मडगावात सुरक्षा रक्षकाने पाच वाहनांना लावली आग

0
253

>> ५ लाखांचे नुकसान, संशयिताला स्थानिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

मुंजविहार घोगळ व मडगाव येथे एका सुरक्षा रक्षकाने पाच चारचाकी वाहनांना आग लावून ती वाहने जाळल्याची घटना काल मंगळवारी घडली. यामुळे सर्व वाहन मालकांचे मिळून ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी अँथनी जुझे कार्दोज (२६) या सुरक्षा रक्षकाला पकडून पोलसांच्या ताब्यात दिले. ही सर्व वाहने कित्येक महिन्यांपासून तिथे पार्क करून ठेवली होती.

अँथनी कार्दोज हा सालसेत बाजार येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. काल मंगळवारी दुपारी त्याने एक बस, एक टेम्पो ट्रॅव्हल, दोन पीकअप व एक कार अशा पाच वाहनांना आग लावली.
आग लावलेल्या वाहनांत मुंजविहार घोगळ येथील जीए ०८ व्ही ३०७३ या व्हिंगर कारचा समावेश आहे. ती कार सुधा जांबावलीकर आके यांच्या मालकीची आहे. महेंद्र दिगंबर नाईक यांच्या मालकीची जीए ०१ यू ४२२९ ही मिनीबस आहे. त्याचप्रमाणे दोन पीकअप व एका टेम्पो ट्रॅव्हललाही आग लावली. ही वाहने भंगारसाठी ठेवली होती असे सूत्रांनी सांगितले.
सुरक्षा रक्षक अँथनी हा लायटर घेऊन बसखाली आग लावत होता. त्यावेळी स्थानिकांनी त्याला पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर अग्निशामक दलाने आग विझवली. ही आग लावण्याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.