महायुतीसाठीच्या कोंडीवर आज निर्णय शक्य

0
66

>> कॉंग्रेसची आज बैठक

 

सद्याच्या राजकीय परिस्थितीत २०१७च्या निवडणुकीच्यावेळी महायुती न केल्यास भाजप विरोधी एकाही राजकीय पक्षाची धडगत नसल्यानेच सर्वजण महायुतीसाठी प्रयत्न करीत असून कॉंग्रेस उमेदवारांनाही महायुतीची गरज भासेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे कॉंग्रेस सद्या युतीस विरोध करीत असला तरी अखेरच्या क्षणी कॉंग्रेस युतीसाठी तयार होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्‍वभूमीवर महायुती प्रस्तावावर चर्चेसाठी कॉंग्रेसने आपल्या सर्व घटकांची संयुक्त बैठक आज दुपारी बोलावली आहे.
गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महायुतीसाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा, अशी जोरदार मागणी करीत आहेत. युती न केल्यास वरील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना निवडणुक जड जाईल व युती केल्यास बिगर कॉंग्रेस उमेदवार कॉंग्रेसच्या पाठिंब्याने निवडून येऊ शकतील. निवडून आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलास निवडून आलेले बिगर कॉंग्रेस उमेदवार कॉंग्रेसची साथ सोडतील, अशी भीती कॉंग्रेस नेत्यांना आहे. त्यामुळे काही नेते महायुतीच्या प्रस्तावास विरोध करीत आहेत. तर वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांना राजकीय परिस्थितीची कल्पना आल्याने ते महायुतीसाठी प्रयत्न करीत आहेत.
यासंपूर्ण पार्श्‍वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसने महायुतीच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी आज दुपारी ३ वाजता गोवा चेंबर्स सभागृहात प्रदेश कार्यकारिणी विधी मंडळ गट, जिल्हा कॉंग्रेस गट कॉंग्रेस व अन्य आघाडी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली आहे.
आतापर्यंत कॉँग्रेसने २०१७ ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षाचे असंख्य कार्यकर्ते नाराज बनले आहेत. युतीशिवाय भाजपच्या पराभवाची कॉंग्रेस नेत्यांनी स्वप्नेही पाहू नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. बिहार ङ्गफॉर्मुलाफचा गोव्यात प्रयोग करावा, अशी मागणी होत आहे. निवडणूकी पूर्वी पक्षाचे केंद्रीय नेते हस्तक्षेप करून राज्यात महायुती करतील, असा अनेकांना विश्वास आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपचा पराभव हे लक्ष्य असले पाहिजे, असे आमदार विश्वजीत राणे, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, महायुतीसाठी प्रयत्न करणार्‍या राजकीय नेत्यांनी कॉंग्रेसमध्ये सामील व्हावे, असे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या सारख्या काही नेत्यांना वाटते.