अस्थिर तुर्क

0
92

तुर्कस्थानातील लष्करी उठाव मोडून काढण्यात तेथील जनतेला यश आले असले, तरी त्या देशात निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती जगासाठी चिंतेचा विषय आहे, कारण इराक आणि सिरियामधील आयएसआयएसच्या विरोधात नाटो फौजांनी जी कारवाई चालवलेली आहे, त्यासाठी तुर्कस्थानची साथ आजवर मोलाची राहिलेली आहे. गेली तेरा वर्षे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या एहरदोगान (खरा उच्चार एहरदोअहन) यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी लष्कराच्या अनेक तुकड्या बंड करून उठल्या खर्‍या, परंतु राष्ट्राध्यक्षांच्या समर्थक जनतेने रस्त्यावर उतरून आणि राजनिष्ठ फौजांच्या साथीने बंडखोरांवर काबू मिळवला. २९ कर्नल आणि पाच जनरलना कैद केले गेले आहे. बंडाची व्यापकता त्यावरून दिसते. खुद्द लष्करप्रमुखांनाही या बंडखोरांनी ओलीस धरले होते. आता सर्व पदांवर नव्या नियुक्त्या झाल्या आहेत. लोक तुर्की ध्वज मिरवीत रणगाड्यांवर चढताना आणि बंडखोरांना मारबडव करतानाची दृश्ये आपण दूरचित्रवाणीवर पाहिली. अनेक देशांमध्ये लोकशाही रुजू शकत नाही. तुर्कस्थान हा असाच देश आहे. आधुनिक तुर्कस्थानच्या इतिहासात आजवर तेथे किमान तीन – चारवेळा लष्करी बंड झाले. पण विद्यमान राष्ट्राध्यक्षांचे सरकार मात्र गेली तेरा वर्षे पाय रोवून उभे होते. त्यांनी एकीकडे आपल्या देशाला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला, साधनसुविधा उभारल्या, रेल्वेचे जाळे उभारले आणि सन २०२३ पर्यंत तुर्कस्थान ही जगातील दहा प्रगत अर्थव्यवस्थांपैकी एक बनविण्याचे स्वप्न जनतेपुढे ठेवले आणि दुसरीकडे आपल्या परंपरावादी जस्टीस अँड डेव्हलपमेंट पार्टी (एकेपी) ची इस्लामी धार्मिक मूलतत्त्वे समाजात रुजविण्याचाही प्रयत्न केला. आधुनिक तुर्कस्थानचा संस्थापक मुस्तफा केमाल आतातुर्कने १९२३ साली या देशाला धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची संथा दिली होती. त्यामुळे आजही हा देश इतर शेजारील कडव्या देशांपेक्षा वेगळा आणि आधुनिक, धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा आहे. पाश्‍चात्त्य राष्ट्रांना त्यामुळेच तो जवळचा वाटतो. इराक, सिरिया आणि इराणसारख्या अत्यंत अस्थिर आणि अशांत भूप्रदेशाने वेढलेला असूनही तुर्कस्थान आजवर स्वतःची ही वेगळी ओळख आणि मध्यमवर्गीय संस्कृती सांभाळून आहे. परंतु वाढत्या लोकप्रियतेने राष्ट्राध्यक्ष एहरदोअहन यांना स्वतःकडे अमर्याद सत्ता केंद्रित करण्याचा मोह झाला आणि त्यांची पावले त्या दिशेने पडू लागली. त्यासाठी त्यांनी घटनाही बदलली. दोन वर्षांपूर्वी राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्यापासून त्यांच्या महत्त्वाकांक्षेला अस्मान ठेंगणे झाले होते. असहिष्णुतेचा आणि सुलतानी राजवटीचा आरोपही त्यांच्यावर होऊ लागला होता. त्यामुळे लष्करामध्ये त्यांच्या राजवटीविषयी अरूची वाढू लागली होती. त्यातूनच हा उठाव झाला. पाश्‍चात्त्य राष्ट्रांच्या आश्रयास गेलेल्या फतेहउल्ला गुलेन या इस्लामी धर्मप्रचारकाच्या प्रेरणेतून हा उठाव झाल्याचे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. हा गुलेन तुर्कस्थानमधील हिजमत चळवळीचा एक प्रणेता. हनाफी इस्लामची शिकवण तो देतो. इस्लामची ही सहिष्णू विचारधारा मानली जाते. याउलट सत्ताधारी राष्ट्राध्यक्ष एहदोअहन यांचा पक्ष कडव्या विचारधारेचा आहे. त्यांनी देशात दारूबंदी लागू केली, स्त्रियांना पुरूषांपेक्षा कनिष्ठ लेखण्यास सुरूवात केली, विद्यापीठांत मुलामुलींची वसतिगृहे वेगळी करविली. परंतु असे असूनही पाश्चात्त्य देशांना मध्य पूर्वेच्या अशांत आणि अस्थिर वातावरणामध्ये तुर्कस्थान हा आधार राहिलेला आहे. एकीकडे दक्षिणेकडील कुर्द बंडखोरांविरुद्ध आणि दुसरीकडे शेजारील देशांतील आयएसआयएसविरुद्ध मोहीम तुर्कस्थानने चालवली आहे, याचे कारण हा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. इराक, इराण आणि सिरियासारख्या जगातील अत्यंत असुरक्षित प्रदेशाने कोंडीत पकडलेल्या तुर्कस्थानला पाश्‍चात्त्य महासत्ता हा अस्तित्व टिकवण्यासाठी आधार आहे आणि या पाश्‍चात्त्य राष्ट्रांना आयएसआयएसविरुद्ध लढण्यासाठी तुर्कस्थानची मदत हवी आहे. अशा परिस्थितीत लष्करी उठाव होणे आणि विद्यमान राजवट अस्थिर बनणे धोक्याचे ठरू शकते. आधीच तुर्कस्थानला दहशतवादाने ग्रासले आहे. इस्तंबूलच्या अतातुर्क विमानतळावरील दहशतवादी हल्ला तर ताजाच आहे. आयएसआयएसच्या अक्राळविक्राळ राक्षसावर अंकुश आणण्यासाठी तुर्कस्थानची मदत ‘नाटो’ फौजांसाठी अत्यावश्यक आहे. ती कायम मिळत राहावी यासाठी तेथे राजकीय शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा वेळी ‘नाटो’ चा मध्यपूर्वेतील एक मोठा आधार असलेल्या या देशात अशांतता निर्माण होणे घातक आणि न परवडणारे ठरेल.