कॅसिनो आणखी ६ महिने मांडवीतच

0
134

>> सावंत मंत्रिमंडळाने घेतला निर्णय ः सहा महिन्यांनंतर कॅसिनो धोरण तयार करणार

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांचा काळ वाढवून देण्यात निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आणखी सहा महिने तेथे राहू शकतील.

हा सहा महिन्यांचा काळ पूर्ण होईपर्यंत सरकार कॅसिनो धोरण तयार करणार आहे. हे धोरण तयार झाले की मांडवी नदीतील कॅसिनोंबाबत नेमका कोणता निर्णय घ्यावा हे सरकार ठरवणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

कृषी अनुदानाला मान्यता
गोवा सरकार गेल्या चार वर्षापासून मंत्रिमंडळाची मान्यता न घेताच राज्यातील शेतकर्‍यांना अनुदान वितरीत करीत आहे. या अनुदानाच्या अर्थ खात्याचीही मान्यता नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाने कृषी अनुदानाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. आता या अनुदानाला आर्थिक मंजुरीही मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

विज्ञान – तंत्रज्ञान व कचरा
व्यवस्थापन होणार एक खाते
विज्ञान आणि तंत्रज्ञान व कचरा व्यवस्थापन ही आतापर्यंत दोन वेगवेगळी खाती होती. मात्र, राज्य सरकारने तांत्रिक बाबींचा विचार करुन ही दोन खाती विलीन करुन त्यांचे एका खात्यात रुपांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे सावंत म्हणाले.
कॅसिनो प्रकरणी तुम्ही बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात यांच्याशी चर्चा केली होती काय असे विचारले असता होय, असे उत्तर सावंत यांनी दिले. त्या दोघांनी वरील प्रकरणी आपणाशी चर्चा केल्याचे ते म्हणाले.

कॅसिनोवाल्यांनी राज्यात
गुंतवणूक केलीय ः लोबो
दरम्यान, बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांनी सांगितले की आता पुढील सहा महिने कॅसिनो मांडवीत पणजीच्या दिशेने राहतील. तद्नंतर ते बेतींच्या दिशेने मांडवीत हलवण्याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यापूर्वी योग्य प्रकारे ‘साईट इन्स्पेक्शन केले जाणार आहे. रापणकार बंधूंना त्रास होणार नाही यांचीही काळजी घ्यावी लागणार आहे, असे लोबो म्हणाले. कॅसिनोवाल्यानी राज्यात गुंतवणूक केलेली आहे. त्यांच्याबाबतीत तडकाफडकी कोणताही निर्णय घेता येत नाही. अन्यथा गुंतवणूकदारांचा गोव्यावरील विश्वास उठणार असल्याचे ते म्हणाले.