चेन्नई तिसर्‍यांदा आयपीएल चॅम्पियन

0
84

>> शेन वॉटसनचे तुफानी शतक

>> सुरेश रैनाच्या उपयुक्त धावा

मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या आयपीएलच्या ११व्या पर्वातील अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी व ९ चेंडू राखून पराभव करत आयपीएलचा चषक जिंकला आहे. चेन्नईच्या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरलेल्या शेन वॉटसनने तुफानी शतक ठोकताना ५७ चेंडूत ११७ धावांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील वॉटसनचे हे दुसरे शतक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तिसर्‍यांदा आयपीएलचा चषक जिंकण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी २०१० आणि २०११ मध्ये चेन्नईने आयपीएल चषक जिंकला होता. चेन्नईने तीन आयपीएल जिंकत मुंबईची बरोबरी केली आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएल चषक जिंकला होता.

विजयासाठी १७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. पाचव्या षटकाअंती त्यांची १ बाद २० अशी स्थिती होती. बाद होणारा फलंदाज होता फाफ ड्युप्लेसी. त्याला संदीप शर्माने माघारी पाठवले. संदीप शर्माने टाकलेल्या पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकापासून चेन्नईने फटकेबाजीस प्रारंभ केला. या षटकात चेन्नईने १५ धावा केल्या. दहाव्या षटकाअखेर चेन्नईने ८० धावा केल्या तर १२व्या षटकात संघाने शतकी वेस ओलांडली. चेन्नईच्या फलंदाजांनी राशिद खान व भुवनेश्‍वर कुमारची गोलंदाजी सावधरित्या खेळून काढताना सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, शाकिब अल हसन, कार्लोस ब्रेथवेट यांची गोलंदाजी झोडपून काढताना नियोजनबद्धरित्या हैदराबादला नामोहरम केेले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या महेंद्रसिंग धोनीचा विश्वास चेन्नईच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर श्रीवत्स गोस्वामी दुर्देवाने धावबाद होऊन माघारी परतल्यानंतर, शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनने काही क्षणांसाठी संघाचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंमध्ये दुसर्‍या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारीही झाली. मात्र रवींद्र जडेजाने धवनचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडल्यानंतर हैदराबादचे फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अपयशी ठरले. छोटेखानी भागीदार्‍या रचल्यानंतर हैदराबादचे फलंदाज माघारी परतत राहिले. अखेर तळातल्या युसूफ पठाण आणि कार्लोस ब्रेथवेटने फटकेबाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून लुंगी एन्गिडी, शार्दुल ठाकूर, कण शमार्र्, ड्वेन ब्राव्हो व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. चेन्नईकडून एन्गिडीने व हैदराबादकडून भुवनेश्‍वर कुमारने प्रत्येकी एक निर्धाव षटक टाकले.

चेन्नईने या सामन्यासाठी संघात एक बदल करताना ऑफ ब्रेक गोलंदाज हरभजन सिंगच्या जागी लेगस्पिनर कर्ण शर्माला उतरवले तर हैदराबादने जायबंदी यष्टिरक्षक वृध्दिमान साहा व डावखुरा मध्यमगती गोलंदाज खलिल अहमद यांना वगळून श्रीवत्स गोस्वामी व स्विंग गोलंदाज संदीप शर्माचा संघात समावेश केला.
विजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने झळाळत्या करंडकासह २० कोटी रुपयांची कमाई केली. उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला १२.५ कोटी व करंडक प्राप्त झाला. ऑरेंज कॅपधारी केन विल्यमसनने १० लाख व चषक लाभला तर पर्पल कॅपधारी पंजाबच्या अँडी टायला १० लाख व चषक मिळाला.

धावफलक
सनरायझर्स हैदराबाद ः श्रीवत्स गोस्वामी धावबाद ५, शिखर धवन त्रि. गो. जडेजा २६, केन विल्यमसन यष्टिचीत धोनी गो. शर्मा ४७, शाकिब अल हसन झे, रैना गो. ब्राव्हो २३, युसूफ पठाण नाबाद ४५ (२५ चेंडू, ४ चौकार, २ षटकार), दीपक हुडा झे. शोरे गो. एन्गिडी ३, कार्लोस ब्रेथवेट झे. रायडू गो. ठाकूर २१, अवांतर ८, एकूण २० षटकांत ६ बाद १७८.
गोलंदाजी ः दीपक चहर ४-०-२५-०, लुंगी एन्गिडी ४-१-२६-१, शार्दुल ठाकूर ३-०-३१-१, कर्ण शर्मा ३-०-२५-१, ड्वेन ब्राव्हो ४-०-४६-१, रवींद्र जडेजा २-०-२४-१.

चेन्नई सुपरकिंग्स ः शेन वॉटसन नाबाद ११७ (५७ चेंडू, ११ चौकार, ८ षटकार), फाफ ड्युप्लेसी झे. व गो. संदीप १०, सुरेश रैना झे. गोस्वामी गो. ब्रेथवेट ३२, अंबाती रायडू नाबाद १७, अवांतर ५, एकूण १८.३ षटकांत २ बाद १८१.
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार ४-१-१७-०, संदीप शर्मा ४-०-५२-१, सिद्धार्थ कौल ३-०-४३-०, राशिद खान ४-०-२५-०, शाकिब अल हसन १-०-१५-०, कार्लोस ब्रेथवेट २.३-०-२७-१.

नाणेफेकीवेळी गोंधळ
नाणेफेकीवेळी समालोचक संजय मांजरेकर व सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन, सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
धोनीने नाणे हवेत उडवताच ते जमिनीवर पडून घरंगळत दूर गेले. मांजरेकर व पायक्रॉफ्ट यांनी नाण्याजवळ जाऊन ‘हेड्‌स’ असल्याचे पाहिले. धोनी याने हवेत नाणे उडविल्याचे विसरल्याने मांजरेकर याने धोनीशी जाऊन त्याच्या निर्णयाविषयी विचारले. तेव्हा धोनीने मिष्किलपणे हसून आपण ‘हेड्‌स’म्हटले नसल्याचे मांजरेकरला सांगितले. सामनाधिकार्‍यांनी धोनीने नाणेफेक जिंकल्याचे सांगितल्याने मांजरेकर अधिक गोंधळून गेला व त्याने धोनीला पुन्हा ‘हेड्‌स’ विषयी विचारले. विल्यमसनने ‘टेल्‌स’ म्हटल्यानेच आपण नाणेफेक जिंकल्याचे धोनीने यावेळी सांगितले. यावेळी वैतागलेल्या मांजरेकरने स्वतःच्या चुकीचा राग धोनीवर काढला.

विल्यमसनचा
विक्रम
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने आयपीएलच्या एका सत्रात सातशेपेक्षा जास्त धावा करणारा पाचवा फलंदाज होण्याचा मान मिळविला. त्याच्या नावावर ७३५ धावांची नोंद झाली आहे. त्याने काल ख्रिस गेल ७०८ व ७३३ धावा (२०१३ व २०१२), मायकल हसी ७३३ धावा (२०१३) यांना मागे टाकले. केवळ डेव्हिड वॉर्नर ८४८ धावा (२०१६) व विराट कोहली ९७३ धावा (२०१६) यांनी आयपीएलच्या एका सत्रात विल्यमसनपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.