कस्तुरीचे ज्ञान

0
203
  • गौरी भालचंद्र

आपण आपला आनंद आपल्यासमोर असणार्‍या सुंदर गोष्टीत मानून ती सुंदरता पाहण्याचं, उमगण्याचं आणि अनुभवण्यासाठी लागणारे सहावे इंद्रिय आपल्याला दिलंय यातच धन्य झालं पाहिजे.

सुंदर रंगाचे नि विलोभनीय नक्षीकामाचे पंख घेऊन उडणारी फुलपाखरे कित्येकदा पाहिली आहेत.. पण आपल्या कधी लक्षात आलं नाही की ती फुलपाखरे त्यांच्याजवळ असणार्‍या स्वर्गीय सौंदर्याविषयी अनभिज्ञ असतात.. म्हणून काही त्यांच्या सौंदर्यात कमीपणा येत नाही.. ज्यांना सौंदर्य म्हणजे नक्की काय असतं याचं भान आहे त्यांना त्या फुलपाखरांच्या जवळ असणार्‍या सौंदर्याचं अवधान असतंच.. आणि ज्यांना हे भान नसतं त्यांच्या हाती थोडंच त्या फुलपाखरांची सौंदर्य परीक्षा घेऊन पास-_नापास करायचं परीक्षकाचं पद असतं…

पावलोपावली आपलं कुणी कौतुक करत नाही वा देखणेपणाबद्दल स्तुती करत नाही.. म्हणून हिरमुसले होण्याचा पर्याय त्या फुलपाखरासमोर असत नाही .. किंवा असा काही पर्याय असू शकतो याची शक्यता अजमावण्याचीसुद्धा त्या फुलपाखरांना गरज भासत नाही.. याच धर्तीवर कुणी जादा जवळीक करून काही घरोबा करायचा यत्न केला तर त्या माणसांचा त्यांना राग येत नाही.. वा अवाजवीपणे त्याच्या आरतीत गोवलेल्या जड जड शब्दांचा त्या फुलपाखरांना गर्व असत नाही..

आपण प्रत्येकजण आपल्या अनोख्या रंगात आणि ढंगात नटलेलो फुलपाखरू असतो.. आपल्यालाही आपल्या जवळच्या कस्तुरीचे ज्ञान नसते.. पण आपण त्या कस्तुरीच्या नसण्याचे खापर फोडायला आई_वडील, पर्यावरण, सरकार, कलियुग .. नाहीतर परमेश्वराचा वापर करत असतो.. तेव्हा आपल्याजवळ काय आहे याचं ज्ञान नसणं हे एकापरीनं फुलपाखराचं हित करून जातं आणि आपल्याजवळ काय नाही याचं ज्ञान आपल्यातला माणूस गमावून टाकतं..

आपल्याजवळ काय आहे किंवा नाही याची जाणीव असण्यापेक्षा इतरांच्याजवळ असणार्‍या गोष्टींची ओळख करून घ्यायला आपण नेहमी दोन पावले पुढे जायला हवं. ..आपण आपला आनंद आपल्यासमोर असणार्‍या सुंदर गोष्टीत मानून ती सुंदरता पाहण्याचं, उमगण्याचं आणि अनुभवण्यासाठी लागणारे सहावे इंद्रिय आपल्याला दिलंय यातच धन्य झालं पाहिजे.

आपलं सगळं आलबेल चाललंय यात सुख तर आहेच ..पण जे काही चाललंय त्यातलं आलबेल आपण ओळखू शकलो यात परमसुख आहे…तेव्हा हा सुखाचा, परमसुखाचा विठ्ठल भेटावयाचा असेल तर आपण आपला पुंडलिक होऊ दिला पाहिजे.. इथलं सुख काही थेट दोन व्यक्तींमधली देवाणघेवाण नसते बरं.. तर तो सुखाचा कोंब आपल्या अंगणातले झाड बनण्यासाठी जेव्हा अवतरत असतो, तेव्हा त्याच्या पाठीमागे आपणाकडून कुठल्यातरी अंधार्‍या वाटेवर निरांजन लावले गेलेले असते.. कुणीतरी उन्हात उभं राहून आपली सावली झालेले असते. हे मात्र तितकेच खरे आहे… ह्याची जाणीव ठेवायला… त्याबाबाबत कृतज्ञ राहायला मात्र विसरू नये आपण.. म्हणजे झाले.