मराठी भवनाच्या पूर्णत्वासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय

0
158

३०० सदस्यांची नियुक्ती करणार
गोमंतक मराठी अकादमीने काल आयोजित केलेल्या महामेळाव्यात मराठी भवनाच्या पूर्णत्वासाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अकादमीचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी उपस्थित मराठीप्रेमींना ही माहिती दिली.या योजनेंतर्गत निधी संकलनासाठी एकूण ३०० सदस्य नेमण्यात येणार असून त्यात १२० पुरुष, १२० महिला आणि ६० युवा सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या ३०० सदस्यांवर आपापल्या भागात फिरून निधी संकलनाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. प्रत्येक सदस्याने किमान पाच हजार रुपये मदत देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. कु. श्रद्धा गवंडी यांची विद्यार्थी समितीवर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर यांनी यावेळी बोलताना सरकारला येत्या पावसाळी अधिवेशनात मराठी राज्यभाषेबद्दल विधेयक मांडण्याचा आग्रह धरण्याचा विचार मांडला. सरकार ऐकत नसेल तर प्रखर आंदोलन करण्याचा इशारा देण्याची सूचना त्यांनी केली. विशाल गोमंतक सेनेचे किशोर राव यांनी मराठी अकादमीचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी सरकारकडे मराठीसाठी प्रखरपणे आग्रह धरावा अशी मागणी केली.
यावेळी झालेल्या चर्चेत नारायण महाले, द. वा. तळवणेकर, श्रद्धा गवंडी, सतेज राणे, एकनाथ म्हापसेकर, पांडुरंग नागवेकर आदी मराठीप्रेमींनी विचार मांडले. यावेळी कला गौरव
पुरस्कार विजेते प्रभुदेसाई यांनी आपल्याला पुरस्काराद्वारे मिळणारी धनराशी अकादमीला
देण्याचे जाहीर केले. या मेळाव्याला ६० मराठीप्रेमी उपस्थित होते. दरम्यान, मेळावा सुरू होण्यापूर्वी अकादमीच्या सदस्यांची आमसभा घेण्यात आली.