेला दिव्य मोदक पार्वतीला दिला तेव्हा बाल कार्तिकेय आणि बाल गणपती त्यासाठी हट्ट करू लागले. मग पार्वतीमातेने त्यांना सांगितले- ‘हा मोदक वास घेताच अमरत्व प्राप्त होतं. याचा वास घेणारा किंवा मोदक खाणारा संपूर्ण शास्त्रांचा मर्मज्ञ, सर्व तंत्रांत प्रवीण, लेखक-चित्रकार, ज्ञान-विज्ञान प्रवीण, तत्त्वज्ञ आणि सर्वज्ञ होतो तेव्हा पृथ्वीप्रदक्षिणा करून जो आधी येईल त्याला हा मोदक मिळेल.’ कार्तिकेय मयूरवाहनावर बसून निघाला; पण गणेशाने विचार केला की मातापिता हे पृथ्वीमोलाचे महत्त्वाचे आहेत. हे जाणून त्याने शिव-पार्वतीलाच प्रदक्षिणा घातली. त्याचे ते बुद्धिचातुर्य पाहून पार्वतीमातेने तो दिव्य मोदक गणेशाला दिला. जो त्याच्या मूर्तीच्या चतुर्हस्तांपैकी एकात सुशोभित असतो. त्याच्यासमोर ठेवलेल्या ताटात मोदकांची रास दिसते.

श्रीधराने शिवलीलामृतात बाल कार्तिकेय आणि बाल गणपतीचे भांडण मोठ्या मनोरमपणे रेखाटले आहे. त्यात या लंबोदराबद्दल कार्तिकेय म्हणतो- ‘मोदक बहु भक्षिले’ म्हणून तुझे पोट एवढे मोठे आहे. यशोदामातेच्या संकष्टव्रतसमापनाला केलेले मोदक बालकृष्ण मटकावतो आणि तिने चोरी पकडल्यावर मुख उघडून त्या मिषाने तिला विश्‍वरूपदर्शन घडवतो.

संस्कृत साहित्यातील राजा-राणी जलक्रीडा करीत असताना राणी राजाला विनवते, ‘मोदकैः ताडय माम्’ मला पाणी मारू नको. (मा उदकैः ताडय) पण विदूषक राजाज्ञेने मोदकाचे ताट हजर करतो.
एका मैत्रिणीने लेकीच्या लग्नात सीमांतपूजनाच्या भोजनाला मोदकाचा बेत ठेवला होता तेव्हा ‘यो मोदक सहस्रेण यजति स वांछित फलमवाप्नोति’ ही उपनिषदातली पंक्ती आठवली. ‘अन्नदाता सुखी भव’ असेच तृप्त उद्गार सर्वामुखी होते यात नवल नाही.

लग्नमुंजीसारख्या गोष्टींचा कार्यारंभ करताना गणेशपूजा आणि मोदकच केले जातात. पण एकीच्या पाठीवर दुसरी अशा सहा मुलीच असणार्‍या एका बाईने मुलासाठी संकष्टीला दिवसभर उपवास करून, २१ मोदकांचा नैवेद्य करून त्यातला एक मिठाचा ठेवला. तो लागेपर्यंतच तेवढेच खाण्याचा नवस केला. पहिला मिठाचा लागला तरी तिथेच जेवण थांबवायचे. हे ऐकून मुलामुलीत भेद अजूनही समाजात किंती खोल आहेत, किती अडाणीपणाने आणि अंधश्रद्धेने अजूनही लोक वागतात हे ऐकून बेचैन वाटले.

गालावरच्या खळ्यांसारखे कळीदार मोदक बनविणे ही कला सुगरणीलाच जमते. एकावर एक असे त्याच मोदकाच्या उकळीपासून ३ की ५ मोदक बनविले म्हणून आजीला चांदीचा करंडा मिळाला होता. त्याच्या झाकणाचा आकारही मोदकासारखाच. मोदकाच्या आकाराचा साचाही मिळतो हल्ली, त्यामुळे गृहिणीचे काम सोपे होते. या सुंदर, लोभस आकाराचा वापर करून हलवाई कलाकंद, केशर, गुलकंद, इलायची, आंबा यांच्या स्वादाने युक्त असे माव्याचे, काजूचे मोदकाकार पेढे बनवतात. साध्या गोल पेढ्यांपेक्षा गिर्‍हाईक याकडे जास्त आकृष्ट होतात.

मोदकाला लाडू (लड्डू) म्हटले जाते. पण लाडूचा आकार गोल किंवा किंचित बसकट. पण खरे मोदक हे नारळ-गूळ यांच्या सारणीचे उकडीचेच. तेच तुष्टी-पुष्टी देतात आणि मोदकप्रिय गणेशचरणी आपल्याला लीन करून अमृतानंद देतात.