कॉंग्रेसमधून फुटलेल्या आमदारांच्या अपात्रता याचिकेवर आज सुनावणी

0
236

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर दाखल अपात्रता याचिकेवर आज शुक्रवार दि. १२ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

सभापती राजेश पाटणेकर यांनी गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवर यापूर्वी दोनदा सुनावणी घेतली आहे. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी सभापतींसमोर ऑगस्ट २०१९ मध्ये कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली.

सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांनी एक याचिका दाखल करून सभापतींना आमदार अपात्रता याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यासाठी निर्देश देण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांच्या याचिकेवर मागील महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी २६ फेब्रुवारी २०२१ रोजी अपात्रता याचिकेवर सुनावणी घेऊन निकालात काढली जाईल, असे सभापतींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. तथापि, त्यानंतर सभापतींनी एकाच दिवशी याचिकेवर निवाडा देणे शक्य नसल्याचे न्यायालयाला कळविले.

सर्वोच्च न्यायालयात चोडणकर यांची आमदार अपात्रता याचिका ८ मार्चला सुनावणीला येणार होती. पण त्या दिवशी न आल्याने चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निबंधकांकडे आपल्या याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्याची मागणी केली आहे.