2017 मध्ये पोलिसांवरील एका हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी जानुरिओ मिरांडा याला उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा काल सुनावली. जानुरिओ मिरांडा याने चाकूच्या साहाय्याने पोलिसांवर हल्ला केला होता. त्यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तथापि, न्यायालयाने मिरांडा याला हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. ही घटना 1 मार्च 2017 रोजी सायंकाळी गिरी म्हापसा येथे घडली होती. मिरांडा हा चाकू घेऊन गिरी परिसरात फिरत असून, स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर म्हापसा पोलिसांनी तातडीने गिरी भागात धाव घेतली होती. पोलीस पथकाने त्याला शांत करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी मिरांडाने पोलिसांवर अचानक चाकू सुरू केला होता.