Home बातम्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ईडीकडून वाढदिनीच अटक

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला ईडीकडून वाढदिनीच अटक

0

>> कथित मद्य घोटाळा प्रकरणात चैतन्य बघेल अटकेत; 5 दिवसांच्या ईडी कोठडीत रवानगी

मद्य घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते भूपेश बघेल यांच्या मुलाला काल अटक केली. ईडी अधिकाऱ्यांनी काल पहाटे टाकलेल्या छाप्यानंतर चैतन्य बघेल यांना त्यांच्या वाढदिनीच भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेण्यात आले. भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली. चैतन्य बघेल यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्यात 2100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा गैरव्यवहार झाला होता. घोटाळ्यातील निधीचा काही भाग चैतन्य बघेल आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी चालवलेल्या रिअल इस्टेट कंपन्यांद्वारे वापरण्यात आला होता. ईडीचा हा मनी लाँड्रिंग खटला छत्तीसगड भ्रष्टाचार विरोधी ब्युरो (एसीबी) ने नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालावर (एफआयआर) आधारित आहे. या अहवालात माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा यांच्यासह 70 व्यक्ती आणि संस्थांची राज्याच्या मद्य धोरणाशी संबंधित भ्रष्टाचारात कथित भूमिकेसाठी नावे आहेत.

भूपेश बघेल यांची केंद्र सरकारवर टीका
अटक आणि छाप्यावर प्रतिक्रिया देताना भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि केंद्र सरकार विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा आम्ही सभागृहात अदानी मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत होतो, तेव्हा मोदी आणि शहा यांनी त्यांच्या मालकांना खूश करण्यासाठी ईडीला माझ्या घरी पाठवले. गेल्यावेळी माझ्या वाढदिवशी ईडी पाठवण्यात आली होती. यावेळी माझ्या मुलाच्या वाढदिवशी ईडीला पाठवण्यात आले. ते देशभरातील विरोधी नेत्यांना लक्ष्य करत आहेत. लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असे बघेल म्हणाले. केंद्र सरकारद्वारे ईडी, सीबीआय, आयकर आणि डीआरआय सारख्या तपास संस्थांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.