माळा

0
9

(क्षणचित्रं… कणचित्रं…)

  • प्रा. रमेश सप्रे

आपल्या श्रमाचं सार्थक झालेलं पाहून आजी-आजोबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे. आणि आता तो ओलावाच सुकल्यामुळे साऱ्या जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्यानं अडगळ म्हणून फेकल्या जाऊ लागल्याहेत. त्या माळ्यालासुद्धा आपण मोकळं, स्वच्छ होत असताना वाईट वाटत असेल.

माळ (फुलांची, मण्यांची) या शब्दाचं अनेकवचन म्हणजे हा माळा नव्हे. आजच्या पिढीला माहीत नसलेला आणि नवीन गृहरचनेमध्ये अपवादानं आढळणारा हा घरातला माळा. इंग्रजीत याला म्हणतात- लॉफ्ट किंवा ॲटिक! ‘घरातल्या माळ्यामुळे मी माणसात आलो’ हे त्या वक्त्याचं पहिलंच वाक्य ऐकून अनेकजण बुचकळ्यात पडले. कारण ‘बागेतल्या माळ्यामुळे…’ हेच श्रोत्यांना माहीत होतं. वक्ता पुढे सांगू लागला- “आमचं आडनाव लांडगे. नावाप्रमाणेच माझा स्वभाव; त्यातही उद्धटपणा. म्हणून सारे मला ‘दंडगे लांडगे’-हल्लीच्या भाषेत ‘दबंग लांडगे’ म्हणत. सर्वदुर्गुणसंपन्न हा आमचा परिचय होता. प्रपंच जणू वाऱ्यावर सोडून दिलेला. अन्नवस्त्राची सतत उणीव; कारण निरनिराळी व्यसनं. एकदा दत्तमहाराजांच्या मंदिरात कीर्तन ऐकायला गेलो. तो जीवनातला प्रकाशाचा क्षण (टर्निंग पॉईंट) होता. दत्तात्रेयांचा फोटो आणला. पूजा सुरू केली. पण एका खोलीच्या संसारात उपासनेसाठी शांती मिळेना. मित्रानं सुचवलं, ‘सुताराकडून भक्कम लाकडी माळा बनवून घे. त्यावर चढून, शांत बसून उपासना कर. नामाचा पाऊस पडेल. ध्यानात समाधी लागेल.’ झालं, लगेच माळा तयार केला. त्यावर चढून, पडदा सोडून दत्तमहाराजांशी संवाद सुरू झाला. तासन्‌‍तास… कधीकधी रात्रीच्या रात्री! आणि सारं जीवनच बदललं. देवचाराचा (भुताचा) देवमाणूस झालो. सर्वजण मान द्यायला लागले. मी मात्र याचं सारं श्रेय त्या माळ्याला देतो. गळ्यात तुळसीची माळ नसली तरी चालेल, पण उपासनेसाठी घरात माळा मात्र हवा,” हा त्याचा जगावेगळा संदेश.
श्रीरामकृष्ण परमहंस म्हणायचे ना- ‘उपासना करायची तर ती जनात- नाहीतर वनात- नाहीतर कोनात (घराच्या कोपऱ्यात)- नाहीतर मनात.’ हा माळा म्हणजे घराचा कोनाच जणू! काका रात्री अकरा वाजता आले अन्‌‍ विचारलं, “बाबा कुठेयत?” “माळ्यावर!” हे उत्तर ऐकून आश्चर्य वाटलं नि काका माळ्याकडे आले. “काय शोधतोयस रे इतक्या रात्री नि तेही माळ्यावर?” बाबांचं तोंड माळ्याच्या भिंतीकडं असल्यानं नि सगळ्या अडगळीमुळं नीट ऐकू आलं नाही म्हणून आई म्हणाली, “युवराजांनी आत्ता सांगितलं, ‘उद्या रॉकेट करून नेलं नाही तर वर्गात घेणार नाहीत.’ दोन लिटर थंड पेयाची बाटली काढण्यासाठी हे वर चढलेयत. सारा पसारा माळ्यावर टाकतो ना आम्ही!” अखेर हाश्शहुश्श करत बाबांनी विजयी सम्राटाप्रमाणे ती बाटली काढून दिली. त्यावेळी त्यांच्या मस्तकावर मुकुट होता कोळ्यांच्या जाळी-जळमटांचा. असो. एकूण काय- उपयोग झाला की ती वस्तू फेक माळ्यावर- या ‘जीवनशैली’मुळे माळा म्हणजे एक ‘समृद्ध अडगळ’ झालाय. विशेषतः तरुणवर्गासाठी. आजी-आजोबा, आई-बाबा यांच्या जीवनाशी आतून जोडल्या गेलेल्या, भावनांशी निगडित असलेल्या म्हणून स्मृतिकोशात जपलेल्या अनेक लहानमोठ्या वस्तू घरात जागा नसल्यामुळे माळ्यावर ठेवल्या जायच्या, नि तिथं तयार व्हायची ‘आठवणींची कोठी’ (स्टोअर हाऊस ऑफ मेमरीज). परवाच घडलेली एक घटना. वडिलांचं निधन होऊन सुमारे महिना होत आल्यावर आईचा विरोध असूनही मुलानं नि सुनेनं माळा रिकामा करायचं ठरवलं. स्वतःला कष्ट नकोत म्हणून नेहमीच्या भंगारवाल्याला (स्क्रॅपवाल्याला) बोलावून त्याच्या माणसांकडून माळा रिकामा करायला सुरुवात झाली. स्क्रॅपवाला त्या घरातल्या तीन पिढ्यांना श्रद्धापूर्वक ओळखत होता. माळ्यावरून काढल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंशी त्याच्या भावना जोडलेल्या होत्या. अनेक प्रसंगांना तो स्वतः साक्षीदार होता. उदा. आकाशदिव्याचा सांगाडा. आजोबांनी थरथरत्या हातांनी टाकाऊतून टिकाऊ असा बनवला होता तो सांगाडा (फ्रेम). त्याला आजी थरथरत्या हातानं दरवर्षी नवे रंगीबेरंगी पारदर्शक कागद चिकटवायची. बाबा गच्चीवर एका काठीला तो बांधायचे नि त्यात इलेक्ट्रिकचा दिवा सोडायचे. नंतर साऱ्या मंडळींनी समोरच्या रस्त्यावर येऊन तो आकाशदिवा आनंदानं पाहायचा. आता तो भंगारात टाकणारा मुलगा त्यावेळी छोटा होता. तो आनंदानं उड्या मारत टाळ्या वाजवायचा. श्रमाचं सार्थक झालेलं पाहून आजी-आजोबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायचे. आई-बाबांच्या डोळ्यांच्या कडाही ओलावत. आता तो ओलावाच सुकल्यामुळे साऱ्या जुन्या गोष्टी कालबाह्य झाल्यानं अडगळ म्हणून फेकल्या जाऊ लागल्याहेत. त्या माळ्यालासुद्धा आपण मोकळं स्वच्छ होत असतानाही वाईट वाटत असेल. असो. एका नाटकात एका पात्राची भूमिका (रोल) मार्मिक आहे. ती व्यक्ती कायम व्हीलचेअरवर असते. तिला कुणीतरी ढकलत स्टेजवर आणलं. आजूबाजूला पाहत ती व्यक्ती एक मर्मभेदक प्रश्न विचारते. इतर मंडळींना तो प्रश्न अशुभ-अभद्र वाटतो. ते लगेच त्याला स्टेजबाहेर विंगेत ढकलून देतात. एक नमूना पहा- काका माळ्यावर चढलेयत. काहीतरी जमवाजमव करतायत. व्हीलचेअरवाली व्यक्ती विचारते, ‘काय करताय काका?’ कौतुकानं काका म्हणतात, ‘अरे तुला छोटा भाऊ झाला ना? त्याच्यासाठी पाळणा काढतोय!’ यावर ती व्यक्ती विचारते, ‘दरवर्षी आपल्याकडे कुणीतरी जन्मतं, तसंच मरतंही. मग पाळण्याबरोबर माळ्यावर तिरडीही आहे का?’ लगेच त्याची रवानगी विंगेत होते. सदावर्ते नावाचं एक सरदार घराण्यातलं कुटुंब. अनेक गरजूंसाठी, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी कृतज्ञ नि कर्तव्यभावनेनं मोफत अन्नदान करणारं कुटुंब. कालांतराने परिस्थिती बदलल्यामुळे ती प्रथा बंद पडली. पण अन्न शिजवायची स्वयंपाकाची मोठीमोठी भांडी मात्र माळ्यावर ठेवली गेली. वृद्ध मंडळी काळाच्या पडद्याआड गेल्यावर तरुण पिढीनं सारी भांडी ‘ओएलएक्स’ या माध्यमातून ऑनलाइन विकूनही टाकली. काय म्हणणार यावर? त्यांना दुसऱ्या एका अन्नदान केंद्राला ती भांडी दान करावीशी वाटले नाही. असो. इतिहासात अमर झालेला एक माळा. कार्ल मार्क्स या साम्यवादाच्या जनकाला जर्मनीतून पळून जाऊन लंडनमध्ये आसरा घ्यावा लागला. अन्याय, भूक, गरिबी, शोषण यांच्या स्वानुभवातून त्यानं सामाजिक समानतेवर आधारित विचारसरणी जगापुढे मांडली. या क्रांतिकारक चिंतनामुळे पुढे रशिया, चीनसारख्या देशांत क्रांती घडून आली. या साऱ्या विचारांचं लेखन मार्क्सनं एका माळ्यावरच केलं. तसं पाहिलं तर विचारमंथन- लेखनासाठी माळा आदर्श जागा आहे, नाही का?