Home Featured मनोज परब यांचा आरजीपीला रामराम

मनोज परब यांचा आरजीपीला रामराम

0

आरजीपीचे अध्यक्षपद सोडले; पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामाही दिला; पक्षांतर्गत राजकारणामुळे घेतला निर्णय

रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजीपी) गेले दोन महिने सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर काल अखेर मनोज परब यांनी पक्षाचे अध्यक्षपद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच सक्रिय राजकारणातून संन्यास घेत असल्याचे काल पक्ष मुख्यालयातील पत्रकार परिषदेत जाहीर केले. पक्षातील अंतर्गत राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आपणाला धक्का बसला असून, त्यामुळे आपण राजीनामा देत आहे, असे मनोज परब यांनी स्पष्ट केले. आपली भूमिका मांडल्यानंतर आणि राजीनाम्याच्या घोषणेनंतर पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर न देता मनोज परब हे पक्ष मुख्यालयातून निघून गेले. यानंतर सायंकाळी झालेल्या आरजीपीच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीत मनोज परब यांचा अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात आला.
आरजीपीमध्ये अंतर्गत राजकारण होईल असा कधीच विचार सुध्दा केला नव्हता. आता, पक्ष ताब्यात घेण्याची लढाई सुरू झाली आहे. काही पक्ष सदस्यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या विरोधात गुप्त बैठका घेतल्या, असा आरोप मनोज परब यांनी केला.

2017 ते 2022 पर्यंत कोणतीही बंधने नसलेली आरजीपी ही शुद्ध क्रांती होती. हा काळ आपणासाठी सर्वोत्तम होता. आता, राजकीय पक्ष बनल्यानंतर आपणावर बंधने आणली गेली. पक्षाने वेगळी भूमिका घ्यावी, म्हणून अंतर्गत दबाव वाढला. आपल्या बेधडक स्वभावाला आवर घालण्याची सूचना केली जाऊ लागली. आपण मवाळ होण्याचा प्रयत्न केला; पण मूळचा स्वभाव आक्रमक असल्याने त्यात बदल करू शकलो नाही. आपण लोकांच्या समस्या घेऊन आक्रमक बनत होतो, असे परब यांनी सांगितले. मात्र पक्षातील वाढती बेशिस्त आणि अंतर्गत वाद संपवण्यात आपण यशस्वी ठरलो नाही, असेही त्यांनी नमूद केले.

2022 नंतर संघटनेची वाटचाल राजकीय पक्ष म्हणून सुरू झाली. त्यामुळे पक्षावर ताबा मिळवण्यासाठी चढाओढी सुरू झाल्या. तसेच, वैयक्तिक राजकारण सुरू झाले. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मडगाव येथे बैठक घेऊन पक्षविरोधी कारवाया सुरू केल्या. तसेच, पक्षाच्या कार्यकारी समितीमध्ये बदल करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला गेला, असेही मनोज परब यांनी सांगितले.

मागील तीन वर्षे पक्षात सुरू असलेला बेशिस्त कारभार आपण पाहत होतो. त्या कारभारावर वेळीच कडक निर्णय घेऊन नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. त्यामुळे पक्षात बेशिस्त आणखी वाढली. आपण पक्षातील शिस्तीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलो, असेही मनोज परब यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांची उपस्थिती होती.

सीईसीने राजीनामा स्वीकारला
आरजीपीच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीत मनोज परब यांचा अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वीकारण्यात आला. आरजीपी या प्रादेशिक पक्षाचे काम यापुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती आरजीपीचे खनिजदार अजय खोलकर यांनी पक्षाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी सरचिटणीस विश्वेश नाईक व इतरांची उपस्थिती होती. दरम्यान, आमदार वीरेश बोरकर यांना या बैठकीसाठी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र ते हजर राहिले नाहीत.

पक्षासाठी मोठे योगदान
आरजीपी-सीईसीच्या बैठकीत अध्यक्ष मनोज परब यांच्या राजीनामा पत्रावर सविस्तर चर्चा करून तो स्वीकारण्यात आला. आरजीपीसाठी मनोज परब यांनी मोठे योगदान दिले आहे. पक्षांतर्गत वादामुळे मागील दोन महिन्यांपासून ते अस्वस्थ बनले होते, असेही आरजीपीचे खनिजदार अजय खोलकर यांनी सांगितले.

मनोज परब यांची राजकीय कारकीर्द

मनोज परब यांनी 2016 मध्ये आम आदमी पक्षातून राजकारणात प्रवेश केला.
मार्च 2017 मध्ये वीरेश बोरकर, विश्वेश नाईक व इतर समविचारी व्यक्तींना सोबत घेऊन रिव्होल्युशनरी गोवन्स या बिगर सरकारी संघटनेची स्थापना केली.

या संघटनेला 2021 मध्ये राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि फुटबॉल हे पक्षचिन्ह निश्चित झाले.
आरजीपी या प्रादेशिक पक्षाने 2022 मध्ये गोवा विधानसभेची निवडणूक लढविली.
मनोज परब हे आरजीपीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते.
मनोज परब यांनी वाळपई आणि थिवी या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला.

या निवडणुकीत आरजीपीला एकूण 90 हजार मते मिळाली.
सांत आंद्रे मतदारसंघातून वीरेश बोरकर हे पक्षाचे एकमेव उमेदवार आमदार म्हणून निवडून आले.
मनोज परब यांनी 2024 मध्ये उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली; मात्र या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर त्यांनी सात महिने राजकारणातून विश्रांती घेतली.
जानेवारी 2025 पासून मनोज परब हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते.
21 मे 2026 रोजी मनोज परब यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली.

पक्षासाठी मोठे योगदान
आरजीपी-सीईसीच्या बैठकीत अध्यक्ष मनोज परब यांच्या राजीनामा पत्रावर सविस्तर चर्चा करून तो स्वीकारण्यात आला. आरजीपीसाठी मनोज परब यांनी मोठे योगदान दिले आहे. पक्षांतर्गत वादामुळे मागील दोन महिन्यांपासून ते अस्वस्थ बनले होते, असेही आरजीपीचे खनिजदार अजय खोलकर यांनी सांगितले.