मातृहृदय… ममतेचे लेणे!

0
203
  • ज. अ. रेडकर.
    (सांताक्रूझ)

आई… जवळ असते तेव्हा तिची थोरवी आपणाला कळत नाही पण ती जेव्हा देवाघरी निघून जाते तेव्हा तिच्या नसण्याने जीव व्याकूळ होतो. आठवणीने डोळे भरून येतात. कंठ रुद्ध होतो. आपण तिला कधीतरी दुखावले होते याचा पश्चात्ताप होतो. पण माफी मागायची वेळ टळून गेलेली असते.

‘आईसारखे दैवत सार्‍या जगतात नाही, म्हणुनी का श्रीच्या नंतर येते अ.. आ.. आई?’, हे गीत तुम्ही नक्की ऐकले असेल. आईची महती काय वर्णावी! मातृहृदय आपल्या मुलांविषयी किती कोमल असते याच्या अनेक कथा अगदी बालपणापासून आपण वाचत/ऐकत आलो आहोत. आपल्या प्रेयसीसाठी मातेचे काळीज घेऊन जाणारा मुलगा ठेच लागून खाली पडतो, त्याच्या हातातील काळीज देखील रस्त्यात पडते. त्यावेळी त्या काळजातून अवचितपणे शब्द उमटतात, ‘बाळ, तुला लागलं तर नाही ना?’ ही कथा ऐकताना किंवा वाचताना बालमन हेलावलेले असते, डोळे भरून आलेले असतात. प्रेयसीसाठी आपल्या आईचे काळीज काढून घेणारा तो मुलगा क्रूर, दुष्ट राक्षस वाटायला लागतो. कारण बालमन अजाण असते. हळवे असते. असे काळीज काढून कुणाला देता येत नाही किंवा शरीरातून वेगळे केल्यावर काळीज बोलू शकत नाही हे त्यावेळी माहीत नसते. आई ही मुलांची हक्काची जागा असते. सगळे हट्ट केले जातात ते आईकडे! वडिलांकडे काही मागायचे तेदेखील आईमार्फत! आईची भीती मुलांना कधीच वाटत नाही. वडिलांचा मात्र धाक वाटत असतो. आईंची वेडी माया मुलांसाठी काहीही करायला तयार असते.

शिवरायांच्या काळातदेखील अशीच एक घटना घडली होती. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याच्या राजधानीचा गड म्हणून रायगड बांधून घेतला. अत्यंत उंच ठिकाणी आणि दुर्गम ठिकाणी वसवलेला हा किल्ला. शत्रूपासून सुरक्षित! पश्चिमेचा कडा वगळता गडाच्या अन्य तिन्ही दिशांना बुरूज बांधले पण पश्चिमेची बाजू बुरुजाविना ठेवली कारण त्या बाजूने शत्रू येऊच शकणार नाही अशी या घातक कड्याची नैसर्गिक रचना आहे. पायथ्यापासून २७०० फूट उंच असणारा हा सरळसोट कडा काळ्याकभिन्न पत्थरांचा आहे. कितीही चिवट शत्रू असला तरी हा कडा चढून येणे शक्य नाही ही खात्री पटल्यावरच ही बाजू महाराजांनी बुरुजाविना मोकळी सोडली होती. वरून पडणारं पाणी खाली जाऊ शकेल किंवा खालून येणारा वारा वर पोहोचू शकेल पण कोणताही प्राणी खालून वर किंवा वरून खाली जाऊ शकणार नाही असं बोललं जायचं! अशा या दुर्गम किल्ल्यासाठी महाराजांनी नियम घालून दिला होता की, सूर्योदयाला गडाचे दरवाजे उघडतील आणि सूर्यास्ताला बंद होतील. दरवाजे बंद झाल्यानंतर खुद्द महाराज जरी गडाच्या दरवाजाबाहेर आले तरी गडाचे दरवाजे उघडायचे नाहीत.. असा कडक दंडक होता. महाराजांची आज्ञा मोडायची हिम्मत कुणात होती!
गडाच्या पायथ्याशी असणारे कुणबी लोक उजाडताच आपली मीठ-भाकर घेऊन गडावर कामकाजासाठी यायचे आणि दिवस मावळण्या आधी गडावरून खाली उतरायचे. गडावर ऋतुमानानुसार होणारे सर्व सणवार साजरे केले जायचे. शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव गडावर मोठ्या उत्साहात साजरा व्हायचा. गडावरील आणि पायथ्याशी राहणारे सगळे लोक या उत्सवात सामील होत. गडावर लोककला सादर केल्या जात. गाणी, नृत्य, कसरती, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांचे खेळ होत. सर्वांना उत्तम भोजन दिले जाई. उत्तररात्री चंद्र आपल्या चमचमत्या तारकांसह माथ्यावर आला की सर्वांना मसालेदार मधुर दूध प्यायला दिले जाई. पायथ्याशी असलेल्या गावातील गवळणी सकाळपासूनच आपापल्या घरून दुधाचे हंडे घेऊन गडावर येत असत.

जीवा या महाराजांच्या विश्वासू शिलेदाराची कारभारीण- हिरकणी हीदेखील दुधाचा हंडा घेऊन गडावर आली. तिथे चालू असलेल्या कार्यक्रमात दंग झाली. सूर्य कधी मावळला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. नियमानुसार गडाचे दरवाजे बंद झाल्याची तुतारी वाजली आणि हिरकणी भानावर आली. लगबगीने ती गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आली. दरवाजा तर बंद! आता काय करायचं? हिरकणीच्या डोळ्यासमोर मोठ्ठाले प्रश्‍नचिन्ह तिने द्वाररक्षकाची विनवणी केली. ‘माझं तान्हं बाळ घरी एकलं हाय, त्याला भूक लागली आसल, ते रडत आसल. त्याला पाजाया पायजेल. दादा, मला जाऊ द्या भाईर!’ पण द्वारपाल महाराजांची आज्ञा मोडून तिला कसं जाऊ देणार होता? बरं, दया येऊन जाऊ दिलं असतं व दुसर्‍या दिवशी महाराजांच्या कानी ही वार्ता गेली तर आपलं मरणच की! म्हणूनच हिरकणीने कितीही गयावया केली तरी द्वारपाल काही दरवाजा उघडायला तयार होईना. हिरकणीचा जीव सैरभैर झाला. वेड्यासारखी ती इकडून तिकडे धावत सुटली. कुठे वाट सापडते का पाहू लागली. शेवटी ती या मोकळ्या कड्यापाशी आली जिथे बुरूज नव्हता. मात्र वरून खाली नजर टाकली तर डोकं गरगरेल एवढी खोल दरी! अंधार तर दाटून येत चालला होता. त्या सुळक्या सदृश कड्यावरून खाली जाणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण! परंतु हिरकणीचे मातृहृदय आपल्या तान्हुल्याच्या आठवणीने व्याकूळ झालं होतं. एवढ्यात गस्तीवरचा शिपाई तिथे पोहोचला. त्याने हिरकणीला अडवलं. म्हणाला, ‘अग ए बये, तू हिकडं काय करतीस? चल, फिर मागं, मरायचं हाय व्हय? चल हो तिकडं!’ हिरकणीला काहीच सुचेना. काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली. सतत तिला आपल्या लेकराची आठवण येत होती. भुकेने लेकरू रडत असेल ही गोष्ट तिला अस्वस्थ करीत होती. तिने सगळा धीर एकवटला आणि पाठमोर्‍या झालेल्या गस्तीवरच्या त्या शिपायाच्या डोक्यात हाताला मिळाला तो धोंडा सर्व शक्तिनिशी मोठ्या हिमतीनं हाणला. अचानक झालेल्या हल्ल्याने आणि वर्मी बसलेल्या घावाने शिपाई आडवा झाला, मूर्च्छित पडला. हिरकणीने लगबगीनं त्याचं मुंडासं ओढून घेतलं आणि तिने पश्चिमेकडे धाव घेतली. तिथल्या एका पाषाणाला तिने मुंडाशाचे एक टोक बांधलं आणि उर्वरित भाग दरीत सोडला. तिने डोळे घट्ट मिटले, आपल्या कुलदैवताचं- गिरोबाचं स्मरण केलं, हर हर महादेवाचा गजर केला आणि मुंडाशाच्या पदराला धरून ती दरीत झेपावली. धडपडली. कड्यावर आपटली, झुडपांचे काटे हातापायात रुतले, ओरखडे उठले, अंगावरची वस्त्रे फाटली. पण हिरकणीला कश्शा कश्शाचे भान नव्हतं. तिच्या कानात आणि मनात फक्त आपल्या तान्ह्या बाळाचं रडणं घुमत होतं. मुंडाशाच्या पदराला धरून ती खाली येऊ लागली. पदराचं शेवटचं टोंक आता तिच्या हातात उरलं होतं पण तळ तर अजून खूपच खाली होता. हिरकणीच्या जिवाची घालमेल झाली. तिने जिवाच्या आकांताने खाली उडी मारली. सुदैवाने तिची उडी कपारीतून उगवलेल्या एका झुडपाच्या बेचक्यात पडली म्हणून ती वाचली. तिथून सरपटत, आपटत धोपटत, कोलांट्या खात कशीबशी हिरकणी तळाशी पोहोचली. तिन्हीसांजेच्या काळोखातून घायाळ हरिणीसारखी हिरकणी आपल्या चंद्रमौळी झोपडीकडे झेपावली. झुल्यात रडणार्‍या बाळाला तिने पोटाशी धरले. एका मोठ्या दिव्यातून हिरकणी पार पडली होती.

दुसर्‍या दिवशी महाराज आपल्या मोहिमेवरून गडावर परतले. त्यांना ही हकिगत समजली आणि ते दिग्मूढ झाले. एका बाजूला हिरकणीच्या धाडसाचे कौतुक आणि बाळाविषयी वाटणारे तिचे अगाध मातृप्रेम याबद्दल आदर तर दुसर्‍या बाजूला रायगडचा पश्चिम कडा अजिंक्य नाही याची झालेली जाणीव! महाराजांनी हिरकणीला सदरेवर बोलावले. महाराज आपणाला आता मोठी शिक्षा करणार याची भीती तिला वाटत होती कारण तिने राजांचा नियम मोडला होता. हिरकणी भितभित आपल्या तान्ह्या बाळासह दरबारी हजर झाली. दरबारातील सर्वांचेच डोळे महाराजांच्या निर्णयाकडे लागले होते. हिरकणीला आता मोठी शिक्षा होणार असेच सर्वांना वाटत होते. पण महाराज गुणग्राहक होते. विचारी होते. एका मातेचे हृदय आपल्या तान्ह्या बाळासाठी जिवाची पर्वा करीत नाही हे त्यांना जाणवले. मग अशावेळी नियमांची काय मातब्बरी? महाराज स्वतःच्या मनाशी बोलत होते.
महाराजांनी हिरकणीला आपादमस्तक न्याहाळले. तिच्या हातापायावर, चेहर्‍यावर झालेल्या असंख्य जखमा पाहिल्या. महाराजांच्या हृदयात कालवाकालव झाली. राजे आसनावरून उठले, हिरकणीच्या डोक्यावर आपला आश्वासक हात ठेवला. तिच्या बाळाला मायेने गोंजारलं. राजांनी हिरकणीची खणा नारळाने ओटी भरण्याचे आणि पालखीतून तिला तिच्या घरी सन्मानाने पोचविण्याचे आदेश दिले. तिचा असा बहुमान तर केलाच पण रायगडाच्या पश्चिमेला- ज्या ठिकाणाहून ती गड उतरली होती तिथे बुरूज बांधून त्याला- ‘हिरकणी बुरूज’ हे सार्थ नाव दिले. हिरकणीचे नाव इतिहासात अजरामर झालं. तिच्या आयुष्याचं सोनं झालं !
मातृ-पितृ प्रेमाच्या अशा असंख्य कथा आपण वाचतो/ऐकतो. परंतु असेच उत्कट प्रेम मुलांना आपल्या जन्मदात्यांविषयी वाटते काय? वृद्ध व अंध माता-पित्याला कावडीत बसवून तीर्थयात्रेला नेणारा श्रावणबाळ आता होणे नाही. आई-वडिलांच्या सेवेत गुंतलेला भक्त पुंडलिक आता पांडुरंगाला विटेवर तिष्ठत ठेवणार नाही. मुले अजाण असेपर्यंत आपल्या आई-वडिलांच्या अवतीभवती घुटमळतात. हट्ट करतात. पण मोठी झाली, कमावती झाली, त्यांची लग्नकार्ये झाली की त्यांचे वागणे बोलणे बदलते. आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा बायकोचे प्रेम मुलाला अधिक मोठे वाटू वाटते. आई त्यागाची तर पत्नी भोगाची प्रतीके आहेत. याचा समतोल ज्याला साधता येतो तोच जिंकतो.

अंतरीच्या कळा फक्त एक आईच समजू शकते. मूल कितीही वाईट वागले तरी वडील नाही पण आई त्याला माफ करते. ईश्वराला आपल्या असंख्य भक्तांकडे एकाच वेळी पोहोचता येत नाही म्हणून त्याने म्हणे आईची निर्मिती केली. म्हणून तर तिला ‘मातृ देवो भव’ म्हटले जाते. आई ही खरेच ईश्वरस्वरूप आहे, ती वात्सल्यसिंधू आहे, कळवळ्याचा अथांग सागर आहे, ममतेचं दिगंत आकाश आहे. आई… जवळ असते तेव्हा तिची थोरवी आपणाला कळत नाही पण ती जेव्हा देवाघरी निघून जाते तेव्हा तिच्या नसण्याने जीव व्याकूळ होतो. आठवणीने डोळे भरून येतात. कंठ रुद्ध होतो. आपण तिला कधीतरी दुखावले होते याचा पश्चात्ताप होतो. पण माफी मागायची वेळ टळून गेलेली असते.
ज्यांची आई हयात असेल ते खरोखर भाग्यवंत! त्यांना एकच विनंती, आपल्या आईला कोणत्याही कारणासाठी आणि कुणासाठीही दुखवू नका. जगातील इतर सर्व गोष्टी तुम्हाला परत मिळू शकतील, बायकोदेखील दुसरी मिळेल, पण आई नाही मिळणार. तिची काळजी घ्या. आईचे मुलावरचे प्रेम कधीच खोटे नसते. तुमच्याकडूनदेखील ती तशाच प्रेमाची अपेक्षा करीत असते, तिची उपेक्षा करू नका. एवढे ध्यानात ठेवले तरी पुरेसे होईल!