मासळीतील फॉर्मेलीन ः विधानसभेत विरोधक आक्रमक

0
133

>> सभापतींकडून कामकाज दिवसभरासाठी तहकूब

परराज्यातून गोव्यात येणार्‍या मासळीत फॉर्मेलीन हे घातक व विषारी रसायन सापडल्याच्या प्रश्‍नावरून काल विरोधी कॉंग्रेस आमदारांनी सभागृहात गदारोळ माजवल्याने पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी विधानसभेत कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे सभापती प्रमोद सावंत यांना सकाळच्या सत्रात चार वेळा, तर दुपारच्या सत्रात एक वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दुपारचे सत्र २.३० वाजता सुरू झाले असता ते दिवसभरासाठी तहकूब करण्याची पाळी सभापतींवर आली.

काल सकाळी ११.३० वाजता विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले असता विरोधी कॉंग्रेस आमदारांनी फॉर्मेलीन प्रश्‍नी विधानसभेत जो स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे तो चर्चेस घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर यांनी सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे केली. यावेळी सभापतींनी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू केला असता कवळेकर यांनी आक्रमक भूमिका घेत सभापतींनी प्रश्‍नोत्तराचा तास तूर्त बाजूला ठेवावा व कॉंग्रेसच्या सर्व सोळाही आमदारांनी संयुक्तपणे फॉर्मेलीन प्रकरणी जो स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे त्यावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी सभापतींकडे केली.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा
मात्र, सभापती डॉ. सावंत यांनी विरोधकांची मागणी मान्य करण्यास नकार दिल्याने कॉंग्रेसच्या आमदारांनी नंतर सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन आपली मागणी लावून धरली.

यावेळी विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना सभापतींनी फॉर्मेलीन प्रश्‍नी लक्षवेधी सूचना मांडण्यात आलेली असून ती चर्चेला येणार आहे, त्यामुळे विरोधकांना या प्रश्‍नी जे काही सांगायचे आहे ते त्यांनी ह्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी सांगावे, अशी सूचना केली. मात्र, विरोधकांनी आपला हट्ट कायम ठेवताना स्थगन प्रस्ताव चर्चेस घेतल्याशिवाय अन्य कोणतेही कामकाज सुरू करून नये, अशी भूमिका घेतली. पण सभापतींनी ती मागणी धुडकावून लावून प्रश्‍नोत्तराचा तास सुरू केल्याने संतप्त बनलेल्या विरोधी आमदारांनी नंतर सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन दाद मागितल्याने ११.४५ वाजता सभापतींनी १२ वाजेपर्यंत म्हणजेच १५ मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पण तत्पूर्वी गोंधळाच्या वातावरणातच सभापतींनी आमदार राजेश पाटणेकर यांना आपला तारांकित प्रश्‍न विचारण्याची सूचना केली असता पाटणेकर यांनी दिल्लीच्या गोवा सदनासंबंधी प्रश्‍न विचारला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यावेळी उत्तर देण्यास सुरवात केली, पण विरोधकांनी यावेळी प्रचंड गदारोळ माजवल्याने सभापतींना कामकाज तहकूब करावे लागले.

जेव्हा १२ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले, तेव्हा सभापतींनी परत प्रश्‍नोत्तराचाच तास सुरू केला. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी अर्ध्यावर राहिलेले उत्तर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता विरोधकांनी परत सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली व गदारोळ माजवला. त्यामुळे सभापतींनी १२.१५ वाजता परत एकदा १५ मिनिटांसाठी म्हणजेच १२.३० वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले.

१२.३० वाजता जेव्हा पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा सभापती डॉ. प्रमोद सावंत यानी शोक प्रस्ताव चर्चेस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळीही कॉंग्रेस आमदारांनी परत एकदा आपली आसने सोडून सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन गदारोळ माजवल्याने सभापतींनी परत एकदा १५ मिनिटांसाठी म्हणजेच १२.४५ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. ह्या वेळी सभापतींनी विरोधकांना शिस्तीचे पालन करण्याची सूचना केली. पण विरोधक ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. फॉर्मेलीनचा विषय हा गंभीर आहे. गोमंतकीय हे मासळीप्रेमी असून त्यांना रोज आहारात मासळी लागते. त्यामुळे मासळीत फॉर्मेलीन घातल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतील हे सरकारने समजून घेण्याची गरज आहे, असे बाबू कवळेकर यावेळी म्हणाले.

‘ते’ गोमंतकियांचा जीव घेताहेत ः फालेरो
ह्या मासळी माफियांना पाठीशी घालू नका, ते गोमंतकीयांचा जीव घेत आहेत, असे उद्गार लुईझिन फालेरो यानी यावेळी काढले.
१२.४५ वाजता जेव्हा सभागृहाचे कामकाज परत सुरू झाले तेव्हा सभापती प्रमोद सावंत यांनी यावेळी पुन्हा शोक प्रस्तावच चर्चेस घेण्याचा प्रयत्न केला. परिणामी सभापती व विरोधक यांच्यात परत एकदा खडाजंगी झाल्याने सभापतींनी पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज २.३० वाजेपर्यंत तहकूब केले.
दुपारी अडीच वाजता भोजनोत्तर सत्रात विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी मासळीतील फॉर्मेलीनचा विषय पुन्हा लावून धरल्याने सभापतींनी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास
नकारामुळे विरोधक नाराज

आमदार निलेश काब्राल यांच्या मासळीतील फॉर्मेलीन संबंधीची लक्षवेधी सूचना स्वीकारण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी या लक्षवेधी सूचनेला उत्तर देणार आहेत, असे सभापती डॉ. सावंत यांनी दुपारच्या सत्राच्या सुरुवातीला स्पष्ट केले. तरीही कॉंग्रेस आमदारांचे समाधान झाले नाही. त्यांनी आपला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी लावून धरत सभापतींसमोरील जागेत पुन्हा एकदा जमल्याने सभापती डॉ. सावंत यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवार २० जुलै सकाळी ११.३० पर्यंत तहकूब केले.

कॉंग्रेस पक्षाच्या सोळा आमदारांनी मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्‍नावरून सादर केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यात न आल्याने कॉंग्रेसच्या आमदार नाराज बनले. सभागृहात सर्व आमदारांनी उभे राहून स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी केली.
लक्षवेधी सूचनेच्या उत्तराच्या वेळी कॉंग्रेसचा आमदार या विषयावर चर्चा करू शकतात, असे सभापती डॉ. सावंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच सभागृहाच्या दुपारच्या सत्रातील कामकाजाला सुरुवात करण्याची सूचना केल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेचा विषय मांडण्यास सुरुवात केली. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी स्थगन प्रस्ताव स्वीकारण्याची मागणी करून सभापती समोरील मोकळ्या जागेत एकत्र आले.

मासळीतील फॉर्मेलीन हा विषय राज्यातील जनतेच्या आरोग्याशी निगडीत आहे. या विषयावर चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका विरोधी कॉंग्रेसच्या आमदारांनी घेतली. या विषयावर चर्चेसाठी सोमवारी वेळ दिला जाईल, असे सभापती डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले. तरीही कॉंग्रेसच्या आमदारांचे समाधानझाले नाही.