मिकींनी संशयितांची नावे पोलिसांना द्यावीत : कॉंग्रेस

0
118

>> प्रार्थना स्थळांची मोडतोड प्रकरण

राज्यातील अल्पसंख्याकांच्या प्रार्थना स्थळांची मोडतोड करण्यामागे कुणाचा हात आहे हे जर मिकी पाशेको यांना माहीत असेल तर त्यांनी संशयितांची नावे पोलिसांना द्यावीत असे आव्हान काल कॉंग्रेसने दिले. उगीच खोटे आरोप करून कॉंग्रेस पक्षाचे नाव बदनाम करु नये, असा सल्लाही अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी मिकींना दिला.
मिकी पाशेको यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यात खुरीस व घुमट्यांची जी मोडतोड होत आहे त्यामागे कॉंग्रेसचाच हात असल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना चोडणकर म्हणाले की, जर माशेको यांना ही मोडतोड कोण करीत आहेत हे माहीत असेल तर त्यांनी त्यासाठी चौकशी करण्यात स्थापन केलेल्या विशेष चौकशी पथक व एटीएस यांच्याकडे संशयित आरोपींची नावे द्यावीत. त्यांनी ते केल्यास गोव्यावर मोठे उपकार होतील. पोलिसांनीही या संदर्भात पाशेको यांच्याकडून माहिती मिळवावी, असे ते म्हणाले.
केंद्रात व गोव्यातही भाजपची सत्ता आहे. पाशेको यांचे भाजपबरोबर जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी या संबंधांचा चांगला फायदा करून घेत आरोपींना पकडण्यासाठी मदत करावी, असा खोचक सल्लाही चोडणकर यांनी दिला.