पणजी महानगरपालिकेच्या नूतन महापौर, उपमहापौरपदासाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावांची घोषणा बुधवार दि. 25 मार्च रोजी केली जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, पणजीच्या महापौरपदी बाबूश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांचीच पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पणजी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, दोन्ही पदांसाठी निवडण्यात आलेल्या उमेदवारांची नावे बुधवारी जाहीर केली जाणार आहेत, असे मोन्सेरात यांनी सांगितले.
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी दि. 27 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर, 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक घेतली जाणार आहे.
पणजी महानगरपालिकेच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजप आणि बाबूश मोन्सेरात प्रणित गटाचे 30 पैकी 27 उमेदवार निवडून आले आहेत, तर उत्पल पर्रीकर यांनी पाठिंबा दिलेल्या आम्ही पणजीकर गटाचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत.