राज्यसभेसाठी कॉंग्रेसचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही ः प्रदेशाध्यक्ष

0
61

राज्यसभेसाठी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार अजून ठरला नसल्याचे मावळते राज्यसभा खासदार व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल सांगितले.
राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरलेला नाही. त्याबाबत चर्चा चालू आहे. आता आमच्याकडे बहुमत नाही याची आम्हांला कल्पना आहे. मात्र, याचा अर्थ आम्ही ही निवडणूक लढवणार नाहीत असा मात्र कुणी काढू नये, असे नाईक यांनी स्पष्ट केले. आपण परत ही निवडणूक लढवणार नसल्याचे श्री. नाईक यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यांची दोन दिवसांपूर्वीच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे.
पोटनिवडणुकीविषयी गंभीर
दरम्यान, पणजी व वाळपई या मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीविषयी विचारले असता ते म्हणाले की, वरील दोन्ही मतदारसंघांत पक्ष गंभीरपणे निवडणूक लढवणार आहे. पणजी मतदारसंघातून पक्षातर्फे बाबुश मोन्सेर्रात यांना उमेदवारी देण्यात येणार आहे काय, असे विचारले असता ती शक्यता नाकारता येणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही मतदारसंघांसाठी मिळून चार-पाच इच्छुकांनी पक्षाकडे आपली नावे पाठवली असल्याचेही त्यांनी सांगितले.