सेरूला भूखंड हडप प्रकरण
सेरूला कोमुनिदादमधील जमीन हडप केल्याच्या आरोपाखाली आपण पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर त्यांचे बंधू प्रमोद दाभोलकर उर्फ प्रमोद परुळेकर, सेरूला कोमुनिदादच्या ऍटर्नी पीटर मार्टिन्स, सेरूला कोमुनिदादच्या तात्कालीन प्रशासक आयरीन सिक्वेरा व अन्य काही अज्ञात पदाधिकार्यांविरुध्द पर्वरी पोलिसात तक्रार नोंदवली असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व मुख्य प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.सेरूला कोमुनिदादमधील सर्वे क्रमांक ३७६/६, ३७९/१, ३७९, ३८०/१ व ३८९/१ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी आपण ही तक्रार नोंदवली आहे, असे ते म्हणाले. सेरूला कोमुनिदादीत भूखंड मिळालेल्या काही लाभधारकांना हल्लीच अटक करण्यात आली होती. आपण माहिती हक्क कायद्याखाली वरील घोटाळ्यासंबंधीची माहिती मिळवली असल्याचे ते म्हणाले. पण आपणाला मिळालेली माहिती ही केवळ हिमनगाचे एक टोक असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, सेरूला कोमुनिदादच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करणारे पोलीस कोमुनिदादच्या काही ठराविक पदाधिकार्यांनाच चौकशीसाठी ताब्यात घेत असल्याचा आरोपही यावेळी डिमेलो यांनी केला. पोलिसांनी मंत्री दिलीप परुळेकर यांच्यासह तक्रार नोंदवण्यात आलेल्या सर्वांवर एफआयआर नोंद करावेत व त्यांची जबानी घ्यावी. तसेच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्री दिलीप परुळेकर यांना याप्रकरणी मंत्रीमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणीही यावेळी डिमेलो यांनी केली.