Home Featured हॅलो पापा!

हॅलो पापा!

0

दोनापावल येथे बड्या बापाच्या एका मद्यधुंद बेट्याने नशेत अत्यंत बेदरकाररीत्या आपले आलिशान वाहन चालवून इतर तीन वाहनांचा चुराडा केला. पोलिसांशी अरेरावी करतानाचे त्याचे व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाले. ह्या एकंदर प्रकाराबद्दल नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कोणाचा बळी गेला नाही. सदर वाहनाचा वेग आणि चालकाचा वाहनावरील सुटलेला ताबा लक्षात घेता, ही दुर्घटना अधिक घातक ठरू शकली असती. अनेकांचा बळी घेऊ शकली असती. मद्याच्या नशेत झालेली दुर्घटना हा कधीही अपघात नसतो. तो माजोर्ड्या वृत्तीने निरपराधांचा केलेला घात असतो. त्यामुळे अशा बेवड्या चालकांना कायद्याचा अत्यंत कठोर बडगा दाखवल्याशिवाय अशा प्रकारांना अटकाव होणारच नाही. अपघात घडल्यानंतर आपल्या ‘पापा’ला फोन करून प्रकरण निस्तरायला लावले की आपला केसही कोणी वाकडा करू शकणार नाही अशी निर्धास्तता असल्यानेच ही बेफिकिरी आणि बेपर्वाई दिसते. कोणत्याही राजकारण्याने कितीही दबाव आणला तरी त्याला भीक न घालता आपले कर्तव्य बजावण्याची आणि हा माज उतरवण्याची धमक कायद्याच्या रक्षकांमध्ये असायला हवी. अन्यथा गोव्याच्या रस्तोरस्ती रक्ताचे सडे पडत राहतील. बाणस्तारी येथे काही वर्षांपूर्वी घडलेल्या अपघातानंतर तरी गोव्यातील रस्ता अपघातांच्या परिस्थितीत सुधारणा घडेल असे वाटले होते. परंतु कसले काय! त्या अपघातात मर्सिडीज होती, ह्यावेळी बीएमडब्ल्यू आहे एवढाच फरक आहे. बाकी मद्यधुंदता आणि माजोर्डी वृत्ती तीच! बाणस्तारी अपघातातील वाहन मालक नव्हे, तर चालक चालवत होता हे सिद्ध करायला तेव्हा नेतेगिरी करणारे एक वकील हिरीरीने पुढे झाले होते, परंतु तो डाव उधळला गेला. ते अपघात प्रकरण भरघोस भरपाई देऊन मिटवले गेले. पण गोव्याचे रस्ते हे अजूनही मृत्यूचे सापळेच आहेत. दिवसागणिक माणसे किड्यामुंग्यांप्रमाणे मृत्युमुखी पडत आहेत. गेल्या चार महिन्यांतच गोव्यात साडे आठशे अपघात घडले आणि त्यामध्ये नव्वद जण मृत्युमुखी पडले. वर्षाला किमान तीन हजार अपघात येथे होतात आणि त्यामध्ये किमान चारशे बळी जातात. गोव्यासारख्या छोट्या राज्यातील अपघातांचे हे प्रचंड प्रमाण सुन्न करणारे आहे. पोलीस नावाची यंत्रणा राज्यात अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी ही विदारक स्थिती आहे. सरकार रस्तासुरक्षा उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणार अशी ग्वाही मागील एका अर्थसंकल्पात दिली गेली होती. ते आठशे चाळीस कोटी रुपये कशावर खर्च झाले? राज्यातील अपघातांपैकी नव्वद टक्के अपघात हे मद्यप्राशनामुळे होतात असे मध्यंतरी सांगण्यात आले. पण मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांना अटकाव का होत नाही? संध्याकाळनंतरचे बहुसंख्य अपघात जर मद्यप्राशनामुळे होत असतील, तर निरपराधांचे जीव वाचवण्यासाठी वाहतूक पोलीस जागोजागी वाहनांची तपासणी करीत रस्त्यावर उभे का नसतात? कोट्यवधी खर्चून ठिकठिकाणी लावलेले एआय कॅमेरे काय केवळ चलनांचे सोपस्कार करण्यासाठीच आहेत? बाणस्तारी अपघातातील चालकाला सहावेळा चलन दिले गेले होते. दोनापावलाच्या अपघातातील चालकाने यापूर्वीही अपघात केला होता आणि न्यायालयाने त्याला दोषीही धरले होते. मग तरीही तो मद्याच्या नशेत वाहन रस्त्यावर कसे आणू शकला? या चालकाचा वाहन चालवण्याचा परवाना तात्काळ निलंबित करावा. याच दोनापावलात काही दिवसांपूर्वीच अशाच एका आलिशान कारच्या धडकेने 23 वर्षीय तरुणीचा हकनाक बळी गेला होता. असे अपघात घडताच मग अपघात करणाऱ्यांचे ‘पापा’ प्रकरण मिटवण्यासाठी सक्रिय होतात. वर्तमानपत्रांत बातम्या येऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न करतात. पोलिसांनी तपासात त्रुटी ठेवाव्यात म्हणून प्रयत्न होतात. काही ठिकाणी त्यांना यश येत असेल, परंतु आजच्या समाजमाध्यमांच्या युगामध्ये असे अपराध दडपता येणार नाहीत. तरुणाई स्वस्थ बसणार नाही. ह्या बड्या ‘पापां’नी आपल्या मुलांनी केलेल्या पापाकडे आधी पाहावे. आपल्या बेवड्या मुलामुळे कोण्या निरपराधाचा जीव जाऊ शकला असता, कुटुंबे उद्ध्वस्त झाली असती, याचा विचार करावा. सर्वांत मोठी जबाबदारी पोलिसांची आहे. अशा अपघाताच्या घटनांमध्ये वाहन चालकावर कठोरातील कठोर कारवाई व्हावी. रस्ता अपघातांबाबतीत कायद्याचा धाकच नाही अशी आज परिस्थिती आहे. गोव्याच्या रस्त्यांवरून संध्याकाळी सहानंतर वाहन चालवणे म्हणजे प्राणांची बाजी लावणे बनले आहे. मद्याच्या नशेत आलिशान वाहने दामटणारे हे यमदूत वेळीच रोखा! रस्ता अपघातांच्या बाबतीतही ‘इनफ इज इनफ’ म्हणण्याची वेळ आज नक्कीच आली आहे.