मडगावातील आस्थापन व्यवस्थापकाचे अपहरण ः १२ तासात आरोपींना अटक

0
104

मडगाव येथील एका आस्थापनाच्या व्यवस्थापकाचा ५ जणांनी केलेल्या अपहरणाचा प्रयत्न मायणा कुडतरी पोलिसांनी १२ तासांच्या आत उधळून लावीत सदर व्यवस्थापकाची सुखरूपपणे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कर्नाटकात जाऊन सुटका केली व अपहरण करणार्‍या ५ जणांना अटक केली.

याबाबत वृत्त असे की, ए. एन. गॅस लाईन प्रोजेक्टचे व्यवस्थापक अंबरीश प्रताप सिंग यांनी चार जणांनी मंगळवारी सायंकाळी पैशासाठी अपहरण केले व त्याला कर्नाटकात घेवून गेले. काल पहाटे शिर्सी (कर्नाटक) पोलीस व गोव्याच्या पोलिसांनी मुख्य आरोपी मोहमद मुस्ताफा (सुरतकल-कर्नाटक) याच्यासह आणखी चार जणांना अटक केली आणि काल रात्रौ उशिरा मडगाव येथे आणले.

ए. एस. गॅस लाईन प्रोजेक्टचे पर्यवेक्षक शिवम सिंग यांनी मायणा कुडतरी पोलीस स्टेशनवर मंगळवारी रात्रौ १० वा. तक्रार नोंदवताच पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला व बारा तासांच्या आत मुख्य आरोपी मोहमद मुस्ताफा, मोहमद इतईद, मोहमद हान्स, शेख सुलेमान व नवाज बावा (सर्व सुरतकल) यांना अटक केली व दोन्ही गाड्या जप्त केल्या.

मोहमद मुस्ताफ हा ठेकेदार असून याच गॅस लाईन प्रकल्पाचे त्याने रामेश्वर येथे काम केले होते. त्या कामाचे १० लाख रुपये कंपनीकडून त्याला येणे होते. दिल्लीस्थित कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधून पैशांची मागणी त्याने केली होती. प्रयत्न करुनही ती रक्कम न मिळाल्याने प्रकल्प व्यवस्थापकाचे अपहरण केल्याची कबुली त्याने दिली.
काल अपहरण केल्यानंतर येथील कर्मचार्‍यांनी मोहमदचा फोटो पाठवून तक्रार केली. नंतर मोहमदशी बोलणी केली. तोपर्यंत ती गाडी कारवारहून शिर्सीला निघाली होती. काळ्या रंगाच्या होंडा सिटीतून कोंबून त्याला नेले. उपअधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिर्सी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी चौघांना शिर्सी बाजारात पकडले. त्याआधी त्या गाडीला अपघात झाला होता. तात्काळ त्यांनी सुरतकलहून दुसरी गाडी मागितली होती. मायणा कुडतरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण कुमार वस्त, उपनिरीक्षक कशिश्मा प्रभु, तेजस कुमार नाईक, संजीत कांडोलकर व पोलीस दलाने शिर्सी येथे चार जणांना ताब्यात घेतले व पाचव्या इसमाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. कामाची रक्कम न मिळाल्याने त्यांनी अपहरण केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.