माविन गुदिन्हो यांचीही कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी

0
139

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पक्षाच्या विरोधात काम करणार्‍यांना यापुढे उमेदवारी दिली जाणार नाही. त्यामुळे दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.गुदिन्हो कोणत्याही क्षणी पक्ष सोडून जाऊ शकतात, असे कवठणकर यांनी सांगितले. सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्या विरोधात कारवाई करण्याचे यापूर्वीच ठरविले होते. पक्षशिस्तीच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करण्याचा आदेश पक्ष श्रेष्ठींनी दिला आहे, असे ते म्हणाले. कॉंग्रेसमुळे मॉविनना महत्त्व आले. दाबोळी मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदार त्यांच्यावर नाराज असून त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान यावेळी कॉंग्रेसचे पदाधिकारी वामन चोडणकर यांनी दिले.
दरम्यान, गेल्या मंगळवारी कॉंग्रेस पक्षाने सांताक्रुझचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांची हकालपट्टी केली होती. पणजी पोटनिवडणुकीत पक्षाविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. बाबुश यांच्यावरील कारवाईला अवघे तीन दिवस लोटले असतानाच राज्य कॉंग्रेस कार्यकारिणीने आमदार माविन गुदिन्हो यांच्यावरही कारवाई केली असल्याने कॉंग्रेस गोटात खळबळ माजली आहे.
लुईझिन फालेरो यांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून पक्षाच्या आमदारांवर करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. मात्र, बाबुश यांना पक्षातून हाकलण्यात आले असले तरी त्यांची पत्नी तथा ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांच्यावर पक्ष कारवाईचा बडगा उगारणार नसल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हा पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असताना कॉंग्रेस पक्षाने शिस्तीच्या नावाखाली कठोर निर्णय घेण्याचे सत्र अवलंबिले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
काढूनच दाखवा; माविनचे आव्हान
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना कॉंग्रेस नेत्यांनी आपल्याला पक्षातून काढून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. यामुळे हे हकालपट्टी नाट्य बरेच रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.