भटका समाज बनतोय झुंडशाहीचा बळी

0
174
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवर पसरणारी सर्व माहिती खरीच असते हा समज आपला समाज आज अपरिपक्व असल्याचे लक्षण आहे. जमावाची असुरक्षिततेची भावना इतकी तीव्र असते की, त्यातून विवेकशक्ती क्षीण होऊन आपल्या कचाट्यात सापडलेल्या संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन न करता हिंसक मार्ग अवलंबून एका झटक्यात न्यायनिवाडा करतात..

आज सर्वत्र सवार्र्ंच्या मनात असुरक्षिततेच्या भावनेने धडकी भरली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे परप्रांतियांच्या येणार्‍या लोंढ्यावर आपले नियंत्रण राहिलेले नाही. जिकडे-तिकडे गर्दी वाढत चालल्यामुळे अफवांचे पीकही उग्र रूप धारण करीत आहेत. वाढत्या चोर्‍या, खून, बलात्कार यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवरही कोणाचा विश्‍वास राहिलेला नाही. पोलीस यंत्रणा आपल्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही हा समज दिवसेंदिवस दृढ होत चाललेला आहे. मुलांना पळवून नेणे, त्यांच्यावर होणारे अमानुष अत्याचार, भीक मागणार्‍या मुलांची वाढती संख्या, त्यांना पळवणार्‍या टोळ्यांची वाढती सक्रियता यापासून पोलीस यंत्रणा सुरक्षितता देण्यास कुचकामी ठरत आहे. ही यंत्रणा सक्षम असती तर अफवांवर विश्‍वास ठेवणारा जमाव कायदा आपल्या हातात घेण्यास धजावला नसता.

अफवा पसरवणे ही कला भारतीयांना चांगलीच अवगत आहे. यातील आपली तत्परता आणि वेग कमालीचा आहे. प्रकाशाचा वेग हा सर्वांत वेगवान असतो, असे वैज्ञानिकांनी सिद्ध केले आहे. मात्र आता अफवा प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करू लागल्या आहेत आणि मनुष्य आज भुतकाळातील घटनांमुळे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इतका अस्वस्थ आणि भयभीत झाला आहे की अफवांच्या धसक्याने काही विपरित घडले तर संपूर्ण दोष सरळ समाजाच्या माथी मारणे अन्यायकारक ठरेल आणि सोशल मीडियाकडे बोट दाखवणेही संयुक्तिक ठरणार नाही. स्वयंपाकघरात सुरी वापरणे क्रमप्राप्त आहे. परंतु कोणी त्याच सुरीने कोणाचा गळा कापत असेल तर तो सुरीचा दोष नसून मनुष्याच्या राक्षसी वृत्तीचा दोष आहे.

याआधी उत्तरेकडे अशा घटना घडत असत. आता त्याचे लोण दक्षिणेतही पसरत आहे. आपल्या गोव्यात अजून त्याचे लोण पसरले नाही हे एक सुदैवच म्हणावे लागेल, परंतु गोव्यात अशा घातक घटना घडणारच नाहीत हा समज तसा चुकीचा आहे, कारण गोव्यात आता बलात्कार, दरोडे, अपहरण, खून या घटनांची संख्या लक्षणीय असून यातील बहुसंख्य गुन्ह्यात परप्रांतीयांचा सहभाग असतो. पोलीस यंत्रणेविषयी जनतेचे मत सकारात्मक नाही. त्यामुळे अफवा आणि संशयाने पछाडलेला जमाव क्रूर आणि विकृत स्वरुप धारण करीत आहे. अनेक परप्रांतियांचा भंगार गोळा करण्याचा धंदा आज तेजीने चालू आहे. यात महिलाही असतात. त्या काखेत मोठ्या पिशव्या लटकवून कोणाच्याही घराच्या आवारात बिनदिक्कत फिरत असतात. घराबाहेरील सामान चोरण्यात त्यांचा हातखंडा आहे. जुन्या बंद असलेल्या घराची कौले काढून आतील किंमती सामान चोरण्याचा यांनी सपाटा लावला आहे. यात किशोरवयीन मुलांचा सर्रास वापर होत असल्याचे लक्षात आले आहे. आज गोव्यात भटक्या समाजातील माणसे भविष्य सांगण्याच्या आणि देव धर्माच्या नावाखाली घरांची पाहणी करतात आणि सामान लंपास करतात. अशा वृत्तीमुळे या लोकांवरचा विश्‍वास उडत चालला आहे. गावागावात दरोडे पडतात, महिलांवर सामूहिक बलात्कार होतात. पोलीसांचा धीम्यागतीने चालणारा तपास, सरकारी यंत्रणेची अनास्था यामुळे जनतेला वीस-वीस वर्षे न्याय मिळत नाही. त्यामुळे गावागावांत आता समांतर कायदा व्यवस्थेची यंत्रणा तयार होताना दिसते. गावात सशस्त्र तरुणांच्या टोळ्या रात्र-रात्र पहारा देत असतात. अशाने ही मानसिकता विचार न करता कोणाचा जीव घेण्यापर्यंत जाते. यात सोशल मीडियाच्या वाढलेल्या वापरामुळे अफवांचे पीक मुबलक येते. हे सर्वत्र काही सेकंदात थरार निर्माण करते, कारण कोणत्याही संदेशाची खातरजमा न करता त्यावर विश्‍वास ठेवून कोण प्रथम पुढे प्रसारित करतो याची चढाओढ यातील गांभीर्याचे आपले दायित्व विसरते. यात रस्ता अपघात, धार्मिक दंगल, प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू अशा घटनांच्या अफवा वारंवार प्रसारित होत असतात. व्हॉटस्‌ऍप, फेसबुक, ट्विटरवर पसरणारी सर्व माहिती खरीच असते हा समज आपला समाज आज अपरिपक्व असल्याचे लक्षण आहे. जमावाची असुरक्षिततेची भावना इतकी तीव्र असते की, त्यातून विवेकशक्ती क्षीण होऊन आपल्या कचाट्यात सापडलेल्या संशयिताला पोलिसांच्या स्वाधीन न करता हिंसक मार्ग अवलंबून एका झटक्यात न्यायनिवाडा करतात.

अनेक भटक्या जमाती अस्पृश्य नसतानाही जाती व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक बंधने आली. गुन्हेगारीचा शिक्का बसल्यामुळे लोक जवळ घेत नाहीत. शिक्षणाच्या प्रसाराचा अभाव, वैज्ञानिक दृष्टीचा अभाव, अंधश्रद्धा, दारिद्य्र, अपुरे उत्पन्न, अनेक वर्षे ही परंपरा सांस्कृतिक वारसा प्रत्येक पिढीतून आपल्या वारसांकडे वर्ग केला. परंतु याच संस्कारामुळे त्यांच्यात भीक मागण्याची वृत्ती आणि दारिद्य्र निर्माण केले. यातून परंपरेच्या मर्यादा ओलांडण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होत नाहीत. मनाने बांधलेल्या भिंती पाडण्याचे धाडस होत नसल्यामुळे उपजत प्रवृत्ती बदलली नाही आणि माणूस म्हणून असणारी प्रतिष्ठा माणसांकडून मिळत नाही. शिक्षण नसल्यामुळे नोकरी नाही आणि त्यामुळे पारंपारिक व्यवसायाशिवाय दुसरा पर्याय नाही.

भटक्या समाजाचे जे शिक्षित युवक-युवती आहेत त्यांच्या रोजगाराच्या सवलतींबद्दलच्या अज्ञानामुळे रोजगारापासून वंचित आहेत. कामधंद्यासाठी दारोदार भटकणे नशिबी आहे. प्रत्येक राज्यात आज परप्रांतीयांच्याविषयी प्रचंड मत्सर आणि द्वेषाची भावना रुजत आहे. याला मुख्य कारण त्यांनी बळकावलेला स्थानिकांचा रोजगार आणि त्यांची गुन्हेगारी वृत्ती. देशातील विविध प्रांतांतून या जमाती राज्यात स्थलांतरित होत आहेत. यातील काही जमातींना त्यांची स्वतःची जमीन नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी भटकंती पिढ्यान्‌पिढ्या चालू आहे.

आपल्याकडे गायन, अभिनय क्षेत्र कधीकाळी एकाच समाजाची मक्तेदारी होती. तेव्हा या समाजाला सामाजिक प्रतिष्ठा नव्हती. परंतु कालांतराने स्वतःच्या आर्थिक विकासाबरोबरच त्यांनी स्वकर्तृत्वाने प्रतिष्ठाही मिळवली. परंतु भटक्या समाजाच्या अनेक कला काळानुसार आणि रूचीनुसार बदलत्या स्वरुपामुळे लुप्त झाल्या आणि हा समाज बदलत्या प्रवाहातून बाहेर फेकला गेल्यामुळे तो मागासच राहिला. काळाच्या ओघात वंचित झालेल्या भारतातील अनेक समाजांबाबतीत विविध उपाययोजनांची त्वरित कार्यवाही करायला हवी. त्याचबरोबर ज्यांना अफवा पसरवण्यात अघोरी सुख मिळते त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाईची तरतूद हवी. सोशल मीडियावर बंदी घातली तर सोशल मिडियाच्या आधुनिक काळातील अत्यंत उपयुक्ततेला ठेच बसणार आहे. चुकीचे संदेश पाठवणार्‍यांवर नजर ठेवून कडक कारवाई करण्याचे संकेत व्हॉटस्‌ऍपतर्फे देण्यात आले आहेत, कारण उपाययोजना न करणे हे समाजाला अघोरी वृत्तीकडे नेणारे आहे आणि जर माणूस म्हणून दुसर्‍या माणसाचा विचार झाला तरच अशा भटक्या दुर्लक्षित समाजाला स्वीकारले जाईल. अन्यथा समाजकंटकांकडून निरनिराळ्या अफवा पसरवून अराजकता माजवण्याच्या प्रयत्नांत अशा दुर्बळ घटकांचा बळी जातच राहील…