कातडीबचाऊ

0
126

नेतृत्वाच्या पोकळीमध्ये गटांगळ्या खात असलेल्या कॉंग्रेसमधून अंतर्विरोधाचे सूर काही केल्या थांबताना दिसत नाहीत. उलट दिवसेंदिवस ते अधिकाधिक प्रखर होत चालले आहेत. राहुल गांधी पक्षाध्यक्षपदावरून एकाएकी पायउतार होऊन चालते झाले ही पक्षापुढील सर्वांत मोठी समस्या आहे असे हताश उद्गार पक्षाचे ज्येष्ठ नेते व मुस्लीम विचारवंत सलमान खुर्शीद यांनी काढले आहेत. त्या पाठोपाठ पक्षाचे दुसरे एक खंदे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील पक्षाने तातडीने आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे अशी कबुली जाहीरपणे देऊन टाकली आहे. तिकडे संजय निरुपम राजनाथसिंगांनी राफेलच्या केलेल्या शस्त्रपूजेच्या मुद्द्यावरून मल्लिकार्जुन खड्‌गेंना ‘नास्तिक’ संबोधून मोकळे झाले आहेत. एकेका खंद्या नेत्याकडून चाललेले हे आपसातील शरसंधान पाहिले तर कॉंग्रेस पक्षाची मोट एकत्र बांधून ठेवणे येणार्‍या काळामध्ये किती कठीण आहे याचे प्रत्यंतर येते. सध्या महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे आहे. परंतु तेथे भाजपा व मित्रपक्षांशी दोन हात करण्यास पक्षाला सज्ज करायचे सोडून पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सरळ कंबोडियाला सुट्टीवर निघून गेले. राहुल यांच्या पदत्यागानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची धुरा जरी सांभाळीत असल्या, तरी पक्ष निर्धाराने त्यांच्या मागे उभा असल्याचे दिसत नाही. उलट पक्षाचे जोखड मानेवरून फेकून द्यायलाच अनेक दिग्गज नेते उतावीळ असल्याचे व योग्य मोक्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसते आहे. काही नेते तर आडून आडून भाजपा नेतृत्वाला नेत्रपल्लवी करीत राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासारख्या अनेक राज्यांतील दिग्गज नेते रातोरात पक्ष सोडून चालते झाले. नेत्यांची नवी पिढी तर कॉंग्रेसपासून केव्हाच दूर चालती झालेली आहे. अशा परिस्थितीत जे आहेत, ते पक्षाला नवसंजीवनी देण्यास कितपत उत्सुक आहेत आणि त्यासाठी किती किंमत मोजायची त्यांची तयारी आहे हे तपासले तर विदारक चित्रच दिसते. कॉंग्रेसच्या या मंडळींना विनासायास मिळत असेल तर सत्ता जरूर हवी आहे, परंतु त्यासाठी पक्ष एकसंध ठेवण्यासाठी, त्याला नवी ऊर्जा देण्यासाठी जी जिद्द लागते ती त्यांच्यापाशी नाही आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी जी काही किंमत मोजावी लागते, ती मोजण्याची त्यांची मुळीच तयारी नाही. सहजपणे पक्षनिष्ठेचे लाभ मिळत असतील तर त्यांना हवे आहेत, परंतु त्यासाठी समोरच्या प्रबळ सत्ताधिशांशी दोन हात करण्याचे धैर्य त्यांच्यात नाही. अर्थात, त्याला तशीच कारणे आहेत. अनेक कॉंग्रेस नेत्यांचे हात पूर्वी केलेल्या गुन्ह्यांमुळे दगडाखाली अडकलेले आहेत. सत्ताधीश ईडीचा ससेमिरा मागे लावतील याची धास्तीही अनेकांना आहे. जे आक्रमकपणे सत्ताधिशांवर तुटून पडले, त्यांचे काय झाले हे चिदंबरम ते डी. के. शिवकुमार पर्यंत त्यांनी पाहिलेच आहे. त्यामुळे उगाच कशाला नसत्या भानगडीत पडा असा साळसूद विचार करून ही मंडळी स्वतः नामानिराळी राहू पाहात आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद त्यागले त्याला खरे म्हणजे कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांची कातडीबचाऊ वृत्ती हेच प्रमुख कारण होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या प्रचाराची सर्व धुरा राहुल यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली होती. त्यांनी मोदी सरकारवर टीका केली, मोदींना व्यक्तिगत टीकेचे लक्ष्यही केले. परंतु हे सगळे त्यांनी चालवले असताना अन्य कॉंग्रेसजनांनी त्यापासून ‘मी नाही त्यातला’ म्हणत दूर राहणेच पसंत केले. कॉंग्रेसच्या प्रचारनीतीशी – मग ती योग्य असेल अथवा अयोग्य – ते समरस झाल्याचे कधीच दिसले नाही. निवडणूक निकालानंतरच्या बैठकीमध्ये राहुल यांनी काही ज्येष्ठ नेत्यांच्या ‘पुत्रप्रेमा’ वर बोट ठेवले ते बोलके होते. ते नेते राज्यातील पक्षाच्या कामगिरीकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या पुढच्या पिढीचा विजय सुकर करण्यासाठीच धडपडत राहिले. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीतही पक्षाची धूळधाण उडाली असा राहुल यांनी ठेवलेला ठपका होता. ते पक्षनेतृत्व स्वीकारायला तयार नाहीत कारण आपल्या अवतीभवतीच्या मंडळींचे कातडीबचाऊ रूप त्यांना कळून चुकले आहे. कॉंग्रेसला लागलेली गळती आणि तिचा सतत विनाशाकडेच चाललेला प्रवास पाहिला तर या बुडत्या तारवाचे सुकाणू हाती घेण्यास कोण पुढे येणार, त्याला त्यात कितपत यश येणार याविषयी शंका निर्माण होणारी परिस्थिती दिसते आहे. येत्या विधानसभा निवडणुका हा कॉंग्रेसच्या पुनर्उभारणीतील नवा टप्पा ठरू शकला असता, परंतु ज्या प्रकारे निवडणुकीआधीच तलवारी टाकल्या गेल्या आहेत ते पाहिल्यास प्रश्नचिन्हच उभे राहते. सोनिया गांधी यांच्यावर सध्या पक्षनेतृत्वाची अंतरिम का होईना, धुरा आहे. पक्षातील विद्यमान परिस्थिती आणि अंतर्विरोध पाहता, येणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला नवी संजीवनी देण्याच्या दिशेने एक तरी पाऊल त्या टाकू शकणार आहेत का? जय पराजय हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विधिलिखितामध्ये असतोच, परंतु कॉंग्रेसने एवढे हतवीर्य होणे अजबच म्हणायला हवे!