मडगावच्या नगरसेविकेसह दोघांचा बुडून मृत्यू

0
96

>>सोनारबाग-वाघुर्मे नदीतील दुर्घटना

सोनारबाग-वाघुर्मे येथील नदीत बुडणार्‍या एका युवकाला वाचविण्याच्या प्रयत्नात काल मडगावच्या युवा नगरसेविका अश्‍लेषा रमेश नाईक यांचेही सदर युवकासह बुडून निधन झाले. ही दुर्घटना काल दुपारी १२ वा.च्या सुमारास घडली.

दुर्घटनेत कारामड्डी-कुडचडे येथील महंदम अल्ताफ शेख (वय १७) याचेही बुडून निधन झाले. अलीकडेच झालेल्या मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत अश्‍लेषा आमदार दिगंबर कामत यांच्या पॅनलमधूल निवडून आल्या होत्या. समाजसेवेची आवड असलेल्या अश्‍लेषा स्वभावाने धाडसी होत्या. त्या एक उत्तम नाट्य कलाकारही होत्या.
धाडस अंगलट आले
याबाबत वृत्त असे की कुडचडे व मडगाव येथील एक गट पक्षी निरीक्षणासाठी काल सोनारबाग-वाघुर्मे (सावई वेरे पंचायत क्षेत्र) येथे गेला होता. पक्षी निरीक्षणादरम्यान छायाचित्रे वगैरे काढल्यानंतर या गटातील महंमद अल्ताफ शेख याच्या काही घरच्यांनी तेथील नदीत आंघोळ केली. ते वर आल्यानंतर महंमद व त्याचे वडील नदीत उतरले. अचानक खोलगट भागातील जोरदार प्रवाहामुळे ते बुडू लागले. महंमद याच्या वडिलांना वर काढण्यात आले. महंमद बुडत असल्याचे पाहून अश्‍लेषा यांनी पाण्यात उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. उलट स्वत:चाच जीव त्यांनी गमावला. ती दोघे बुडत असल्याचे समजल्यानंतर जवळपास रेती व खुबे काढणार्‍या काहींनी दोघांनाही लगेच वर काढले व फोंडा येथील आयडी इस्पितळात नेले. तथापि त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित
केले.
असोळणा-सासष्टी येथील रमेश नाईक यांच्या अश्‍लेषा या कन्या होत. रमेश नाईक यांचा कपाटे तयार करण्याचा उद्योग असून त्यांना पुत्र नसल्याने वडिलांचा व्यवसाय त्या सांभाळत होत्या. नदीत बुडणार्‍या एका मुलाला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतलेल्या अश्‍लेषा नाईक या त्या मुलाला तर वाचवू शकल्या नाहीत, शिवाय स्वत:चाही प्राण गमावून बसल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अश्‍लेषा आके येथील प्रतिभा गृहनिर्माण सोसायटीत राहत होत्या.
अश्‍लेषाच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबात व परिसरात दु:खाची छाया पसरली. त्यांच्या पश्‍चात वडील रमेश, आई सौ. सीमा व विवाहित बहिणी असा परिवार आहे. आज सोमवार दि. २ रोजी सकाळी ११ वा. मडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अश्‍लेषा बुडाल्याचे वृत्त समजताच माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष व इतर नगरसेवकांनी फोंडा येथील हॉस्पिटलात धाव घेतली. त्यांच्या निधनाबद्दल आमदार दिगंबर कामत यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्या उत्कृष्ट पोहणार्‍या होत्या, असे ते म्हणाले. अल्पकाळातही नगरसेवक म्हणून त्यांनी चांगले काम केले, असे त्यांनी सांगितले.
प्रतिभा सोसायटीचे चेअरमन अनिल पै यांनी तिच्या निधनाचे वृत्त ऐकून आपणास धक्का बसल्याचे सांगितले. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दिपाली नाईक, नगराध्यक्ष डॉ. बबिता प्रभुदेसाई व कर्मचार्‍यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.