Home Featured मारहाणीच्या निषेधार्थ पत्रादेवी सीमेवर महामार्ग रोखला

मारहाणीच्या निषेधार्थ पत्रादेवी सीमेवर महामार्ग रोखला

0

तळवडे-सावंतवाडीतील कुटुंबाला मांद्रे येथे मारहाण; पोलीस तक्रार नोंदवत नसल्याचा आरोप

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेल्या तळवडे (सिंधुदुर्ग) येथील परब कुटुंबाला गोव्यातील स्थानिक तरुणांनी केलेल्या बेदम मारहाणीचे तीव्र पडसाद काल पत्रादेवी-बांदा सीमेवर उमटले. मांद्रे पोलिसांनी मारहाणीची तक्रार घेण्यास केलेली टाळाटाळ आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या युवासैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी सीमेवर तब्बल अर्धा तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर बांदा पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक सुरज परब हे आपल्या कुटुंबासह मांद्रे येथील किनाऱ्यावर रविवारी पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी समोरून येणारा एक मद्यधुंद चालक त्यांच्या वाहनाला धडकला. याबाबत जाब विचारल्यानंतर संबंधित चालकाने काही लोकांना बोलावून घेतले. सुमारे 40 जणांनी जमाव करून कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप परब यांनी केला. माझ्या डोक्यावर काचेच्या बाटलीने वार करण्यात आला. इतकेच नव्हे तर 5 वर्षांच्या लहान मुलीसह घरातील महिलांनाही अत्यंत निर्घृणपणे धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली, असा थरकाप उडवणारा अनुभव परब यांनी सांगितला.

या घटनेनंतर पोलिसांना संपर्क साधला असता कोणतेही सहकार्य मिळाले नाही तसेच तक्रारही नोंदवून घेतली गेली नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. या निषेधार्थ नागरिकांनी पत्रादेवी-बांदा सीमेवर रास्ता रोको केला.

मांद्रे पोलिसांची उदासीनता
या घटनेनंतर परब कुटुंबाने मांद्रे पोलिसांशी संपर्क साधला, मात्र पोलिसांनी सहकार्य करण्याऐवजी, रात्रीच्या वेळी ते नशेत असतील, यात तुम्हालाच त्रास होईल, असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या सिंधुदुर्गातील युवासैनिकांनी सुरज परब यांच्या नेतृत्वाखाली थेट महामार्ग रोखण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. बांदा पोलिसांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करत परिस्थिती हाताळली. परब कुटुंबाकडून रितसर तक्रार अर्ज घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आणि जवळपास अर्ध्या तासानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.