मराठी पाऊल पडते पुढे!

0
685
–  प्रा. विनय मडगावकर
(मराठी विभाग, गोवा विद्यापीठ)
गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेणारा विद्यार्थी ज्ञानार्जन करून भावी काळात अर्थार्जनही सहजतेने करू शकेल. सृजनशील साहित्यनिर्मिती, संशोधन, कला व संस्कृती या विषयांत प्रावीण्य प्राप्त करत असताना त्याला गोमंतकीय साहित्य, भारतीय साहित्य, प्राचीन भारतीय साहित्य, वैश्विक साहित्य यांचा परिचय होणार आहे.
गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने आताच्या विद्यार्थ्यांसमोर असलेली विद्यमान युगाची आव्हाने ओळखून गेल्या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीसीएस’नुसार अभ्यासक्रमात समयोचित विषयांचा समावेश करून घेतला आहे. यात ८ अपरिहार्य तर २३ पर्यायी विषय आहेत. माय मराठी ज्ञानदायिनी आहे. मराठी विभागात प्रवेश घेणारा विद्यार्थी ज्ञानार्जन करून भावी काळात अर्थार्जनही सहजतेने करू शकेल. सृजनशील साहित्यनिर्मिती, संशोधन, कला व संस्कृती या विषयांत प्रावीण्य प्राप्त करत असताना त्याला गोमंतकीय साहित्य, भारतीय साहित्य, प्राचीन भारतीय साहित्य, वैश्विक साहित्य यांचा परिचय होणार आहे. गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागात जे विषय शिकवले जात आहेत तसेच भावी काळात जे शिकवले जाणार आहेत त्यांचा थोडक्यात परिचय गोमंतकातील वाचकांना व्हावा म्हणून हा लेखन प्रपंच.
गोमंतकीय विद्यार्थ्याला गोमंतकीय साहित्याचा परिचय असणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘गोमंतकीय साहित्य’ हा विषय शिकवला जात आहे. यात ‘महापर्व’ या ऐतिहासिक कादंबरीच्या निमित्ताने  सं. शं. देसाईंसारख्या इतिहास संशोधकाचा तथा कादंबरीकाराचा परिचय विद्यार्थ्यांना होतो. पा. पु. शिरोडकर यांच्या ‘आठवणी माझ्या कारावासाच्या काळ्या निळ्या पाण्याच्या’ या आत्मचरित्राच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना गोवामुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास समजतो. ‘आभाळवाटा’- शंकर रामाणी, ‘आज इथे तर उद्या तिथे’- उषा पाणंदीकर या साहित्यकृतींच्या आधारे गोमंतकातील वेगवेगळ्या साहित्यकृतींच्या अभ्यासाद्वारे गोमंतकीय मराठी साहित्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. गोमंतकाचा भाषिक, सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जपणे ही काळाची गरज आहे.
विद्यार्थ्यांना भारतीय साहित्याच्या आधारे भारतीयत्व आणि भारतीय संस्कृतीची जाणीव होणे आवश्यक आहे. इतर भाषांचा आदर करत राष्ट्रभावना जागृत ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतातील इतर भाषांमध्ये प्रसिध्द झालेल्या साहित्याचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे महत्वपूर्ण ठरते. तुलनात्मक अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी कबीरबोध -शेला पिटकर व गिरीश कर्नाड लिखित तुघलक नाटक अभ्यासले जाणार आहे.
‘प्राचीन भारतीय साहित्य : मराठी अनुवाद’ या विषयात प्राचीन संस्कृत साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना होणार आहे. यात  ‘मेघदूत’, अनुवाद शांता शेळके, हर्षचरितसार ः बाण भट्टविरचित ‘हर्षचरितसार’, मराठी भाषांतर, डॉ. अनुपमा डोंगरे, छत्रपती संभाजी महाराज विरचित ‘बुधभूषण’ या साहित्यकृतींचा समावेश आहे.
विश्वसाहित्याची संकल्पना समजून मराठीत अनुवादित केलेल्या परदेशी साहित्य व संस्कृतीचा तौलनिक अभ्यास करणे व सहसंबंध शोधणे या हेतूने यासाठी  विल्यम शेक्सपिअर लिखित ‘ज्यूलिअस सीझर’, संपा. मराठी भाषांतर मंगेश पाडगावकर, तसेच मार्गेट मिचेल लिखित ‘गॉन विथ द विन्ड’ अनु. वर्षा गजेंद्रगडकर. या साहित्यकृती अभासल्या जाणार आहे.
वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यावर संशोधन होणे आवश्यक असते. त्यामुळे त्यावरील संशोधन पध्दती व तंत्र याचे ज्ञान करून देणे पाठ्यक्रमात आवश्यक आहे. ‘संशोधन पध्दती व तंत्र’ या विषयांतर्गत  साहित्यसंशोधनाच्या विविध पध्दती आणि अभ्याससाधने समजून घेतली जातात. त्यात पाठचिकित्सा व साधनचिकित्सा, ऐतिहासिक कागदपत्रे, शिलालेख, ताम्रपट, चक्रमुदित प्रती, छायाप्रती, सूक्ष्मपट, संगणक यंत्रादींचा विचार येथे केला जातो.
विद्यमान युगात ‘व्यावसायिक मराठी भाषा आणि आधुनिक तंत्रज्ञान ः परिचय व प्रात्यक्षिक’ हा विषय विद्यार्थांना फार लाभदायी ठरणार आहे. यात मराठी भाषेसाठी देवनागरी लिपीत मुद्रण, शुध्दलेखन नियम, समास, संगणकावर टंकलेखन, लिप्यंतर, मुद्रितशोधन, विरामचिन्हे, मराठी उच्चार : स्वर, व्यंजन, महाप्राण, अनुनासिक यांचे योग्य उच्चारण, ध्वनिमुद्रण : परिचय व प्रात्यक्षिक डिजिटल मिडीया : परिचय व प्रात्यक्षिक यातविकी, ब्लॉग, व्लॉग, वर्ड प्रेस, ई-बुक, पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन, गुगल ऍप्स- जसे ट्रान्लेशन,ट्रान्स्क्रिप्ट, व्हॉइस ओव्हर, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन, व्हिडिओ एडिटिंग  या अत्याधुनिक भाषांसंबंधित तंत्रज्ञानाचे यथोचित मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाणार आहे.
‘मराठी साहित्याचे प्रकारांतर व माध्यमांतर’ या विषयांतर्गत विश्वास पाटील लिखित ‘पानिपत’ कादंबरीचे रणांगण नाटकात प्रकारांतर तसेच – कट्यार काळजात घुसली या पुरूषोत्तम दारव्हेकर लिखित नाटकाचे ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात माध्यमांतर या प्रक्रिया शिकविल्या जाणार आहेत.
मराठी व्याकरणाचा पुनर्विचार, आधुनिक मराठी साहित्याचा इतिहास : १८१८ ते १९४७ आणि १९४७ ते २०१५ पर्यंत मराठी साहित्यातील विविध प्रवाह, प्रकार आणि प्रवृत्तींचा अभ्यास विद्यार्थी करतात. भाषा विज्ञान आणि मराठी भाषा, साहित्य सिध्दांत, मराठी साहित्याला लाभलेल्या मध्ययुगीन साहित्यकृतीचा आशय व आकृतीबंधाच्या अभ्यासाच्या दृष्टीने समर्थ रामदास विवेक दर्शन (संत रामदास, साहित्य अकादमी प्रकाशन) कृष्णदासशामा विरचीत  श्री कृष्णचरित्रकथा हे ग्रंथ अभ्यासले जाणार आहेत. तसेच गोव्यात पोर्तुगीजांनी येथील जनतेचे धर्मपरिवर्तन केले. तत्कालीन परिस्थितीचा वेध घेत ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी लिहलेल्य मराठी वाङ्‌मयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गोव्याचा भाषिक व सांस्कृतिक इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने पाद्री आंतोंनियु द सालादाञ्ज्य यांचा ‘सांतु आंतोनिची जीवीत्वकथा’ व फादर सिमांव गॉमिशविरचित ‘सर्वेश्ववराचा ज्ञानोपदेश’  हे ग्रंथ अभ्यासनीय आहेत. मध्ययुगीन साहित्य, समाज भाषा, याचा विचारविर्मश करणे, हे या मागचे प्रयोजन आहे.
एका लेखकाच्या साहित्यकृतींचा सर्वांगाने अभ्यास करण्याच्या निमित्ताने  ‘एका आधुनिक मराठी साहित्यिकाचा अभ्यास’ यात बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर यांच्या साहित्यकृतींचा अभ्यास यात अभिराम, जाई, प्रीतीची रीत व इतर कथा, तारांबळ- नाटक, द्राक्षांच्या देशात, पारिसचे भविष्य/युलिसिसचा प्रवास, संशोधनपर साहित्यकृतींचा परामर्ष व प्रकाशक म्हणून मराठी वाङ्‌मयासाठी केलेले योगदान विद्यार्थी समजून घेत आहेत. आजच्या युगात भाषांतरविद्यचे कौशल्य असणे हे महत्वाचे आहे. भाषांतरामध्ये भाषांतरविषयीची कौशल्ये सांगून भाषांतराचे वेगवेगळे प्रकार स्पष्ट केले जातात. १९६० नंतरच्या वेगवेगळ्या वृत्ती, प्रवृत्तीचा त्या कालखंडातील साहित्यकृतीद्वारे विचारविमर्श करणे आवश्यक आहे. १९६० नंतरच्या स्थित्यंतराचा प्रेरणा आणि त्यामधून उदयाला आलेल्या नव्या प्रवृत्ती मराठी साहित्यकृतींच्याद्वारे अभ्यासकांपर्यंत पोचविणे. साहित्यातील वैचारिकता, मूल्ये, शैली, भाषा, तंत्रे इत्यादींचा सामाजिक संदर्भ तपासून पाहणे. साहित्याचा समाजशास्त्रीय अंगाने अभ्यास करण्यासाठी नवी मळवाट (कवितासंग्रह)- शरदचंद्र मुक्तिबोध, ओझ (कथासंग्रह)- विठ्ठल गावस, धग (कादंबरी)- उध्दव शेळके, देवनवरी (नाटक)- प्रेमानंद गज्वी या साहित्यकृती आहेत.
लोकसाहित्यामध्ये असलेल्या अनेक प्रकारांचा तसेच त्याच्या आविष्कारांच्या स्वरूपलक्षणांची चर्चा ‘लोकसाहित्याचा अभ्यास’ या विषयामध्ये केली जाते. मराठी साहित्यक्षेत्रात आशयाच्या व भाषेच्या दृष्टीने महत्वाचा ठरलेला दलित साहित्याचा हा प्रवाह अभ्यासणे आवश्यक आहे.  विज्ञानाचे मराठी साहित्यामध्ये झालेल्या आविष्कारांचे स्वरूप तपासून पाहण्यासाठी ‘विज्ञान साहित्य’ हा विषय महत्त्वपूर्ण आहे.
मराठी साहित्यक्षेत्रात आशयाला व आविष्कारांच्या दृष्टीने वेगळे ठरलेल्या स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या अभ्यास महत्त्वाचा आहे, स्त्रियांची मराठीतील आत्मचरित्रे पटावरील प्यादे- यमुनाबाई खाडिलकर, सांजवात- आनंदीबाई शिर्के, सांगते ऐका- हंसा वाडकर, मी वनवासी- सिंधू सपकाळ या आत्मचरित्रांचा अभ्यास करणे शक्य आहे. मराठीतील पौराणिक साहित्याचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांंना पुराणग्रंथांचे महत्त्व समजणे आवश्यक आहे. तसेच मराठी साहित्याची पौराणिक परंपरा जाणून घेणे गरजेचे आहे. यात किचकवध – कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, एकलव्य – शरद दळवी या साहित्यकृतींचा समावेश आहे. ‘मराठीतील ऐतिहासिक साहित्याचा अभ्यास’ वसंत कानेटकर ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकाचा तर वसंत वरखेडकर यांच्या ‘सत्तावनचा सेनानी’ कादंबरीचा अभ्यास होणार आहे. ‘उपयोजित समीक्षा’ या समीक्षेच्या प्रांतात समाजशास्त्रीय समीक्षा, स्त्रीवादी समीक्षा, मानसशास्त्रीय समीक्षा, आदी बंधात्मक समीक्षा, रूपवादी समीक्षा, काव्यात्म समीक्षा या समीक्षापद्धती अभ्यासल्या जाणार आहेत.
भावी साहित्यिकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा ‘सर्जनशील लेखन’ हा विषय आहे. वैचारिक साहित्याचा अभ्यास यात ‘संपूर्ण चाणक्य नीती’चा परिचय विद्यार्थ्यांना होतो. ‘मराठी विनोदी साहित्याचा अभ्यास’ यात  सुदाम्याचे पोहे – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, व्यक्ती आणि वल्ली – पु. ल. देशपांडे या साहित्यकृती अभासल्या जाणार आहेत.
‘मोडी : भाषिक व साहित्य परंपरा’ या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मराठीतील नियतकालिके (१८३२ ते १९०६) अनंत भालेराव यांनी   संपादित केलेले केसरी, मराठा सुधारक, माडखोलकर यांनी संपादित केलेले तरुण भारत या नियतकालिकांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रांत केलेले कार्य मुक्तिपूर्व गोमंतकातील नियतकालिकांचे स्वरुप व कार्य यात प्रभात, स्वयंसेवक, भारत, भारतमित्र यांचा समावेश आहे.
गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने गेल्या वर्षापासून विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित केलेत. २५ गोमंतकीय साहित्यिकांचे ध्वनिचित्रमुद्रण केले. उन्नत भारत अभियानांतर्गत शिरदोन येथे सामाजिक उपक्रम आयोजित केले. मराठी विकिपीडिया तसेच संशोधन विषयावर मार्गदर्शानात्मक अनुक्रमे दोन कार्यशाळा आयोजित केल्या. ‘लोकसाहित्याचा अभ्यास : संशोधन व आव्हाने’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला त्यात सात वेगवेगळ्या विद्यापीठातील प्रतिनिधींचा समावेश होता. याच परिसंवादात मराठी विभागाचे पहिले पुस्तक प्रकाशित करण्यात आले. शैक्षणिक सहलीअन्तर्गत गजानन रायकर यांची भेट घेतली. भारतकार हेगडे देसाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पूर्वाश्रमीची गोमंतकीय राजधानी चांदोर, तसेच मिनिझीस ब्रागांझा यांच्या घराला भेट दिली. यावर्षी बाळा राया मापारी स्मारक, सप्तकोटेश्वर मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, नानुस किल्ला, ब्रम्ह करमली मंदिर यांना भेट दिली. आंतर महाविद्यालयीन घुमट आरती स्पर्धा आयोजित केली. यात संत सोहिरोबानाथ अध्यासनाचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. गोवा विद्यापीठात मराठीसाठी विद्यार्थी संख्या वृद्धिंगत होत आहे. मराठीचा झेंडा हातात घेऊन गौरवशाली भविष्याकडे वाटचाल सुरु आहे.