माजी मंत्री महादेव नाईक यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

0
186

भाजपच्या उमेदवारीवर दोनवेळा शिरोडा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार व माजी मंत्री आणि सध्याचे कॉंग्रेस नेते महादेव नाईक यांनी काल नवी दिल्ली येथे रितसर आम आदमी पक्षात प्रवेश केला. आपचे गोवा निमंत्रक राहुल म्हांबरे तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते सत्येंद्र जैन तसेच पक्षाच्या अन्य एक आमदार आतिषी सिंग यांच्या हजेरीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना महादेव नाईक म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात आम आदमी पक्षाने केलेले काम पाहून आपण प्रभावित झालो. पक्षाने गोव्यात प्राणवायू तपासणी केंद्रे व ऑक्सिमित्र मोहीम राबवली. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील वीज ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे जे वचन त्यांनी दिले त्यामुळे तर आपण फारच प्रभावित झाल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात सत्ताधारी भाजप कुठे होता असा प्रश्‍न करत आम आदमी पक्षाचे नेते यावेळी राज्यात लोकांना रेशनचे वितरण करीत होते, असेही नाईक म्हणाले. भाजपने कॉंग्रेस मुक्त भारताचे वचन दिले होते. पण आता स्थिती कॉंग्रेसयुक्त भाजप झाल्याचे नाईक यावेळी म्हणाले.

सावंत सरकारने विजेसारखी मुलभूत गरज गोमंतकीयांना मोफत देण्यास नकार देऊन गोमंतकीयांचा रोष ओढवून घेतल्याचे सत्येंद्र जैन यांनी सांगितले. तर राहुल म्हांबरे म्हणाले की गोव्यासाठी आप हाच आता एकमेव पर्याय आहे हे सिद्ध झाले आहे.