Home Featured पुलवामा दहशतवादीहल्ल्याचा सूत्रधार ठार

पुलवामा दहशतवादीहल्ल्याचा सूत्रधार ठार

0

2019 साली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) 40 जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी हमजा बुरहान याची पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये अज्ञाताकडून हत्या करण्यात आली. ‘डॉक्टर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हमजावर अज्ञात बंदुकधाऱ्याने अनेक गोळ्या झाडल्या. मुझफ्फराबाद येथे झालेल्या हल्ल्यात हमजा मारला गेला. पुलवामाचा रहिवासी असलेल्या हमजाला केंद्रीय गृहमंत्रालयाने 2022 साली दहशतवादी म्हणून घोषित केले होते.

पाकिस्तानचे समर्थन असलेल्या अल-बद्र या संघटनेच्या कामात हमजा याचा सक्रिय सहभाग होता, तर पुलवामा हल्ल्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगितले जाते.

23 वर्षीय हमजा बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलझार दार असे होते. पुलवामाच्या रत्नीपोरा भागातील खरबतपोरा येथे त्याचा जन्म झाला होता. 2017 साली उच्च शिक्षणाच्या नावाखाली तो पाकिस्तानला गेला होता. पुढे तो बंदी घातलेली अतिरेकी संघटना अल-बद्रमध्ये सामील झाला आणि या संघटनेच्या कमांडर पदावर पोहोचला.

जम्मू-काश्मीरमध्ये परतल्यानंतर बुरहानने तरुणांमध्ये कट्टरपंथी विचार पसरविण्यास आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्यास सुरुवात केली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामापासून ते सोपियान पर्यंत त्याने त्याचे जाळे पसरवले होते.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथील हल्ल्यातही त्याचा सहभाग होता. जैश-ए-मोहम्मद या संघटनेकडून 2019 साली सीआरपीएफच्या ताफ्यावर भीषण हल्ला करण्यात आला होता त्यात 40 जवानांना प्राण गमवावे लागले होते.