भाजपच्या राष्ट्रीय आरोग्य सेवक मोहिमेसाठी डॉक्टर्सना प्रशिक्षण

0
53

>> डॉ. शेखर साळकर यांची माहिती

भाजपच्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय आरोग्य सेवक मोहिमेसाठी राज्यात ६० डॉक्टर्सना चार डॉक्टरांच्या पथकाकडून खास प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती काल भाजपच्या वैद्यकीय विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

देशात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे डॉ. साळकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

विविध प्रकारच्या वैद्यकीय तज्ज्ञांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीचे प्रशिक्षण घेऊन डॉ. साळकर यांच्या नेतृत्त्वाखालील डॉक्टरांचे एक पथक नुकतेच नवी दिल्लीहून गोव्यात परतले.

पहिल्या तुकडीतील २० डॉक्टरांना आज शनिवारी दिवसभर विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उर्वरित ४० तज्ज्ञ डॉक्टरांना शनिवारी प्रशिक्षण घेतलेले हे २० डॉक्टर्स १५ ऑगस्ट रोजी प्रशिक्षण देणार आहेत.

ह्या प्रशिक्षणात संकल्पना व कोविडविषयीचे सामान्य ज्ञान तसेच लसीकरण व योग्य आहार आणि योग याद्वारे रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कोविडची तिसरी लाट आल्यास जनता तसेच सरकारला मदत करणे हा उद्देश असल्याचे डॉ. साळकर यांनी स्पष्ट केले.