साळावलीतील ७२ धरणग्रस्तांच्या घरांसाठी प्रयत्न सुरू ः गावकर

0
125

साळावलीतील ७२ धरणग्रस्तांना किमान घर बांधण्यासाठी ४०० चौरस मीटरचा भूखंड मिळवून देण्यसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली. साळावली येथे बांधलेल्या धरणासाठी सांगे तालुक्यातील अनेकांना आपल्या जमिनी द्याव्या लागल्या. राज्य सरकारने धरणग्रस्तांसाठी अन्य ठिकाणी जमीन संपादीत करून सुमारे सहाशेच्या आसपास कुटुंबांचे पुनर्वसन केले. तरीही ७२ कुटुंबांना घर आणि शेतीसाठी भूखंड मिळू शकला नाही. मागील तीस ते पस्तीस वर्षे धरणग्रस्तांकडून सरकारी पातळीवर भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

तथापि, अजूनपर्यंत ७२ कुटुंबांना घर बांधण्यासाठी भूखंड मिळालेला नाही, असे आमदार गावकर यांनी सांगितले. महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात, जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांच्याकडे धरणग्रस्तांना घरासाठी किमान ४०० चौरस मीटरचा भूखंड मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. जलस्रोत खात्याने साळावली धरणग्रस्तांना घरासाठी ४०० चौरस मीटर आणि शेतीसाठी १० हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध केलेली आहे. जलस्रोत खात्याकडील जागेची मोजणी करून वंचित धरणग्रस्तांना घर बांधण्यासाठी भूखंड देण्यावर विचार केला जात आहे, असेही आमदार गावकर यांनी सांगितले.

साळावली धरणग्रस्तांना सरकारकडून दिलेली जमीन ही वर्ग २ मध्ये समाविष्ट होत आहे. यामुळे धरणग्रस्तांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही जमीन वर्ग १ मध्ये बदलण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असेही आमदार गावकर यांनी सांगितले.