हवामानात अचानक बदल झाल्याने शनिवारी मध्यरात्री राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. महाराष्ट्रातील वीज यंत्रणेत बिघाड झाल्याने रात्रभर वीज पुरवठाही खंडित झाला. त्याचा बराच परिणाम झाला. फळांच्या बागायतींचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.फोंडा, तसेच आजूबाजूच्या भागात काल सकाळी दुचाकी स्वारांना किरकोळ अपघात झाले. फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पाणी भरल्याने तेथे चालू असलेल्या ‘वंदे मातरम्’ या महानाट्यावरही परिणाम झाला. आयोजकांनी कालचा प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला. रात्री वादळी वारे, गडगडाटासह पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी वृक्ष पडल्याचे वृत्त आहे. काल संध्याकाळी राजधानी पणजीसह अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दैनंदिन जीवनावर विशेष परिणाम झाला नाही. परंतु या पावसाचा काजू, फणस, आंबे या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकार्यांचे म्हणणे आहे. आंबे, मिरची पिकांवर परिणाम अवकाळी पावसामुळे पेडणे तालुक्यातील आंबे व मिरच्या या पिंकावर बराच परिणाम होणार आहे. मात्र, काजू बागायतीवर परिणाम होणार नसल्याची माहिती पेडणे कृषी विभागाचे अधिकारी प्रसाद परब यांनी दिली. २८ रोजी मध्यरात्री व काल सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे आंब्याचा मोहर व मिरच्यालागवड या पिकांवर बराच परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावी लागणार आहे. मिरच्या लागवडीवर अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. पिकांवर कृषी खात्याकडे कार्बेटीन म्हणून औषध उपलब्ध आहे, त्याची फवारणी केली तर नुकसानी टाळू शकते, असे कृषी अधिकारी परब म्हणाले. विजेचा लपंडाव रात्रभर विजेचा लपंडाव व कमी दाबाने पुरवठा होत होता. त्यामुळे घरचे पंखे चालणे कठीण झाले होते. अचानक धो धो पाऊस कोसळत होता तर दुसर्याबाजूने विजेचा लपंडाव सुरू होता.