पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे हीच संघटना; संघटनेवर आर्थिक व प्रवासी निर्बंध लागू होणार
टीआरएफला दहशतवादी संघटना ठरवल्यामुळे काय होणार?
अमेरिकेने टीआरएफ ही संघटना विदेशी दहशतवादी संघटना असल्याची घोषणा केल्यानंतर आता या संघटनेची आर्थिक नाकेबंदी केली जाईल. या संघटनेवर आर्थिक व प्रवासी निर्बंध लागू केले जातील.
अमेरिकन सरकारने ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेला विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी याविषयी माहिती दिली. 22 एप्रिल रोजी काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी याच संघटनेने घेतली होती. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता, त्यात 26 पर्यटक ठार झाले होते. दरम्यान, जानेवारी 2023 मध्ये भारत सरकारने टीआरएफवर बंदी घातली होती आणि त्याचे प्रमुख नेते शेख सज्जाद गुल यांना दहशतवादी घोषित केले होते.
द रेजिस्टन्स फ्रंट ही पाकिस्तान समर्थित कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचीच एक शाखा असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ही संघटना सातत्याने काश्मीर खोऱ्यात कुरापती करत आहे. टीआरएफ लष्कर-ए-तोयबाचाच एक भाग असल्याच्या वृत्तांवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी शिक्कामोर्तब केले आहे. संयुक्त राष्ट्राने देखील टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. या संघटनेचे मुख्यालय पाकिस्तानमध्ये आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, टीआरएफला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा निर्णय आपल्या राष्ट्रीय संरक्षण हितांसाठी, दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी महत्त्वाचा आहे. तसेच हा निर्णय पहलगाममधील हल्ल्यानंतर पीडितांच्या न्यायासाठी आपली वचनबद्धता दर्शवतो. टीआरएफने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. 2008 मध्ये मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सामान्य नागरिकांवर केलेला हा दुसरा सर्वात मोठा दहशतवादीहल्ला होता.
टीआरएफची स्थापना कधी झाली?
ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर लगेचच ऑक्टोबर 2019 मध्ये टीआरएफची स्थापना झाली. सुरुवातीला त्यांनी स्वतःला स्थानिक काश्मिरी प्रतिकार आंदोलन म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही संघटना लष्कर-ए-तोयबासाठीच काम करते आणि ‘फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स’च्या (एफएटीएफ) चौकशीतून वाचण्यासाठी तिला नवी ओळख दिली गेली, असे मानले जाते.