आमदार वीरेश बोरकर; काँग्रेसमध्ये जाणार नाही; पक्षाशी एकनिष्ठ; 2027 ची निवडणूक आरजीपीच्या उमेदवारीवरच लढणार
काँग्रेस पक्षात प्रवेश करणार ही निव्वळ अफवा आहे. आपण रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाशी एकनिष्ठ असून, आगामी 2027 ची निवडणूक आरजीपीच्या उमेदवारीवरूनच लढविणार आहे. आपण गोव्याबाहेर असल्याने पक्षांतर्गत वादावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पक्ष कार्यालयात भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चेवेळी आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देणार आहे. तसेच, त्यांचे काही प्रश्न असल्यास ते जाणून घेणार आहे. पक्षातील अंतर्गत वादावर पक्षीय पातळीवर तोडगा काढला जाणार आहे, असे सांत आंद्रेतील आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी काल पर्वरी येथे गोवा विधानसभा संकुलातील आपल्या कार्यालयात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आरजीपी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यामधील अंतर्गत वाद सध्या उफाळून आलेला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मनोज परब यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या घटनेनंतर पत्रकारांनी आमदार वीरेश बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, परराज्यात असल्याने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती.
आमदार वीरेश बोरकर यांनी गोव्यात परतल्यानंतर पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलातील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
आपण आमदार या नात्याने प्रामाणिकपणे कार्य करीत आहे. गोवा विधानसभेत आपला मतदारसंघ, तसेच इतर भागातील आपल्यासमोर आलेल्या समस्या मांडण्याचे काम करीत आहे. टीसीपीच्या कलम 39 अ विरोधात उपोषण आंदोलनानंतर आपल्याला आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे उपचारासाठी परराज्यात जावे लागत आहे. आरजीपी-सीईसी बैठकीच्या वेळी आपण गोव्यात नव्हतो. याबाबतची कल्पना पक्षाच्या कार्यालयाला दिली होती, असेही आमदार बोरकर
यांनी सांगितले.
गोव्यातील पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे, जमीन वाचविणे हाच आमचा मुख्य उद्देश होता. आजही राज्याला भेडसावणारे विविध विषय मांडण्याची गरज आहे. आरजीपीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यापुढे एकजुटीने कार्यरत राहतील, असा विश्वास बोरकर यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशन घाईघाईने स्थगित केल्याप्रकरणात राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले होते. तथापि, त्या निवेदनावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही झालेली नाही. आपण सहा महत्वपूर्ण विधेयके सादर केली होती. अधिवेशन स्थगित करण्यात आल्याने ती चर्चेला येऊ शकली नाहीत. गोवेकरांच्या हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा प्रलंबित आहे. सभापतींना पत्र पाठवून विधानसभेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याची विनंती करणार आहे, असेही बोरकर
यांनी सांगितले.
चर्चेनंतर भूमिका स्पष्ट करणार
आरजीपीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा केल्यानंतर अंतर्गत वादाच्या विषयावर भूमिका जाहीर करणार आहे. पक्षातील अंतर्गत वादावर पक्षाच्या घटनेनुसार तोडगा काढला जाणार आहे. आपणावर होणाऱ्या पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्टीकरण केले जाणार आहे, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. आरजीपीचे माजी अध्यक्ष मनोज परब आणि आपण एकत्र काम केले आहे. ते माझ्या हृदयात कायम आहे. आपणाला त्यांच्या राजीनाम्यामुळे दुःख झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
अधिवेशन पुन्हा बोलवा
गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घाईघाईने स्थगित करून विधानसभेत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याचा लोकप्रतिनिधींचा हक्क नाकारण्यात आला आहे. राज्यातील विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन पुन्हा बोलावण्याची मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली.