‘जनरेशन नेक्स्ट फॉर गोवा’ची स्थापना
सरकार दरबारी असलेली लोकांची कामे करण्यासाठी लांच मागण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘जनरेशन नेक्स्ट फॉर गोवा’ ही बिगर सरकारी संघटना स्थापन करण्यात आलेली असून या संघटनेने भ्रष्टाचारविरोधी मदतवाहिनी सुरू केली असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष दुर्गादास कामत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ७७५५९०२२२२ असा या मदत वाहिनीचा क्रमांक असल्याचे कामत यांनी पुढे बोलताना सांगितले.सम विचारी लोकांनी एकत्र येऊन उभारलेली ही एक चळवळच असल्याचे कामत म्हणाले. मदतवाहिनी उद्या मंगळवार दि. ३ मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लोकांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवरच समविचारी लोकांनी एकत्र येऊन वरील संघटना व मदतवाहिनी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. राज्यातील गरीब लोकांकडून त्यांची कामे करण्यासाठी लांच मागितली जात आहे, असे सांगून वरील संघटना अशा लोकांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचे कामत यांनी यावेळी सांगितले. पेडण्यापासून काणकोणपर्यंतच्या लोकांना या संघटनेचा फायदा होणार आहे. जर कुठल्याही सरकारी अधिकार्याने वा अन्य कुणीही कसलेही काम करण्यासाठी लांच मागितली तर वरील मदतवाहिनीशी संपर्क साधावा, अशी माहितीही कामत यांनी यावेळी दिली. या मदतवाहिनीमुळे सरकारंी खात्यातील भ्रष्टाचार किमान ३० ते ४० टक्क्यांनी कमी होऊ शकेल, असा दावाही कामत यांनी यावेळी व्यक्त केला.
संघटनेची रविवारी बैठक झाली व या बैठकीत राज्यात जो बेकायदा अमली पदार्थांचा व्यवहार फोफावलेला आहे, त्याविरुध्दही आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कामत यांनी स्पष्ट केले. संघटनेने राज्यातील महाविद्यालये व विद्यालये येथे जाऊन विद्यार्थ्यांसाठी माहिती हक्क कायद्यासंबंधीची शिबिरे घेण्याचाही निर्णय बैठकीत घेतल्याचे ते म्हणाले. संघटना लवकरच आपली एक फेसबूकपेजही सुररू करणार आहे. संघटनेची पणजी व मडगांव येथे कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याचे कामत यांनी यावेळी स्पष्ट केले.