ममता बॅनर्जीवरील हल्ल्याची आयोगाकडून चौकशी सुरू

0
204

पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम भागात निवडणूक प्रचाराच्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या गंभीर जखमी झाल्या असून त्यांनी हा आपल्यावर हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक अधिकार्‍यांकडे घटनेवर विस्तृत अहवालाची मागणी केली आहे. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कोलकाताच्या एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे पुढील दोन दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पायाला, खांद्याला आणि गळ्यावर जखमा आहेत. तसेच त्यांच्या डाव्या पायाच्या हाडालाही गंभीर दुखापत झाली आहे. पाय सुजलेल्या अवस्थेत आहे. डॉक्टरांनी ममतांना जवळपास दीड महिने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांवर झालेल्या या हल्ल्यासंबंधी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कार्यक्रमात बदल केला असून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रमही स्थगित केला आहे.

दरम्यान, ममतांकडून हल्ल्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. ममतांनी या गोष्टीचे राजकारण करू नये. असे भाजप नेत्या रुपा गांगुली यांनी म्हटले आहे.
ममतांची तक्रार करण्यासाठी भाजप नेत्यांचे एक प्रतिनिधीमंडळही आज निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेणार आहे. तसेच कॉंग्रेस व डाव्या नेत्यांनीही ममता बॅनर्जी आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे.