Home Featured रेडीघाटात कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

रेडीघाटात कंटेनरच्या धडकेत महिला जागीच ठार

0

दुचाकीचालक गंभीर जखमी; पोलिसांकडून कंटेनरचालकाला अटक

वाळपई-होंडा मार्गावर रेडीघाट या ठिकाणी शुक्रवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातामध्ये साखळी येथील वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला असून, त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी कंटेनरचालकाला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर माहितीनुसार, वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे ह्या वाळपई सरकारी सामाजिक रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होत्या. रात्री 8 वाजता त्यांची ड्युटी संपल्यानंतर त्या साखळी येथील आपल्या घरी जात होत्या. प्रवासी बसेस नसल्यामुळे त्यांनी जीए-04-जे-7926 क्रमांकाच्या दुचाकीवरून लिफ्ट घेतली होती.

वाळपईतून होंडाच्या दिशेने जात असताना रेडीघाट या ठिकाणी शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या कंटेनरने (क्र. एमच-12-एएक्स-2564) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीचालक वनिता मोर्लेकर व चालक गंभीर जखमी झाला. वनिता मोर्लेकर यांच्या डोक्याला जबर जखम झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ज्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. तो कंटेनरचालक मद्याच्या नशेत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला वाळपईत प्रमुख रस्त्यावर अडवले आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
वाळपई पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून वनिता मोर्लेकर यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्यांच्या पश्चात मुलगा व पती असा परिवार आहे.