माध्यम प्रश्‍नावर तोडगा काढा : राणे

0
78

गेल्या बर्‍याच काळापासून शिक्षण माध्यम प्रश्‍नावर आंदोलन चालू असून त्यातून काय निष्पन्न होईल हे कळण्यास मार्ग नाही. परंतु या प्रश्‍नावर तोडगा काढला पाहिजे, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी सांगितले.

भाषा हा प्रश्‍न असू नये. आजच्या जागतिकीकरणाच्या वातावरणात त्याला विशेष महत्त्व नाही. खरे म्हणजे येथील विद्यार्थ्यांना पोर्तुगीज भाषा कळण्याची गरज होती. पोर्तुगीज दाखल्यांचा अनुवाद करून घेणे हे आव्हान ठरले आहे. पोर्तुगीज कळली असती तर फायदा झाला असता, असे राणे म्हणाले. आपल्याला गुजरातीसह पाच भाषा बोलता येतात, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, असे सांगून व्यावसायिक शिक्षकांना सेवेत नियमित करण्याची गरज राणे यांनी व्यक्त केली. भटक्या गुरांच्या समस्येवर तोडगा काढण्यास सरकारला अपशय आल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने कोणत्या प्रकारचे उद्योग आणलेत व किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली. गुंतवणूक प्रोत्सहन मंडळामुळे समस्या निर्माण होणार अशी भीती त्यांनी व्यक्त केली. राज्याचा विकास नियोजनबद्ध झाला पाहिजे, असे राणे यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयाने किती कुळांचे खटले निकालात काढले, असा प्रश्‍न करून न्यायालयात अन्य खटले पडून आहेत. त्यामुळे शेतकरी कुळांना न्याय मिळेल, असे वाटत नाही, असे राणे यांनी सांगितले. सरकारने कृषी क्षेत्राचा विकास केला आहे का, असा प्रश्‍न करून पूर्णस्वरूपी नारळ विकास मंडळ अद्याप झालेले नाही, असे ते म्हणाले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून ‘उडता गोवा’ निर्माण होण्याच्या वाटेवर आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असल्याचे सांगून अभियांत्रिकी महाविद्यालयातही अमली पदार्थ सापडले. दुर्गम भागातही अमली पदार्थांची लागवड केली जात आहे. या प्रकारामुळे पुढील पिढी बरबाद होईल, असा इशारा देऊन या गैरव्यवसायात गुंतलेल्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले. शिक्षक व पालक या नात्याने मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करावा, असा सल्ला राणे यांनी दिला.