राज्य निवडणूक आयोगाने आगामी 11 नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आकडेवारीच्या आधारे नगरसेवकांची संख्या निश्चित करणारा आदेश काल जारी केला. मडगाव आणि मुरगाव या दोन नगरपालिकांतील नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. यापूर्वी आयोगाने जारी केलेल्या नगरसेवकांच्या आकडेवारीत घट दाखविण्यात आली होती.
‘अ’ श्रेणीतील नगरपालिका म्हणून वर्गीकृत असलेल्या मुरगाव आणि मडगावमध्ये प्रत्येकी 27 नगरसेवक असणार आहेत. ‘ब’ श्रेणीतील म्हापसा नगरपालिकेत 20 नगरसेवक, कुडचडे-काकोडा नगरपालिकेमध्ये 17 नगरसेवक, डिचोली आणि कुंकळ्ळी या या दोन नगरपालिकांमध्ये प्रत्येकी 15 नगरसेवक, केपे नगरपालिकेत 14 नगसवेक, काणकोण नगरपालिकेमध्ये 13 नगरसेवक, ‘क’ श्रेणीतील वाळपई, पेडणे आणि सांगे या तीन नगरपालिकांमध्ये प्रत्येकी 10 नगरसेवक निश्चित करण्यात आले आहेत. गोवा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी यासंबंधीची एक सूचना जारी केली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 11 नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य निवडणूक आयुक्त डिसोझा यांनी जारी केला आहे. नगरपालिकांतील प्रभाग फेररचनेसाठी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) यांची नियुक्ती केली आहे. तालुक्यातील उपजिल्हाधिकारी आणि मामलेदार यांची मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.