>> म्हादईप्रश्नी गोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंटची मागणी
>> ३१ रोजी आंदोलन तीव्र करणार
भाजपकडून म्हादईचा राजकीय लाभासाठी वापर केला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादईप्रश्नी गोव्याच्या हिताचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याने त्यांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येत्या ४८ तासांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. म्हादई बचाव आंदोलन येत्या ३१ डिसेंबरला तीव्र केले जाणार आहे. म्हादई प्रश्नी मुख्यमंत्र्यांना कुठल्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी जाब विचारला जाणार आहे, असा इशारा गोवा प्रोग्रेसिव्ह फ्रंटचे निमंत्रक ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला.
केंद्र सरकारने गोव्याचा म्हादईप्रश्नी घात केला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची फसवेगिरी पुन्हा एकदा उघड झाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला कळसा – भांडुरा प्रकल्पाबाबत दिलेल्या पत्राबाबत गोवा सरकारने आक्षेप नोंदविल्यानंतर सदर पत्र स्थगित ठेवायला केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी एक महिन्याचा कालावधी घेतला. तर, कर्नाटकच्या मंत्र्याच्या पत्राला केवळ आठ दिवसांत पत्र स्थगित ठेवलेले नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत गोव्याच्या हितार्थ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. तथापि, केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी नवीन पत्र देऊन गोव्याचा घात करणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून गोवा सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना कोणतेही महत्त्व दिले जात नाही, अशी टीका शिरोडकर यांनी केली.
भाजपकडून म्हादईचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला जात असताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हादईच्या प्रश्नाबाबत गप्प बसून आहे, अशी टीका शिरोडकर यांनी केली.
राजकारण बंद करा
केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी म्हादईप्रश्नी केलेला विश्वासघात उघड केल्यानंतर भाजपच्या तीन आमदारांनी आपणाशी संपर्क साधला. म्हादईप्रश्नी केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून फसवणूक केली जात आहे, असा आरोप त्या आमदारांनी आपणाशी बोलताना केला. भाजपने म्हादई प्रश्नी सुरू केलेले राजकारण त्वरित बंद करावे. म्हादईच्या रक्षणार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना जाब विचारला जाणार आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरावे ः घाटे
केंद्र सरकारकडून म्हादईचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात असताना म्हादई नदी आईपेक्षा श्रेष्ठ, म्हादईचे रक्षण करण्यास कटिबद्ध असल्याची घोषणा करणारे मुख्यमंत्री डॉ. सावंत खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी मूक गिळून बसले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रत्यक्ष कृती करून म्हादईच्या रक्षणार्थ रस्त्यावर येऊन दाखवावे, असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिले.
केंद्राकडून म्हादईप्रश्नी गोव्यावर करण्यात येणारा अन्याय गोमंतकीय नागरिक किती काळ सहन करणार आहेत? म्हादईच्या रक्षणार्थ वेळीच कठोर भूमिका घेण्याची गरज आहे, असे प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.
कर्नाटक सरकारकडून म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्यास सुरुवात झाली आहे. पाणी वळविण्यासाठी भुयारी पाट बांधण्यात आलेले आहेत. कर्नाटककडून पाणी वळविले जात असले तरी गोवा सरकार गप्प बसून आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास सहा तालुक्यांवर त्याचा विपरित परिमाण होणार आहे, असे संतोषकुमार सावंत यांनी सांगितले.
कॉंग्रेस, आपतर्फे तीव्र संताप
कर्नाटकाच्या कळसा-भंडुरा प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुन्हा फसविल्याने गोव्यात तीव्र संतापाची लाट उसळत आहे. कॉंग्रेस, आप व इतर पर्यावरणप्रेमींनी सरकारविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा विचार चालविला आहे.
केंद्र सरकारने गोव्याचा विश्वासघात केल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. गोवा सरकारही पर्यावरण मंत्र्यांचे समर्थन करीत असल्याबद्दल आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधीने तीव्र संताप व्यक्त केला.
गोवा सरकारातील मंत्र्यांना व सत्ताधारी आमदारांना गोव्याच्या हीताची पर्वा नसल्याने मावळत्या वर्षात व नूतन वर्षाच्या सुरवातीस तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, लवकर समविचारी संघटनांची बैठक बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.